काश्मीरमधून १५० हून अधिक हिंदु  कर्मचार्‍यांच्या कुटुंबांचे पलायन !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये १२ मे या दिवशी राहुल भट या सरकारी कर्मचार्‍याची जिहादी आतंकवाद्यांनी तहसीलदार कार्यालयात घुसून हत्या केली होती. त्यानंतर हिंदु कर्मचार्‍यांनी राज्य प्रशासनाला त्यांचे स्थानांतर करण्यासाठी २ जूनची मुदत दिली होती. ‘स्थानांतर केले नाही, तर सामूहिक पलायन करू’, अशी चेतावणी देण्यात आली होती; मात्र या काळात शासनाने काहीच न केल्याने काश्मीर खोर्‍यातील हिंदु कर्मचार्‍यांनी १ जूनच्या रात्री जम्मू येथे पलायन करण्यास प्रारंभ केले. जवळपास १५० कुटुंबियांनी पलायन केल्याचे सांगण्यात येत आहे, तर ३०० हून अधिक कुटुंबे पलायनाच्या सिद्धतेत आहेत; मात्र प्रशासनाने त्यांना रोखून धरल्याचे सांगण्यात येत आहे.

१. हिंदू कर्मचारी म्हणाले की, आम्हाला बाहेर जाण्याची अनुमतीही नाही आणि दुसरीकडे जम्मू-काश्मीर प्रशासन आमच्या सुरक्षेसाठी काहीही करत नाही. त्यामुळे अनेक काश्मिरी हिंदु कुटुंबे जम्मूला मार्गस्थ झाली आहेत.

२. बारामुल्ला येथे पंतप्रधान विशेष पॅकेजच्या अंतर्गत काम करणारे अनिल म्हणाले की, येथे काश्मिरी हिंदूंची ३०० कुटुंबे आहेत. आम्ही दिलेली मुदत २ जूनला सायंकाळी ७ वाजता संपणार आहे; मात्र त्यापूर्वीच काही कुटुंबे भीतीने काश्मीर सोडून निघून गेली. १५० कुटुंबे जम्मूला मार्गस्थ झाली. आम्ही फर्निचर, इन्व्हर्टर आणि अन्य वस्तू विकत आहोत; पण अर्धी किंमतही मिळेना.

३. सरकारी निर्वासित छावण्यांत रहाणार्‍या हिंदु कर्मचार्‍यांनी त्यांना बाहेर निघू न देण्यात आल्याचा आरोप केला आहे. गांदरबल, बडगाम, श्रीनगर आणि दक्षिण काश्मीरमधील हिंदूंचे म्हणणे आहे की, जी कुटुंबे जम्मूला मार्गस्थ झाली, ती खासगी किंवा भाड्याच्या घरात रहात होती.

४. श्रीनगरच्या इंदिरानगर येथील एका हिंदु नागरिकाने सांगितले, ‘काही लोक रात्री येथून जम्मूसाठी निघाले; मात्र सकाळी जाणार्‍यांना रोखण्यात आले. आमच्या छावण्याच्या बाहेर टाळे लावण्यात आले आहे. येथील महामार्गावरही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आम्हाला येथून बाहेर पडू दिले जात नाही.’

५. इंदिरानगरातील बबलू नावाच्या व्यक्तीने सांगितले की, श्री सिद्धेश्‍वर महादेव मंदिर परिसरामध्ये १ जून या दिवशी १०० काश्मिरी हिंदू गोळा झाले. आता त्यांना तेथून बाहेर पडू दिले जात नाही. त्यांना बंधक बनवून ठेवण्यात आले आहे. मी माझ्या आईसाठी औषध आणण्यासाठी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, तर मला पोलिसांनी जाऊ दिले नाही.

६. काश्मीरमधील विविध जिल्ह्यांत कार्यरत काश्मिरी हिंदू शिक्षक जम्मूकडे जात आहेत. काश्मीरच्या कुलगाम, बांदीपोरा, अनंतनाग, बारामुला, शोपिया यांसह अन्य जिल्ह्यांमध्ये जम्मूमधील शेकडो शिक्षक कार्यरत आहेत.

७.  पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली आहे की, जिहादी आतंकवादी काश्मिरी हिंदूंना लक्ष्य करण्याची शक्यता असल्याने आम्ही त्यांना सुरक्षेच्या कारणामुळे काश्मीरमधून बाहेर जाऊ देण्यापासून रोखत आहोत.

संपादकीय भूमिका

जे १९९० च्या दशकात झाले, त्याची परत पुनरावृत्ती होत आहे. काश्मीरमध्ये हिंदू कालही सुरक्षित नव्हते आणि आजही नाहीत. काश्मीरमधील हिंदूंचे संरक्षण न करणार्‍या पोलिसांना आणि प्रशासनाला हे लज्जास्पद !