२.५.२०२१ या दिवशी महर्षींनी सांगितल्यानुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. मी त्याचे संगणकीय प्रक्षेपण पाहिले आणि माझ्या मनःपटलावर पुढील शब्द उमटले.
सद्गुरु स्तवना शब्द जरी हे थिटे असती ।
सामर्थ्य दे स्तवनास गजानना, ही चरणी विनंती ।। धृ. ।।
परात्पर गुरु डॉक्टरांना पाठवलेस, तू भारताच्या पुण्यभूमीत ।
साधकांना सदैव साहाय्य ते करीत रहाती ।
प.पू. भक्तराज गुरु प्रेमाने त्यांना ‘डॉक्टर’ म्हणती ।
सामर्थ्य दे स्तवनास गजानना, ही चरणी विनंती ।। १ ।।
सनातन आश्रमात चाले कार्य त्यांचे असामान्य ।
सनातन ज्ञान-भक्तीची सेवा सर्वा झाली मान्य ।
त्यांच्या सत्-धर्म कार्याचे करावे गुणगान किती ।
सामर्थ्य दे स्तवनास गजानना, ही चरणी विनंती ।। २ ।।
धर्मरक्षणाच्या कार्यात ‘सनातन प्रभात’ सदैव रत ।
धर्मसंस्थापनाचे कार्य कसे चालले अविरत ।
निर्भय, निरपेक्ष अन् आनंदी जीवन जगण्यास ते सांगती ।
सामर्थ्य दे स्तवनास गजानना, चरणी विनंती ।। ३ ।।
परात्पर गुरु डॉक्टरांना संतभेटीची असे अपूर्वाई मोठी ।
सांगती साधका, ‘ईश्वरनाम असावे सदैव ओठी’ ।
‘जगावेगळे हे देव-संत’, हीच ईश्वरनिर्मिती ।
सामर्थ्य दे स्तवनास गजानना, ही चरणी विनंती ।। ४ ।।
‘ईश्वर कर्ता-करविता’, ही खूण ते मनी ठेविती ।
क्षणोक्षणी साधकांना याची येते प्रचीती ।
सुलभ ज्ञान-ग्रंथाने होईल, परात्पर गुरु डॉक्टरांची जगी कीर्ती ।
सामर्थ्य दे स्तवनास गजानना, ही चरणी विनंती ।। ५ ।।
दुष्ट प्रवृत्तींच्या निर्मूलनासाठी ते जगी अवतरती ।
हिंदु राष्ट्र स्थापून वाढेल त्यांची महती ।
साधकजन शिकले त्यांच्याकडून नाना उपाय, रीती (टीप) ।
सामर्थ्य दे स्तवनास गजानना ही चरणी विनंती ।। ६ ।।
पुनश्च घडेल महाभारत, मग येईल रामराज्य ।
जनास कळेल मग कसे असावे हिंदु राज्य ।
साधु-संतजनांच्या तपश्चर्येची वाट पहाते धरती ।
सामर्थ्य दे स्तवनास गजानना ही चरणी विनंती ।। ७ ।।
टीप : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, वाईट शक्तींच्या त्रासामुळे स्वतःवर आलेले त्रासदायक आवरण दूर करण्याच्या पद्धती
– कृष्णपुष्प (पुष्पांजली), बेळगाव (४.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |