(म्हणे) ‘गोव्यात धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता नाही !’ – मायकल लोबो, विरोधी पक्षनेते

विरोधी पक्ष नेते मायकल लोबो

पणजी, ३० मे (वार्ता.) – गोव्यात धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता नाही. धर्मांतरावर नियंत्रण आणण्यासाठी विधानसभेत नवीन विधेयक मांडण्याची आवश्यकता नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांद्वारे धर्मांतरावर कारवाई होऊ शकते. पोलीसही यावर योग्य प्रकारे कारवाई करू शकतात. शिवोली प्रकरणात (शिवोली येथील ‘फाइव्ह पिलर्स’ चर्चचे पास्टर डॉम्निक याच्या विरोधात नोंद झालेला गुन्ह्याच्या प्रकरणात) ज्याप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे, त्याप्रमाणे गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. (गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा असता, तर पास्टर डॉम्निक याच्यावर कठोर कारवाई झाली असती. धर्मांतरविरोधी कायदा नसल्यामुळे पोलिसांना त्याच्यावर अन्य कलमांखाली गुन्हे नोंदवावे लागले ! – संपादक) इतर राज्यांप्रमाणे गोव्यात धर्मांतराचे प्रकार नोंद घेण्याइतपत नाहीत. होत असलेले प्रकार पुष्कळ अल्प आहेत, असे विधान विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केले आहे.

शिवोली येथील ‘फाइव्ह पिलर्स’ चर्चचे पास्टर डॉम्निक याच्या विरोधात धर्मांतराच्या तक्रारीनंतर झालेल्या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी वरील विधान केले.

 (सौजन्य : Prudent Media Goa) 

ते पुढे म्हणाले, ‘‘सर्व धर्म समान आहेत. प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन केले पाहिजे. गोव्याबाहेरील काही लोक गोव्यात येऊन प्रार्थनेच्या नावाखाली लोकांना प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर घडवून आणतात. हे अत्यंत चुकीचे आहे. या प्रकाराला मान्यता देऊ नये. अशा प्रकारामुळे दोन धर्मांमध्ये फूट पडून एकमेकांत वैरत्व निर्माण होत आहे. (विरोधी पक्षनेते मायकल लोबो हे १० वर्षे सत्तेत होते. सत्तेत असतांना त्यांनी पास्टर डॉम्निक याच्यावर कारवाई का केली नाही ? – संपादक) त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनधिकृतपणे चाललेल्या धर्मांतराला मी उत्तेजन देत नाही. शिवोली येथे घडलेल्या प्रकारामुळे ख्रिस्ती समाजाचे नाव अपकीर्त झाले आहे.’’

संपादकीय भूमिका

  • गोव्यात धर्मांतर होतच नाही म्हणणारे विरोधी पक्षनेते मायकल लोबो आता पास्टर डॉम्निक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर ‘काही प्रकरणांत धर्मांतर होते’, असे म्हणतात. ‘बिलिव्हर्स’ गोव्यात गेल्या २० वर्षांपासून कार्यरत आहे. ‘बिलिव्हर्स’ची धर्मांतराची कीड गोव्यातील कानाकोपर्‍यात आणि प्रत्येक गावात पोचली आहे.
  • हिंदुत्वनिष्ठांच्या मते गोव्यात न्यूनतम १ लाख ५० सहस्र लोकांचे धर्मांतर केले गेले आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यातील ही संख्या विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना अल्प वाटते का ? कि ते या संख्येकडे डोळेझाक करून पास्टर डॉम्निक याच्या धर्मांतराच्या कारवायांना पाठिंबा देत आहेत ?