महापालिका शाळांमधील अग्नीशमन यंत्रणेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष !

पुणे – नवीन शैक्षणिक वर्ष चालू होण्यापूर्वी महापालिकेच्या शाळांमधील अग्नीशमन यंत्रणा दुरुस्त करून आगीचे लेखापरीक्षण (फायर ऑडिट) करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते; मात्र या आदेशाकडे महापालिकेच्या शाळांनी कानाडोळा केला. सर्व शाळा १५ जूनपासून चालू झाल्याने मंगळवारी दीड कोटी रुपयांची निविदा काढून अग्नीशमन यंत्रणा दुरुस्त करण्याची कार्यवाही चालू करण्यात आली. (अशा प्रकारे हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे ! – संपादक)

२ वर्षांपूर्वी महापालिकेने २ कोटी रुपये खर्च करून ६० शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा बसवून घेतली होती; मात्र कोरोनाचा संसर्ग आणि दळणवळण बंदीच्या काळात या यंत्रणेची देखभाल दुरुस्ती झाली नाही. अग्नीशमन यंत्रणा पडताळल्याविना शाळा चालू करू नये, असा आदेश शिक्षण विभागाने काढला असला तरी याची कार्यवाही न करताच महापालिकेने शाळा चालू करण्याची सिद्धता केली होती. यावर अग्नीशमन यंत्रणा तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना भवन विभागाला दिल्या आहेत. महावितरणकडून ‘थ्री फेज कनेक्शन’ मिळत नसल्याने हे काम रखडल्याचे पालिकेने सांगितले आहे; मात्र हा विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ आहे. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी सुरक्षित नाहीत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य संघटक प्रशांत कनोजिया यांनी केला आहे.

संपादकीय भूमिका 

मुलांच्या जिवाशी खेळणारे असंवेदनशील शाळा व्यवस्थापन !