परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
३२ वर्षांपूर्वी मला सलग १० वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाण्याचे भाग्य लाभले. त्या वेळी ते आम्हा साधकांचा वाढदिवस साजरा करायचे; मात्र आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांचा वाढदिवस साजरा करता येत नसे. ‘ज्यांना जन्म-मृत्यू नाही आणि जे अनादि आहेत, त्यांचा जन्मोत्सव कसा साजरा करणार ?’, असे आमच्या लक्षात आले होते. त्या दिवशी आम्ही स्थुलातून सोहळ्याचा आनंद घेण्याऐवजी सूक्ष्मातून आनंद घेत होतो; मात्र आता महर्षींनी सांगितल्यानुसार त्यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. ‘व्यवहारात अतीमहनीय व्यक्तीचा वाढदिवस म्हणजे ‘मोठी मेजवानी, मनोरंजनाचे कार्यक्रम, व्यासपिठावरून भाषणे, प्रवचने, हार-तुरे, भेटवस्तू, लाखो रुपये व्यय करणे’, असे असते. परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव महर्षींनी सांगितल्यानुसार १०० टक्के आध्यात्मिक स्तरावर साजरा होतो. त्या दिवशी परात्पर गुरु डॉक्टर ‘साधकांना काय आवडते ?’, यापेक्षा त्यांना काय आवश्यक आहे ?’, तेच ते देतात. ‘साधकांना साधनेसाठी स्फूर्ती मिळावी, त्यांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, त्यांना साधनेच्या संदर्भात शिकता यावे, तसेच त्यांना चैतन्य अन् आनंद मिळावा’, असा त्यांच्या जन्मोत्सवाचा उद्देश असतो’, असे मला वाटते.
समाजातील अतीमहनीय व्यक्तीचा वाढदिवस आणि परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव यांत मला जाणवलेला भेद काव्यरूपात पुढे दिला आहे.
जगी वाढदिवस हा ‘सेलिब्रेशन’ दिवस असे ।
परम पूज्यांचा (टीप १) जन्मदिवस आनंदोत्सव असे ।। १ ।।
नवीन कपडे, मेजवानीसाठी वाढदिवस असे ।
परम पूज्यांचा जन्मोत्सव विष्णुदर्शन सोहळा असे ।। २ ।।
भेटवस्तू देऊनी वाढदिवस साजरा होतसे ।
परम पूज्यांच्या जन्मोत्सवी चैतन्याची उधळण होतसे ।। ३ ।।
वाढदिवसाच्या दिवशी फिरणे, चित्रपट, नाच-गाणे, खाणे-पिणे होतसे ।
परम पूज्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी ‘ज्ञानदान’ मिळतसे ।। ४ ।।
वाढदिवस आवडी-निवडी अहं जोपासण्यात जातसे ।
परम पूज्यांच्या जन्मोत्सवी साधकांची साधना होतसे ।। ५ ।।
वाढदिवस स्पर्धा नि उधळपट्टीसाठी होतसे ।
परम पूज्यांच्या जन्मोत्सवी सृष्टी नटतसे ।। ६ ।।
परम पूज्यांचा केवळ जन्मोत्सव नसे ।
हिंदु राष्ट्राच्या पहाटेचा तो आनंदोत्सव असे ।। ७ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.५.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |