सामाजिक सलोखा ?

एकीकडे भोंग्यांवरून देशातील वातावरण तापले असतांना दुसरीकडे ‘सामाजिक सलोखा’ निर्माण होण्याच्या अनुषंगाने अनेक उपक्रम यापूर्वीप्रमाणेच आताही राबवले जात आहेत. असे असतांना खरोखरच ‘सामाजिक सलोखा’ निर्माण होत आहे का ? हा विषय गंभीर आणि संशोधन करण्यासारखा झाला आहे.

सामाजिक सलोख्याच्या नावावरून अनेक ठिकाणी इफ्तार पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात स्थानिक पोलीस आणि शांतता समितीने इफ्तार पार्टीचे आयोजन केले. सोलापूरमध्ये पोलीस आयुक्त हरिश बैजल यांच्या निवासस्थानी मुसलमान विद्यार्थ्यांना आमंत्रित करून इफ्तार पार्टी केली. विशेष म्हणजे पोलिसांनी स्वतः या विद्यार्थ्यांना ताटे वाढली. जेजुरी येथील श्री मार्तंड देवस्थानच्या वतीनेही असे आयोजन करण्यात आले. मुंबईतील राजपथावरील शाही मशिदीत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत सर्वधर्मीय सलोखा बैठक घेण्यात आली. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. यास सर्वधर्मीय मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यात नागरिकांनी स्वाक्षरी करून त्यांचा सहभागही नोंदवला. असे अनेक उपक्रम होत आहेत आणि पुढे होतीलही.

या उपक्रमांतून स्वार्थांध आपला स्वार्थ साधून घेतात. गेल्या मासात रामनवमीच्या दिवशी देशातील देहली, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, बंगाल या राज्यांमध्ये मिरवणुकीच्या वेळी दगडफेक करण्यात आली. नुकतीच भाग्यनगर (हैद्राबाद) येथील हिंदु युवक नागराजू याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. अशा वेळी सलोख्यासाठी सामाजिक स्तरावर राबवलेल्या या उपक्रमांचा ‘सामाजिक सलोखा’ राखण्याच्या दृष्टीने लाभ होतो का ? हा प्रश्न उघड गुपित आहे, असेच म्हणावे लागेल. प्रत्येक वेळी धर्मांधच आक्रमण करतात. हिंदूंनी आक्रमण केल्याची एकही घटना ऐकिवात नाही. त्यामुळे ‘सामाजिक सलोखा’ हे पाळणाघरातील बाळासारखे केवळ गोंडस नाव आहे. त्याचा विकास करून त्याला प्रौढावस्थेला आणणे, यामध्ये सरकारने पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा ! हिंदु राष्ट्रात खऱ्या अर्थाने ‘सामाजिक सलोखा’ असेल.

– श्री. नीलेश पाटील, जळगाव