१२ जून २०२२ या दिवशी आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधकांना सूक्ष्मातील ज्ञान मिळवण्यास सांगण्यामागील उद्देश आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातन संस्थेत सूक्ष्म ज्ञानाला पुष्कळ महत्त्व देण्यामागील सांगितलेले कारण यांविषयी पाहिले. आज आपण त्यापुढील भाग पाहूया
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/587578.html
११. सूक्ष्म ज्ञान मिळवण्याच्या समवेत अन्य साधकांकडून शिकण्यालाही महत्त्व देणे
एकदा मी परात्पर गुरु डॉक्टरांना विचारले, ‘‘सूक्ष्मातील ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही मला पुष्कळ प्रश्न दिले आहेत. त्यांतील बर्याच प्रश्नांची उत्तरे अजून प्रलंबित आहेत. प्रत्येक आठवड्याला १ घंटा माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा असतो. तेथे न जाता मी सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याची सेवा करू का ?’’ याविषयी ते म्हणाले, ‘‘व्यष्टी आढाव्याला जावे. आढाव्याला गेल्याने अन्य साधकांकडून साधनेच्या दृष्टीने शिकता येते.’’
१२. ‘सूक्ष्म ज्ञान मिळवण्याच्या समवेत त्याचे ‘व्याकरण’ आणि ‘संकलन’ अचूक करणे महत्त्वाचे आहे’, असे सांगणे
वर्ष २०१६ मध्ये मला सूक्ष्मातून मिळत असलेल्या ज्ञानाचे मी टंकलेखन करायचो. त्याचे ‘व्याकरण’ आणि ‘संकलन’ पडताळण्यासाठी ही संगणकीय धारिका या सेवेशी संबंधित अन्य साधकांना द्यायचो.
एकदा परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘केवळ सूक्ष्मातून ज्ञान मिळवणे, ही कनिष्ठ सेवा आहे. तुमची ज्ञानाची धारिका तुम्ही व्याकरण आणि संकलन यांदृष्टीने अचूक केल्यास ही सेवा परिपूर्ण होणार आहे.’’ त्यानंतर मी अन्य साधकांकडून व्याकरण आणि संकलन करण्यास शिकलो.
१३. काही प्रसंगी सूक्ष्म ज्ञान मिळवण्यापेक्षा आध्यात्मिक त्रास न्यून होण्याला प्राधान्य देणे
एकदा मी परात्पर गुरु डॉक्टरांना विचारले, ‘‘सूक्ष्मातील ज्ञान मिळवतांना मला अनिष्ट शक्तींच्या आक्रमणामुळे भ्रमिष्ट झाल्यासारखा त्रास होता. सध्या माझे ५ घंटे नामजपादी उपाय चालू आहेत. आणखी काय करायला हवे ?’’ हे ऐकून परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘अरे बापरे ! सध्या काही दिवस ५ घंटे नामजपादी उपाय करण्याऐवजी ८ घंटे उपाय करावेत. त्यानंतर सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याची सेवा करावी.’’
१४. सूक्ष्म ज्ञान मिळवण्याच्या समवेत विविध घटनांचे सूक्ष्मातील परीक्षण करण्याची सेवा करवून घेणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी मला केवळ विविध विषयांवर सूक्ष्म ज्ञान घेण्यास न सांगता आश्रमात चालणारे ‘विविध याग, संगीताच्या संदर्भातील कार्यक्रम, धार्मिक विधी, तसेच साधकाचे देहावसान आणि संतांचा देहत्याग’ इत्यादी घटनांचे सूक्ष्मातील परीक्षण करवून घेतले.
१५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळाच्या पलीकडे जाऊन सूक्ष्मातील ज्ञान मिळवण्यास शिकवणे
१५ अ. भूतकाळात जाणे
१५ अ १. एका साधिकेच्या चपला वारंवार चोरीला जाण्याच्या घटनांमागील आध्यात्मिक कारण तिच्या मागील जन्मांत जाऊन शोधण्यास सांगणे : एका साधिकेने मला विचारले, ‘‘माझ्या जीवनात मंदिरात, तसेच अन्य ठिकाणी चपला चोरीला जाण्याचे अनेक प्रसंग घडले. त्यामागे काही आध्यात्मिक कारण आहे का ?’’ आरंभी हा प्रश्न ऐकून मला गंमत वाटली; पण हा विषय मी सहज परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितला, तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘त्या साधिकेकडून आतापर्यंत तिच्या चपला चोरीला कधी आणि कुठे गेल्या आहेत, यांविषयी माहिती (हिस्ट्री) जाणून घ्या. त्यानंतर ‘चपला वारंवार चोरीला जाण्याच्या प्रसंगांचा तिच्या मागील जन्मांशी काही संबंध आहे का ?’, याचा सूक्ष्मातून अभ्यास करा.’’ या प्रसंगी परात्पर गुरु डॉक्टरांची ‘जिज्ञासा आणि अभ्यासूवृत्ती’ यांचे मला आश्चर्य वाटले.
त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्या साधिकेच्या मागील जन्मांचा अभ्यास देवाने सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे माझ्याकडून करवून घेतला. त्यातून ‘मागील जन्मांत काही प्रसंगांचा परिणाम म्हणून त्या साधिकेच्या चालू जन्मात चपला चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत’, हे लक्षात आले, तसेच या समस्येवर त्या साधिकेने ‘कुठले उपाय करायला हवे आहेत’, याविषयी मला सूक्ष्मातून ज्ञान मिळाले. त्यामुळे या विषयीचा स्वतंत्र एक लेख सिद्ध झाला.
१५ अ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःच्या, तसेच ज्ञानप्राप्तकर्ते साधक यांच्या मागील जन्मांतील विविध घडमोडींचा अभ्यास करण्यास सांगणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी मला त्यांच्या स्वतःच्या, तसेच ज्ञानप्राप्तकर्ते साधक (श्री. निषाद देशमुख, कु. मधुरा भोसले आणि श्री. राम होनप) यांच्या मागील जन्मांविषयी ज्ञान सूक्ष्मातून मिळवण्यास सांगितले. त्यांतून अध्यात्मातील विविध पैलूंचा उलगडा झाला.
१५ आ. भविष्यकाळात जाणे – परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे भविष्यकाळाचा अभ्यास करण्यास शिकवणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी ज्याप्रमाणे व्यक्तीच्या मागील जन्मांत जाऊन तिच्या भूतकाळाचा अभ्यास करण्यास शिकवले, त्याप्रमाणे त्यांनी पुढील विषयांवर सूक्ष्म ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न देऊन भविष्यकाळाचाही अभ्यास करवून घेतला, उदा. ‘पृथ्वीवर भीषण संकटकाळ कधी येणार आहे ? त्या काळात साधकांना रहाण्यासाठी सुरक्षित आणि असुरक्षित ठिकाणे कुठली ? संकटकाळात रक्षण होण्यासाठी साधकांनी कोणते उपाय करावेत ?’ इत्यादी.
१६. अन्य ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले ज्ञान पडताळण्याची सेवा देणे
परात्पर गुरु डॉक्टर मला अधून-मधून अन्य ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले ज्ञान पडताळण्यासाठी देत होते. ही सेवा कठीण होती; कारण स्वतःला सूक्ष्मातून ज्ञान मिळणे आणि ते शब्दांत व्यक्त करणे सुलभ असते; पण अन्य साधकांचे ज्ञान पडताळतांना त्यांतील प्रत्येक शब्दाचा अर्थ प्रथम समजून घ्यावा लागत होता. त्यानंतर ‘प्रत्येक ओळ ही अध्यात्मशास्त्रात बसते कि नाही’ हे सूक्ष्मातून शोधावे लागायचे. ही सेवा परात्पर गुरु डॉक्टरांच्या आशीर्वादाने करता आली.
१६ अ. अन्य ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून मिळणार्या ज्ञानातील त्रुटी भावनेत न अडकता सांगण्यास सांगणे : परात्पर गुरु डॉक्टर अन्य ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून मिळणारे ज्ञान पडताळण्यासाठी त्यांच्या संगणकीय धारिका मला देत होते. ही सेवा करतांना मला अन्य साधकांना मिळत असलेल्या सूक्ष्मातील ज्ञानात अध्यात्मशास्त्राला विसंगत अशा त्रुटी लक्षात यायच्या. या त्रुटी अन्य ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना कधीकधी स्वीकारता येत नव्हत्या अथवा त्यांना त्यांच्या ज्ञानाच्या धारिका मी पडताळलेले आवडत नव्हते.
हे त्या साधकांनी कधीही माझ्याजवळ व्यक्त केले नाही; परंतु त्या साधकांच्या वागण्यावरून माझ्या हे लक्षात यायचे. एकदा मी परात्पर गुरु डॉक्टर यांना वरील परिस्थिती सांगून ‘मी अन्य ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या ज्ञानातील त्रुटी सांगाव्यात कि नाही ?’, असे विचारले. तेव्हा त्यांनी ‘त्रुटी सांगाव्यात’, असे उत्तर दिले.
१७. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सूक्ष्मातील ज्ञान’ अथवा ‘सूक्ष्मातील परीक्षण’ या विषयांना अधिक महत्त्व देणे
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये विविध खेळ अथवा मनोरंजन यांविषयीच्या बातम्या नसतात. त्यामुळे या दैनिकाची वाचकसंख्या मर्यादित आहे. ‘सूक्ष्मातील ज्ञान’ अथवा ‘सूक्ष्मातील परीक्षण’ हा विषय सर्वसामान्य वाचकाला कळणे तसा नवीन आणि कठीण आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सूक्ष्मातील विविध विषय प्रसिद्ध केल्याने दैनिकाचा वाचकवर्ग अल्प होण्याची शक्यता होती; परंतु त्याचा विचार न करता परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्माच्या संदर्भातील लिखाण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यास प्राधान्य दिले.
‘जिज्ञासू-वाचकाचा ‘सूक्ष्म जगत, धार्मिक विधींचे महत्त्व, अनिष्ट शक्तींचा त्रास’ इत्यादी विविध विषयांवर विश्वास बसून त्यांची ‘साधनेकडे वाटचाल व्हावी आणि साधना करून आध्यात्मिक प्रगती साध्य करावी’, या शुद्ध हेतूने परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातील विविध विषयाच्या संदर्भातील मजकुराला दैनिकात प्रसिद्धी देण्यास प्राधान्य दिले.
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/588341.html
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|