उद्या १५.५.२०२२ या दिवशी जानराववाडी (तालुका मिरज, जिल्हा सांगली) येथील श्रीमती बनाबाई यशवंत कुंडले (वय ८० वर्षे) यांचा सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी सोहळा आहे. त्या देवद आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणाऱ्या श्रीमती कमलिनी कुंडले यांच्या मावशी आहेत. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्रीमती बनाबाई यशवंत कुंडले यांना सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी सोहळ्यानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
१. श्रीमती कमलिनी कुंडले (मोठ्या बहिणीची मुलगी), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१ अ. घरातील आणि शेतीची सर्व कामे करूनही सतत हसतमुख असणे : श्रीमती बनाबाई यशवंत कुंडले (वय ८० वर्षे) ही माझ्या आईची लहान बहीण, म्हणजे माझी मावशी आहे. ती घरची सर्व कामे करण्यासह म्हशींचे दूध काढणे इत्यादी कामे करायची. ही कामे करून ती मळ्यातही जायची. एवढी सगळी कामे करूनही ती सतत हसतमुख असायची.
१ आ. कठीण परिस्थितीला धिराने सामोरे जाणे : आरंभी तिच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती; परंतु वर्ष १९७२ मध्ये आलेल्या दुष्काळाची झळ पोचल्याने तिची परिस्थिती खालावली. त्यातच घर आणि शेती यांच्या वाटण्या झाल्या. मावशीचे सासरे ((कै.) तुकाराम कुंडले) तिच्याकडेच रहायला असल्याने ते बाहेरचा बाजारहाट इत्यादी पहात असत. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात् निधन झाले. एकापाठोपाठ एक बसलेल्या या सगळ्या धक्क्यांमुळे काका (मावशीचे यजमान ((कै.) यशवंत कुंडले) रुग्णाईत झाले आणि सगळाच भार मावशीवर पडला; परंतु ती खंबीरपणे उभी राहिली. तिने ‘शेजारच्या महिलांसह बाजारहाट करणे, आर्थिक व्यवहार सांभाळणे’, हे सर्व शिकून घेतले. तिच्या या खंबीरपणामुळे काका हळूहळू बरे झाले. मावशीने या कालावधीत दिवस-रात्र कष्ट केले.
१ इ. शांत, प्रेमळ आणि मनमिळाऊ : मावशीचा स्वभाव शांत, प्रेमळ आणि मनमिळाऊ आहे. आतापर्यंत तिचे कधीही कुणाशीही भांडण झाले नाही. ‘इतरांचे मन दुखावेल’, असे बोलणे, तर दूरच ! ती कधी चढ्या आवाजात कुणाशी बोलत नाही.
१ ई. निरपेक्षता : ‘घरातील मोठी असल्याने मला मान मिळावा, मला विचारावे किंवा माझे ऐकावे’, असे तिला कधी वाटले नाही. ती नेहमी नमते घेते.
‘हे श्री गुरुमाऊली, ‘तुझ्याच कृपेने माझ्या मावशीचे हे गुण लिहिण्याचे भाग्य मला लाभले’, त्याबद्दल मी तुझ्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
२. श्री. रामदास कुंडले, श्री. शंकर कुंडले आणि श्री. भानुदास कुंडले (मुलगे), जानराववाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली.
२ अ. कष्टमय जीवन जगून मुलांना सुशिक्षित करणे : आमची आई स्वतः अशिक्षित असूनही तिने मुलांना शिकवले. घरकाम सांभाळून शेतात वडिलांसह काम करून मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारी आमची आई, म्हणजे साक्षात् परमेश्वराचे रूपच ! शिक्षणासाठी गाव सोडल्यानंतर ५ वर्षांत एकही सण असा गेला नाही की, आम्ही परगावी असूनही आमच्यासाठी आईकडून पुरणपोळीचा डबा आला नाही. आम्हा सर्वांसाठी काबाडकष्ट करून आम्हाला शहाणे बनवणारी आई आमच्यासाठी माता श्री लक्ष्मीच आहे.
२ आ. प्रेमभावाने कुटुंबियांना जोडून ठेवणे : तिने आमच्यावर एकत्रितपणे, प्रेमाने आणि मिळून-मिसळून रहाण्याचा संस्कार केला. तिच्या आशीर्वादामुळेच आम्ही सगळे आजही एकत्र रहात आहोत. आई म्हणजे आम्हा सर्वांमधील एक रेशमी धागा आहे, ज्याने आम्हा सर्वांना अजूनही घट्ट बांधून ठेवले आहे.
सहनशील, त्यागी, मायाळू आणि चुका झाल्यावर कठोर होऊन आम्हाला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या आईला वंदन !
३. सौ. कमल शंकर कुंडले आणि सौ. सुनीता भानुदास कुंडले (सुना), जानराववाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली.
३ अ. सुनांना आईचे प्रेम देणे : आमच्या सासूबाई आम्हाला आईचे प्रेम देतात. त्यांनी आमच्यावर कधीही आणि कसलीही बंधने लादली नाहीत. आम्हाला कधीही सासुरवास जाणवला नाही.
३ आ. नव्या पिढीशी जुळवून घेणे : त्या अशिक्षित असूनही सुधारणावादी विचारांच्या आहेत. त्यांनी आम्हाला नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्या स्वतः जुन्या वळणाच्या असूनही त्यांनी नव्या पिढीशी सहजतेने जुळवून घेतले.
४. श्री. महेश आणि कु. मोनिका शंकर कुंडले (नातवंडे), जानराववाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली.
आमची आजी ८० वर्षांची आहे; पण अजूनही तिची प्रकृती उत्तम आहे. ती कधीही रिकामी बसत नाही. तिला सतत काही ना काही करावेसे वाटते. ती शिस्तप्रिय आहे.
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ७.९.२०२१)