सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे (वय ८३ वर्षे) यांचा हात धरून चालत असतांना सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर यांच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया !

१. पू. जलतारेआजी चारचाकीतून उतरतांना त्यांचा हात धरायला गेल्यावर पू. आजींनीच माझे बोट धरून चालणे आणि त्या  वेळी ‘देवानेच हात धरला आहे’, याची जाणीव होणे

पू. कुसुम जलतारेआजी

‘२२.१.२०२२ या दिवशी रामनाथी आश्रमात महामृत्यूंजय याग होता. याग संपल्यावर एक साधिका, मी आणि पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी चारचाकी वाहनातून दुसर्‍या माळ्यावर आलो. मी चारचाकीतून उतरून पू. आजींचा हात धरायला गेले. तेवढ्यात पू. आजींनीच माझे बोट धरले. चारचाकीतून उतरल्यापासून उद्वाहकापर्यंत (लिफ्टपर्यंत) पू.आजी माझे बोट धरून चालत होत्या. आम्ही चालत असतांना पू. आजी पुढे आणि मी त्यांच्यामागून चालत होते. तेव्हा माझ्या मनात ‘आज संत माझा हात धरून मला चालवत आहेत. त्यांच्या इच्छेनेच सर्व होत आहे. हे देवाचेच नियोजन आहे. भगवंतानेच माझा हात धरला आहे’, असे विचार आले. पू. आजींच्या समवेत चालत असतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. आजी यांच्याप्रती कृतज्ञता वाटत होती.

कु. प्रतीक्षा हडकर

२. ‘देवानेच (परात्पर गुरु डॉक्टरांनीच) हात धरला आहे’, याची जाणीव होऊन ‘देवाने कितीतरी गोष्टीत साहाय्य केले आहे’,याची जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त होणे

‘माझ्यावर अनेक संकटे आली आणि प्रसंग घडले; परंतु ते माझ्या प्रारब्धामुळे होते. आता माझे तीव्र प्रारब्ध लवकरच भोगून संपणार आहे’, हे माझ्या लक्षात येत होते. ‘देव माझे आणि माझ्या कुटुंबाचे रक्षण करत आहे. येणार्‍या संकटाचा स्पर्शही त्याने मला होऊ दिला नाही. प्रत्येक प्रसंगात देव समवेत आहे आणि देवच साहाय्य करत आहे’, हे देवाच्या कृपेमुळे मी क्षणोक्षणी अनुभवले.

३. अडचणी, संकटे आणि प्रारब्धभोग भोगत असतांना देवानेच ते सुसह्य करून ठेवले असल्याचे जाणवणे

‘देवानेच माझा हात धरल्यामुळे प्रसंग, संकट आणि प्रारब्ध जणू गळून पडत आहे’, असे मला जाणवत आहे. ‘देव मला या भवसागरातून पार करून नेत आहे. ‘देवानेच सर्व अडचणी, संकटे आणि प्रारब्धभोग भोगत असतांना ते सुसह्य करून ठेवले आहे’, असे मला जाणवले. देवाच्या अफाट शक्तीमुळेच, त्याने माझी काळजी घेतल्यामुळेच मी जीवन जगत आहे. त्याच्याविना मी काहीच करू शकणार नाही’, याची जाणीव मला देवाच्याच कृपेमुळे झाली.

४. देवाचा हात धरून चालतांना सभोवताली लक्ष नसून केवळ त्या परम दयाळू परमेश्वराकडेच लक्ष असणे

देवाने माझा हात धरला आहे. देव पुढे चालत आहे आणि मी बाळ होऊन चालत आहे. माझे सभोवताली लक्षच नव्हते. माझे लक्ष केवळ त्या परम दयाळू परमेश्वराकडेच आहे. भूमीवर माझी पावले वेडीवाकडी पडत आहेत, तरी देव मला चालायला शिकवत आहे. त्यानंतर ‘मी व्यवस्थित कधी चालू लागले ?’, ते माझे मलाच कळले नाही. त्यामुळे देवच माझा आधार आहे. तोच माझे सर्वस्व आहे. मला त्याच्याविना कुणीच नाही. ‘तो आणि मी’ असे आमचे परमोच्च स्तरावरील आध्यात्मिक नाते आहे.

५. देवाच्या सहवासात आणि सत्संगात राहून मार्गदर्शन घेतल्याने साधनेतील अडथळ्यांच्या मुळावरच घाव घालणे शक्य असणे

परमेश्वर जवळ आहे, तर आनंदी आनंदच आहे. तेथे निराशा, टोकाचे विचार यांना जागाच नाही. तेथे ‘वर्तमानकाळ, सकारात्मकता आणि ईश्वरेच्छा’, एवढेच असते. देव आणि त्याचे लेकरू एवढेच असते. साधना करत असतांना अडचणी, अडथळे आणि संकटे येतात. यावर उत्तरदायी साधकांशी बोलून, स्वयंसूचना देऊन मात करण्यास शिकवले जाते; परंतु साधनेतील अडथळे दूर करण्यासाठी ‘संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु जीवनात येणे’, यासाठी भाग्य लागते. त्यांच्या सहवासात आणि सत्संगात राहून त्यांचे मार्गदर्शन घेणे, म्हणजे साधनेत येणार्‍या अडथळ्यांच्या मुळावरच घाव घालण्यासारखे आहे. अडथळ्यांवर मात करण्यासाठीच देव समवेत राहून शक्ती देतो आणि साधनारत रहायला शिकवतो.

६. साधना करत असतांना साधकावर कितीही संकटे आली, तरी त्याला संकटातून संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु डॉक्टर मुक्त करू शकत असणे

‘साधनेत कितीही अडथळे आले, तरी देवाला सोडून कुठे जायचे नाही’, असे ध्येय ठेवून साधनारत रहाणे देवाला आवडते. साधना करत असतांना साधकावर कितीही संकटे आली, तरी संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधक संकटातून मुक्त होतो. ते साधनेला पूरक वातावरण निर्माण करतात. हे देवाच्या कृपेमुळे शिकायला मिळत आहे. त्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर, सद्गुरु आणि संत यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

संत गुरुस्वरूप असतात. संत देवाचे भक्त असतात. ‘पू. आजींनी माझे धरलेले बोट, म्हणजे गुरुमाऊलीनेच मला धरले आहे’, असे मला जाणवले. ‘वेळ आली की, देव त्याच्या बाळाचा हात धरायला येतो’, हे लक्षात आले.’

– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक