७.२.२०२२ या दिवशी फोंडा (गोवा) येथील श्रीमती सुधा सिंगबाळआजी (वय ८२ वर्षे) सनातन संस्थेच्या ११७ व्या संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने मला त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. देवघरातील अन्नपूर्णामातेच्या मूर्तीकडे पाहिल्यावर ‘तेथे प्रत्यक्ष देवी विराजमान आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
श्रीमती सिंगबाळआजी यांच्या देवघरातील अन्नपूर्णामातेच्या मूर्तीकडे पाहिल्यावर ‘तेथे प्रत्यक्ष देवी विराजमान आहे’, असे मला जाणवले. मी देवीला नमस्कार करतांना डोळे बंद केल्यावर डोळे बंद असेपर्यंत माझी भावजागृती होत होती. ‘माझ्याकडे ऊर्ध्व दिशेकडून चैतन्य येत आहे’, असे मला जाणवत होते.
२. श्रीमती सिंगबाळआजींच्या घराच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
अ. मला घरातील लादी पुष्कळ गुळगुळीत, शुभ्र आणि प्रकाशमान जाणवली. तिचा स्पर्श दैवी जाणवत होता.
आ. घरात साधारण १ – २ दिवेच लावलेले होते, तरीही ‘घरात प्रकाशाचे प्रमाण अधिक असून प्रत्येक कोपरा प्रकाशमान झाला आहे’, असे मला वाटत होते.
३. श्रीमती सिंगबाळआजी यांना संत म्हणून घोषित करण्यापूर्वी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
३ अ. सन्मान सोहळ्यापूर्वी कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी प्रार्थना सांगितली. तेव्हा मला हलकेपणा जाणवला. ‘माझे पाय भूमीवर नसून मी हवेत तरंगत आहे’, असे काही क्षण मला जाणवले.
३ आ. ‘आजींची आंतरिक स्थिती शांत आणि स्थिर आहे’, असे मला वाटले.
३ इ. आजींची त्वचा नितळ आणि उजळ दिसत होती.
३ ई. श्रीमती सिंगबाळआजी, पू. नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे पाहून सारखीच स्पंदने जाणवणे : श्रीमती सिंगबाळआजी, पू. नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, हे तिघे एकमेकांच्या बाजूला बसले होते. त्या तिघांकडे पाहून एकसारखेच वाटत होते. साधारणतः संतांकडे पाहिले की, चांगले वाटते आणि अन्यांकडे पाहून सामान्य जाणवते; पण त्या तिघांकडे पाहून सारखीच स्पंदने जाणवत होती.
४. पू. सिंगबाळआजी यांना संत म्हणून घोषित केल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
४ अ. पू. आजी समोर बसलेल्या असतांना ‘त्यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करावा’, असे मला वाटत होते. (नंतर पू. नीलेश सिंगबाळ यांनी आजींच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला. तेव्हा मला पू. आजींना नमस्कार केल्याचे समाधान मिळाले.)
४ आ. पू. आजींकडे पाहिल्यावर पू. नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या तुलनेत अधिक तेज जाणवणे : पू. आजींकडे पाहिल्यावर पू. नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या तुलनेत अधिक तेज जाणवत होते. त्या वेळी देवाने मला विचार दिला, ‘पू. नीलेशदादा आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई समष्टी संत असल्यामुळे त्यांच्यावर वाईट शक्तींच्या आक्रमणांचे प्रमाणही अधिक असेल. पू. आजी व्यष्टी संत असल्याने त्यांच्यावर तुलनेने अल्प आक्रमण होत असल्याने त्यांच्याकडे पाहिल्यावर अधिक तेज जाणवते.’
४ इ. सोहळा चालू असतांना मला वातावरणात आनंद आणि चैतन्य जाणवत होते.
५. शिकायला मिळालेली सूत्रे
५ अ. ‘सिंगबाळ कुटुंबियांनी गुरुसेवा आणि राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांसाठी आपल्या सुखांचा त्याग केला असल्याने सर्व जण आदर्श आहेत’, असे वाटणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संतसंदेशात ‘पू. आजींचा पुष्कळ त्याग आहे’, असे म्हटले होते. त्यानंतर मला ‘कुटुंबातील सर्वांचा पुष्कळ त्याग आहे’, असे जाणवले. मागील साडेसतरा वर्षे पू. नीलेशदादा उत्तर भारतात सेवारत आहेत. स्वतः वयस्कर आणि रुग्णाईत असूनही पू. आजींनी सर्वांना सेवेसाठी वेळ देता यावा; म्हणून ‘कोणी कधी समवेत असावे’, अशी अपेक्षा केली नाही.
सोहळ्याच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘पू. आजींनी सर्व स्वीकारले; म्हणून मला सेवा करता येत आहे.’’ तेव्हा मला वाटले, ‘घरातील सर्वांनीच गुरुसेवा आणि राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांसाठी आपल्या सुखांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपात त्याग केला असल्याने सर्व जण आदर्श आहेत.’
५ आ. आध्यात्मिक नाती आनंददायी असणे : प्रत्यक्षात त्यांना एकमेकांचा प्रदीर्घ सहवास लाभला नसला, तरीही सर्वांनी निरपेक्ष वृत्तीने मनाचा त्याग केल्याने त्यांच्या नात्यात वेगळाच गोडवा जाणवतो. एकत्र राहूनही नात्यांमध्ये एवढा गोडवा असणे दुर्मिळ असते. ‘नाती ही केवळ एकमेकांशी असलेले प्रारब्ध फेडण्यासाठीच असतात. त्यांत आनंद असू शकत नाही’, असे पूर्वी मला वाटायचे. ‘व्यावहारिक नात्यांपेक्षा आध्यात्मिक नाती वेगळ्या स्तराची असल्याने आनंददायी असतात’, हे आता माझ्या लक्षात आले.
– श्री. ओंकार कानडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |