आज १४ मे २०२२ या दिवशी थोरले बाजीराव पेशवे स्मृतीदिन !
वर्ष १६६२ मध्ये वैशाख शुक्ल त्रयोदशी या दिवशी नर्मदातीरी रावेरखेडी (मध्यप्रदेश) येथे थोरले बाजीराव पेशवे यांचे निधन झाले. बाजीरावांचे प्राणोत्क्रमण ज्या जागी झाले, तेथे वृंदावनरूपात एक छत्री उभारली आहे. ही समाधी इंदूर-खांडवा लाईनवर रावेरखेडी संनावद रेल्वेस्थानकापासून १६ किलोमीटर अंतरावर आहे. नदीमध्ये बाजीरावांची दहनभूमी आहे, तेथे एक ओटा बांधून त्यावर शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. जवळच श्रीमंत थोरले बाजीराव यांचा वियोग असह्य होऊन प्राणत्याग केलेला त्यांचा एक हत्ती आणि घोडा यांची समाधी आहे.
मराठी राज्य संवर्धनात थोरले बाजीराव यांची योग्यता अधिक !
बाळाजी विश्वनाथांपासून माधवरावांपर्यंत मराठी राज्यांचे जे संवर्धन झाले, त्यात थोरल्या बाजीरावांची योग्यता अधिक आहे. वीस वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावांनी शिपाईगिरी आणि राजकारण यांची शर्थ केली. निजामासारख्या सामर्थ्यवान प्रतिस्पर्ध्याला दमास आणून गिरिधर बहाद्दर, महंमद बंगश, सरबुलंदखान अशा बादशाही विरांनाही त्यांनी नामोहरम केले.
लढवय्या पेशवा !
एकेकाळचे मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल यांनी त्यांच्या ‘Oriental Experiences’ या पुस्तकामध्ये बाजीरावांविषयी लिहिले आहे, ‘निरनिराळे सरदार एकमेकांशी विरोध करत असता त्यांच्यात ऐक्य निर्माण करणे, मुसलमानांच्या ताब्यातील प्रदेश सोडवणे आणि हिंदूंचे संघटन करणे, ही महत्त्वाची कामे बाजीरावाला सिद्धीस न्यायची होती. स्वरूपाने भव्य आणि रुबाबदार, वर्तनाने प्रेमळ, भाषणाने आकर्षक, बुद्धीने कल्पक अन् तरतरीत आणि संकटांत युक्तीबाज असल्यामुळे त्याला लगोलग यश मिळत गेले. युद्धसंग्रामात तो सर्वांपुढे निर्भयपणे ठासून उभा रहात असे. सभोवार बंदुकीच्या गोळ्यांचा मारा होत असता तो कधीच कचरला नाही. त्याचा स्वराष्ट्राभिमान जबर असून त्यापुढे कोणतीही अडचण तो जुमानात नसे. त्याचा सारा जन्म उन्हातान्हात गेला. तसाच मृत्यूही उघड्या आकाशाखाली तंबूच्या आवरणात झाला. लढवय्या पेशवा म्हणून त्याची ख्याती आजही देशभर आहे.’
(साभार : ‘दिनविशेष’)