रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडले विविध विधी !

  • परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त विविध यज्ञयागादी विधींना प्रारंभ

  • श्री सुदर्शनयाग, महामृत्यूंजय याग आणि श्री सिद्धिविनायक अन् कार्तिकेय यांच्या मूर्तीवर करण्यात आला अभिषेक !

डावीकडून श्री. सिद्धेश करंदीकर, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्री सुदर्शनयागासाठी संकल्प करतांना

रामनाथी (गोवा) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात यज्ञयागादी विविध विधींना प्रारंभ झाला आहे.

१९ मे २०२२ या दिवशी जन्मोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार्‍या सर्व विधींचा संकल्प परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर पुरोहितांनी गणपतिपूजन, प्रधानदेवता श्री सुदर्शन यांचे आवाहन, पूजन, सुदर्शनयागासाठी अग्निस्थापना, नवग्रहांचे आवाहन-पूजन आणि आवाहित सर्व देवतांसाठी हवन करण्यात आले. यानंतर श्री सुदर्शनयागाची सांगता करण्यात आली.

श्रीसिद्धिविनायक आणि कार्तिकेय यांच्या मूर्तीवर करण्यात आला अभिषेक !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीवर जलाभिषेक करतांना

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना रिद्धी सिद्धीसहित श्रीसिद्धिविनायकाची, तर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना कार्तिकेयाची मूर्ती दिली होती. या दोन्ही मूर्तींवर २० मे २०२२ या दिवशी परात्पर गुरुदेवांचे उत्तराषाढा नक्षत्र असतांना, तसेच प्रत्येक वर्षी असणार्‍या जन्मोत्सवाच्या वेळी जलाभिषेक करण्यास महर्षींनी सांगितले होते. त्यानुसार श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी श्री सिद्धिविनायकाच्या, तर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कार्तिकेयाच्या मूर्तीवर जलाभिषेक केला.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ कार्तिकेयाच्या मूर्तीवर जलाभिषेक करतांना

सुदर्शनचक्र आणि त्याचे माहात्म्य

भगवंत नेहमी भक्तांच्या रक्षणासाठी कार्यरत असतो. त्याप्रमाणेच भगवान श्रीविष्णूच्या हातातील सुदर्शनचक्र नेहमी कार्यरत असते. सुदर्शनचक्राला काळ, दिशा आणि गती हे नियम लागू होत नाहीत. सुदर्शनचक्र हे काळचक्राचे प्रतीक आहे आणि हे काळचक्र श्रीविष्णूच्या हातात आहे. देवतांकडे जे जे शस्त्र, आयुध आहे, त्यात सुदर्शनचक्र कायम गतीमान असते. ते देवाच्या संकल्पानुसार मनोगतीने कार्यरत होऊन ते कार्यपूर्ती करते. ज्याच्या दर्शनाने सुख, समृद्धी, शांती, आनंद प्राप्त होतो आणि सर्व ताप, दुःख, दैन्य दूर होते, ते म्हणजे सुदर्शनचक्र. हे सुदर्शनचक्र तुळशीपत्राच्या निमूळत्या भागावर बसण्याएवढा आकार किंवा संपूर्ण ब्रह्मांड व्यापू शकते एवढा आकार धारण करू शकते. सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जिथे सुदर्शनचक्र आहे, तिथे श्रीमन्ननारायणाचा अभयहस्त आहे. अशा या सुदर्शनचक्राचा कृपाशीर्वाद आम्हा सर्व साधकांवर अखंड रहावा, यासाठी त्रिवार वंदन !

परात्पर गुरुदेवांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळण्यासाठी करण्यात आला महामृत्यूंजय याग !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळावे’, यासाठी महामृत्यूंजय याग करण्यात आला. महामृत्यूयोगाचे भय केवळ भगवान शिवामुळे दूर होते; त्यामुळे हा याग २० मे २०२२ या दिवशी परात्पर गुरुदेवांचे जन्मनक्षत्र (उत्तराषाढा) असतांना करण्यात आला. या यज्ञामध्ये महर्षींनी सांगितल्याप्रमाणे करुंगळी वृक्षाच्या लाकडांचे चूर्ण, तसेच अनेक दैवी आणि औषधी मूलिकांच्या चूर्णाचे हवन करण्यात आले.