जर सत्य लपवून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर ते मान्य नाही ! – हिंदु पक्षाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन

ज्ञानवापीचे प्रकरण

वाराणसी (उत्तरप्रदेश) – जर सत्य लपवून वातावरण शांत करण्यात येत असेल, तर आम्हाला ते मान्य नाही. त्यांना उलट लाज वाटली पाहिजे की, इतकी वर्षे सत्य लवपून का ठेवण्यात आले ? वातावरण बिघडवण्याची जे कुणी धमकी देत आहेत, त्यांनी शरण आले पाहिजे. जर ‘वजू खान्यापाशी (नमाजापूर्वी हात-पाय धुण्याची जागा) सापडलेले शिवलिंग नसून कारंजे आहे’, असे ते म्हणत असतील, तर त्यांनी ते कारंजे चालू करून दाखवावे. साडेतीनशे वर्षांपूर्वी असे कोणते तंत्रज्ञान होते, ज्याद्वारे कारंजे चालू केले जात होते ? असा प्रश्‍न ज्ञानवापीच्या प्रकरणातील अधिवक्ते (पू.) हरि शंकर जैन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला. पू. जैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. रुग्णालयातून परत पाठवल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सौजन्य : News इंडिया

१. पू. (अधिवक्ता) जैन पुढे म्हणाले की, शिवलिंग परिसराच्या आतल्या बाजूमध्ये आहे. जर येथील व्यास खोलीची पडताळणी केली, तर आणखी सत्य समोर येईल; मात्र सौहार्दाच्या नावाखाली आमचा कायदेशीर अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

२. एम्आयएम्चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही शिवलिंगाऐवजी कारंजे असल्याचे म्हटले आहे. त्यावर पू. (अधिवक्ता) जैन म्हणाले की, त्यांचे ज्ञान अधिक असू शकते; मात्र जेथे शिवलिंग मिळाले, ती जागा भगवान शिवाची आहे. तेथे मशीद असू शकत नाही. खोदकाम केल्यावर आणखी काही गोष्टी समोर येतील.