नाशिक येथे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा नोंद !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे

नाशिक – येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनी जाहीर सभेत ब्राह्मण समाज आणि पुरोहित यांच्याविषयी अवमानकारक विधाने केली होती. महंत श्रीमंडलाचार्य पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांच्या नेतृत्वाखाली उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

नाशिक पोलीस ठाण्यात महंत श्रीमंडलाचार्य पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांच्यासह जमलेले हिंदुत्वनिष्ठ

अमोल मिटकरी यांचे विधान म्हणजे कन्यादान केलेल्या सर्व आई-वडिलांचा आणि नववधूंचा घोर अपमान ! – महंत श्रीमंडलाचार्य पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज

ब्राह्मण आणि पुरोहित यांची खिल्ली उडवतांना वाचाळवीर अमोल मिटकरी आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री धनंजय मुंडे अन् जयंत पाटील यांना किती हसू अनावर झाले आहे ? अशी हिंदु संस्कृतीची चेष्टा करायला आणि अवमानित करायला त्यांच्या नास्तिक पवारसाहेबांनी शिकवले का ? ज्या आई-वडिलांनी कन्यादान केले आहे, हा त्या सर्वांचा घोर अपमान आहे, तसेच सर्व नववधूंचाही अपमान आहे. त्यामुळे मिटकरी यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांचा जाहीर निषेध करण्यात येईल.


अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी श्री शिवकार्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षांकडून तक्रार प्रविष्ट !

मुंबई, २२ एप्रिल (वार्ता.) – हिंदु धर्मातील विवाह सोहळ्यातील ‘कन्यादान’ या पवित्र विधीविषयी अश्लाघ्य वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले यांनी केली आहे. याविषयी २१ एप्रिल या दिवशी श्री. प्रभाकर भोसले यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

श्री. प्रभाकर भोसले यांनी पोलीस ठाण्यात नोंदविलेली तक्रार –

(तक्रार वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

या तक्रारीमध्ये प्रभाकर भोसले यांनी म्हटले आहे की, कन्यादान विधीतील मंत्रांमध्ये ‘मम भार्या समर्पयामि ।’ असा मंत्र असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. हा समस्त स्त्रीवर्गाचा अपमान आहे. असा कोणताही मंत्र हिंदु धर्मशास्त्रात नाही. अमोल मिटकरी यांनी धादांत खोटे बोलून हिंदु धर्माची अपकीर्ती केली आहे. कन्यादान करतांना पिता त्याच्या मुलीचा हात भावी जावयाच्या हातात देतो. त्या वेळी जो मंत्र म्हटला जातो, त्याचा अर्थ ‘ज्या मुलीमुळे माझ्या घराची भरभराट झाली आणि जी तुझ्या वंशाची वृद्धी करणार आहे, त्या माझ्या मुलीला मी तुला सोपवत आहे. तिला कोणत्याही कारणास्तव अंतर देऊन नकोस. तिची प्रतारणा करू नकोस’, असा अतिशय पवित्र भावार्थ आहे. यातून हिंदु धर्मातील महानता अधोरेखित होते. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर हसून प्रतिसाद देणारे धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करावी.


कल्याण येथे ब्राह्मण महासंघाचे पोलिसांना निवेदन !

कल्याण – अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कल्याण येथील बाजारपेठ पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.


मिटकरी यांनी जाहीर माफी मागण्याची कोपरगाव ब्राह्मण समाजाची मागणी !

कोपरगाव (जिल्हा नगर) – अमोल मिटकरी यांनी दोन दिवसांत समस्त ब्राह्मण समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी येथील ब्राह्मण सभेने केली आहे. ब्राह्मण सभेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ‘मिटकरी यांनी माफी न मागितल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि १ मे पासून साखळी उपोषण करू. त्याचे दायित्व प्रशासनावर राहील’, असे सांगण्यात आले.