सोंडेघर (दापोली) येथे ग्रामस्थांत १०० वर्षांचा सलोख्याचा करार

दापोली (रत्नागिरी) – तालुक्यातील सोंडेघर येथे हिंदु, मुसलमान आणि बौद्ध समाजाच्या लोकांनी एकत्र येत १०० वर्षांचा सलोख्याचा करार केला आहे. राजकारण्यांकडून काही ना काही धार्मिक सूत्रे पुढे आणून वाद निर्माण केला जातो. त्याचा परिणाम गावातील शांततेवर होऊ न देण्याचा निर्णय सोंडेघरवासियांनी घेतला आहे. ‘सामाजिक सलोखा यापुढेही कायम रहायला हवा’, यासाठी २५ एप्रिल या दिवशी एका बैठकीत हा करार करण्यात आला. या बैठकीला दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पालगडचे अंमलदार विकास पवार, मिलिंद कदम आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सोंडेघर गावातील हिंदू, मुसलमान आणि बौद्ध गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र रहात आहेत. तीनही धर्मांतील सण आणि उत्सवांना सर्वजण एकत्र येत असतात. काही कौटुंबिक किंवा धार्मिक वाद निर्माण झाल्यास या गावातील तीनही धर्मांतील वयस्कर मंडळी एकत्र येऊन सामोपचाराने वाद मिटवतात. त्यामुळे या गावातील वाद गावाबाहेर जात नाही, तसेच गावातील कोणताही वाद पोलीस ठाण्यापर्यंत नेला जात नाही. गावातील सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारा हा करार भावी पिढीलाही बंधनकारक रहाणार आहे.

दापोली तालुक्यात यापूर्वींही वर्ष २०१५ मध्ये बुरोंडी गावामध्ये हिंदु आणि मुसलमान यांच्यामध्ये सलोखा राखण्यासाठी १०० वर्षांचा करार करण्यात आला आहे. असा करार करणारे सोंडेघर हे दुसरे गाव आहे.

संपादकीय भूमिका

असे जर एका छोट्याशा गावात होत असेल, तर ते संपूर्ण देशात का होऊ शकत नाही ?