हिंसाचारात सहभागी झालेल्यांना इस्लाममधून हद्दपार करा ! – ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’ची मागणी

नवी देहली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’ने   शुक्रवार, १० जून या दिवशी झालेल्या नमाजानंतर उसळलेल्या हिंसाचाराचा निषेध केला. या हिंसाचारात सहभागी झालेल्यांना इस्लाममधून हद्दपार करण्याची मागणी त्यांनी केली.

दगडफेक, जाळपोळ आणि दंगली यांमुळे इस्लाम अपकीर्त तर झालाच; पण मुसलमानांना लाजेने मान खाली घालावी लागली. हिंसाचाराच्या या घटना, म्हणजे भारतात अशांतता निर्माण करण्याचे आणि विदेशात इस्लामची प्रतिमा मलीन करण्याचे षड्यंत्र आहे, असे ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’ने एका निवेदनात म्हटले आहे. मुसलमानांनी शांतता राखावी आणि कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन मंचाने केले. सर्व राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करावा. तसेच दंगलखोरांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही मंचने केली आहे.