१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधकांना सूक्ष्मातील ज्ञान मिळवण्यास सांगण्यामागील उद्देश केवळ ‘समाजाला साधनेचे महत्त्व समजावे’ हा असणे
‘फेब्रुवारी २००३ पासून देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त होऊ लागले. ही सनातन संस्थेच्या इतिहासातील पहिली घटना होती. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर अध्यात्मातील विविध विषयांवर आधारित नावीन्यपूर्ण प्रश्न मला द्यायचे आणि त्यांची उत्तरे सूक्ष्मातून मिळवण्यास मला सांगायचे.
परात्पर गुरु डॉक्टरांची ही प्रक्रिया करण्यामागील उद्देश पुढीलप्रमाणे होता, ‘अध्यात्मात जिज्ञासूंना पडणार्या विविध प्रश्नांची उत्तरे त्यांना अध्यात्मशास्त्रीय भाषेत मिळावी आणि त्यातून त्यांना ‘धर्मपालन’ आणि ‘साधना’ यांचे महत्त्व समजावे, तसेच सूक्ष्म जगताची ओळख व्हावी अन् जिज्ञासूंनी साधनेकडे वळून स्वतःची आध्यात्मिक प्रगती साध्य करावी.’
२. सूक्ष्मातील ज्ञानाचा उपयोग कधीही साधकांच्या व्यावहारिक अडचणी सोडवण्यासाठी न करणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी आतापर्यंत मला अध्यात्मातील विविध विषयांवर नावीन्यपूर्ण आणि असंख्य प्रश्न सूक्ष्मातून उत्तरे शोधण्यासाठी दिली. त्यात साधकांच्या व्यवहारिक अडचणी सोडवण्यासाठी एकही प्रश्न विचारला नव्हता, उदा. कुणाच्या कौटुंबिक किंवा आर्थिक अडचणी दूर करणे इत्यादी.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ‘समष्टीसाठी ज्ञान मिळवण्याचा ध्यास, जिज्ञासा आणि प्रश्न विचारण्याची गती’ कमालीची असणे
वर्ष २००३ पासून मला सूक्ष्मातून ज्ञान मिळू लागले, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी मला प्रथम अध्यात्मातील विविध विषयांवर आधारित काही प्रश्न दिले होते. त्यांची मला सूक्ष्मातून उत्तरे प्राप्त झाली की, त्यावर परात्पर गुरु डॉक्टर लगेच उपप्रश्न देत. त्या समवेत त्यांचे आणखी नवनवीन प्रश्न सिद्ध असायचे.
असे सलग १ वर्ष चालू होते. परात्पर गुरु डॉक्टरांचा समाजासाठी साधकाद्वारे सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याचा ‘ध्यास, जिज्ञासा आणि प्रश्न विचारण्याची गती’ कमालीची होती. त्यातून ईश्वर ‘परात्पर गुरु डॉक्टरांना काळानुरूप ‘कुठल्या विषयांवर सूक्ष्म ज्ञान मिळवायचे आहे’ यांसाठीचे प्रश्न सुचवत आहे’, असे मला जाणवत होते.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले अधून-मधून सूक्ष्मातून उत्तरे मिळवण्याची गती वाढवण्याविषयी सांगणे
परात्पर गुरु डॉक्टरांची सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यासाठीचे प्रश्न मला देण्याची गती पुष्कळ असायची. त्या तुलनेत मला सूक्ष्मातून मिळणार्या उत्तरांची गती अल्प असायची; कारण त्या वेळी मला तीव्र स्वरूपाचा थकवा असणे, प्राणशक्ती अल्प असणे, न सुचणे इत्यादी त्रास व्हायचे. त्यामुळे मला सूक्ष्मातून उत्तरे मिळवायला अधिक वेळ लागत होता.
परात्पर गुरु डॉक्टर अधून-मधून मला सूक्ष्मातून उत्तरे मिळवण्याची गती वाढवण्याविषयी सांगत होते. त्यामागे त्यांचा उद्देश ‘सूक्ष्मातील ज्ञान मिळवण्याच्या सेवेतून माझी आध्यात्मिक प्रगती व्हावी आणि समष्टीलाही या ज्ञानाचा लाभ व्हावा’, हा होता.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून मिळणार्या ज्ञानाचे आध्यात्मिक महत्त्व ओळखले असणे
सोनाराला हिर्याची पारख असते आणि त्याला त्याचे मूल्य समजलेले असते, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सूक्ष्मातून मिळणार्या ज्ञानाचे महत्त्व ओळखले होते. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून मिळणार्या ज्ञानाला ‘दुर्मिळ’, ‘अमूल्य’ अथवा ‘आतापर्यंत पृथ्वीवरील अन्य कोणत्याही ग्रंथात उपलब्ध नसलेले ज्ञान’, असा उल्लेख करायचे. मी सनातन संस्थेत आलो नसतो, तर मला मिळणार्या सूक्ष्मातील ज्ञानाचा उपयोग ‘स्वतःची साधना आणि समाज’ यांसाठी करता आला नसता.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रश्नांतून त्यांची अहंशून्य अवस्था आणि शिकण्याची स्थिती व्यक्त होणे
वर्ष २००३ मध्ये मला सूक्ष्मातून श्रीदुर्गादेवी ज्ञान द्यायची, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीदुर्गादेवीला स्वतःची साधना, साधनेतील त्रुटी अथवा अडथळे यांसंबंधीचे प्रश्न विचारले होते. या प्रश्नांतून परात्पर गुरु डॉक्टरांची अहंशून्य अवस्था आणि शिकण्याची स्थिती दिसून येते.
७. परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळप्रसंगी सूक्ष्मातून मिळणार्या ज्ञानापेक्षा साधकाचा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन आध्यात्मिक प्रगती होण्यास प्राधान्य देणे
वर्ष २००४ मध्ये मला होणार्या आध्यात्मिक त्रासात पुष्कळ वाढ झाल्याने परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याची सेवा थांबवून मला अन्य सेवा करण्यास सांगितल्या होत्या.
त्याच वर्षी नाशिक येथे भारतातील विविध आखाड्यांच्या प्रमुखांचे ‘अखिल भारतीय आखाडा परिषदे’चे संमेलन होते. या कार्यक्रमासाठी परात्पर गुरु डॉक्टर गोव्याहून नाशिक येथे आले होते. त्या वेळी ‘आध्यात्मिक त्रास न्यून व्हावा आणि माझी पुढील साधना चांगली व्हावी’ यांसाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी नाशिकहून त्यांच्या समेवत मला गोवा येथील आश्रमात नेले.
८. आध्यात्मिक त्रास दीर्घकाळाने न्यून झाल्यावर सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याच्या सेवेस परत प्रारंभ होणे
वर्ष २००४ ते वर्ष २०१५ या प्रदीर्घ कालावधीत स्वयंपाकघरातील विविध सेवा करणे, धान्य निवडणे, बांधकामाशी संबंधित शारीरिक सेवा करणे इत्यादी सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतल्या.
वर्ष २०१६ मध्ये मला होत असलेला आध्यात्मिक त्रास न्यून झाला, तेव्हा मला आरंभी संगीताच्या संदर्भात सूक्ष्मातून ज्ञान मिळू लागले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला अन्य सेवा सोडून सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याची सेवा परत प्रारंभ करण्यास सांगितली.
९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अधात्मशास्त्र शिकण्याची दृष्टी व्यापक असणे
ध्यानयोग, ज्ञानयोग इत्यादी योगांतील संतांचा त्या त्या योगमार्गाचा सखोल अभ्यास असतो; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांचा अध्यात्मातील प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा विचार असतो, उदा. संगीत, गायन, नृत्य, वास्तू, विविध योगमार्ग, सप्तलोक, सप्तपाताळ, साधनेमुळे साधक आणि संत यांच्या शरिरांत होणारे दैवी पालट, अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांमुळे व्यक्तींच्या शरिरांत झालेले त्रासदायक पालट, साधना करतांना येणार्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती, सनातन धर्मात आतापर्यंत सांगितलेल्या धार्मिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र, आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी करावयाच्या उपयोजना इत्यादी.
प्रत्येकाची प्रकृती भिन्न असल्यामुळे त्याचा साधनामार्ग भिन्न असतो. त्यामुळे प्रत्येकाला एकाच विषयाचे ज्ञान उपयोगी पडणार नाही. त्यामुळे प्रत्येक प्रकृतीला उपयोगी पडणारे अध्यात्मातील ज्ञान एकत्रित करण्याचा परात्पर गुरु डॉक्टरांचा प्रयत्न असतो. त्यामुळे या विषयांना अनुसरून परात्पर गुरु डॉक्टर प्रश्न काढून त्यांची सूक्ष्मातून उत्तरे शोधण्याची सेवा ते ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांकडून करवून घेत आहेत.
१०. परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातन संस्थेत सूक्ष्म ज्ञानाला पुष्कळ महत्त्व देण्यामागील सांगितलेले कारण
परात्पर गुरु डॉक्टर पूर्वी सनातनचे आश्रम आणि जिल्हे यांठिकाणी चालणार्या सत्संगात ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना ‘सध्या कोणत्या विषयांवर सूक्ष्मातून ज्ञान मिळत आहे’, हे सांगायचे. हे लिखाण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्येही नियमित प्रसिद्ध होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी याविषयी एकदा सांगितले, ‘‘साधकांना सूक्ष्मातून मिळणारे ज्ञान सनातनच्या ग्रंथांत संग्रहित केले आहे. हे ग्रंथ पृथ्वीवर सहस्रो वर्षे टिकून रहाणार आहे. त्याचा उपयोग संपूर्ण मानवजातीला होणार आहे.’’
(क्रमश: उद्याच्या अंकात)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/587920.html
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.२.२०२१)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |