विवाहसोहळा नव्हे, श्री गुरूंनी अनुभवण्यास दिलेला भावसोहळाच !

श्री. संदीप आणि सौ. स्वाती शिंदे यांचा विवाह सोहळा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झाला. त्या दोघांनी विवाहाच्या दिवशी अनुभवलेली भावस्थिती येथे दिली आहे. या लेखाचा काही भाग आपण २४ नोव्हेंबर या दिवशी पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/857348.html

श्री. संदीप आणि सौ. स्वाती शिंदे

२. सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ ऐ. गौरीहर पूजनाच्या वेळी आलेली अनुभूती : गौरीहर पूजनाच्या वेळी ‘प्रत्यक्ष शिव-पार्वती यांचीच पूजा करण्याची संधी मिळाली आहे’, असे वाटून माझी भावजागृती होत होती. माझ्या मनाची स्थिरता वाढली होती आणि मला शांत वाटत होते.

२ ओ. अंतरपाटावरील स्वस्तिकाकडे पाहून मन स्थिर होणे : मंगलाष्टके चालू होण्यापूर्वी पुरोहितांनी मला अंतरपाटावरील स्वस्तिकाकडे पहाण्यास सांगितले. मंगलाष्टके चालू असतांना त्याकडे पाहून माझे मन त्यावर एकाग्र होऊन स्थिर झाले. माझ्या मनात कोणतेही विचार नव्हते. यावरून ‘अंतरपाट हे मुहूर्तसमयी मन एकाग्र आणि स्थिर ठेवण्याचे साधन आहे’, असे मला वाटले. विवाहाच्या ठिकाणी अनेक साधक उपस्थित असूनही मला कुणाचेही अस्तित्व जाणवत नव्हते.

२ औ. विधींच्या वेळी ‘माहेरच्या देवघरातील उपकरणे विवाह सोहळ्याला आली आहेत’, असे वाटणे : मंगलाष्टके झाल्यानंतर मंगलदीप दर्शन-विधी झाला. त्या वेळी त्या दिव्याकडे पहातांना ‘देवतांसह माझ्या माहेरच्या देवघरातील उपकरणेही या सोहळ्यासाठी आली आहेत’, असे वाटून मला आनंद झाला.

२ क. कुटुंबियांच्या रूपात कुलदेवता आणि वास्तूदेवता विवाहासाठी आल्याचे जाणवणे : विवाहासाठी माझ्या घरून केवळ मोठ्या वहिनी आणि त्यांची २ मुले उपस्थित होती. विवाहानंतर त्यांना नमस्कार करतांना ‘त्यांच्या जागी आमची कुलदेवता, वास्तुदेवता, तसेच घरातील सर्व मंडळी उपस्थित असून मी त्या सर्वांना नमस्कार करत आहे’, असे मला वाटले. श्री गुरूंनी तिथेही कुणाची न्यूनता जाणवू दिली नाही.

२ ख. विधींतील चैतन्यामुळे अलंकारांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

२ ख १. विधीतील चैतन्यामुळे बांगड्यांचा त्रास न होणे : विवाहाच्या आदल्या दिवशी वाङ्निश्चय होता. त्या आधी मला हिरवा चुडा घालून पहायचा होता. यापूर्वी मी कधीच काचेच्या बांगड्या अधिक संख्येत घातल्या नव्हत्या. हिरवा चुडा सराव म्हणून घालतांना मला बांगड्या लागल्या. तसेच माझा हात पुष्कळ जड झाला. तसे पाहिले, तर बांगड्यांचे काही वजन नसतांना हात खांद्यांपर्यंत दुखत असल्याचे माझ्या लक्षात आले. हात इतका जड होत असेल, तर माझ्या मनात ‘पुढे एवढ्या बांगड्या इतके दिवस कशा घालायच्या ?’, असा विचारही आला; मात्र विवाहविधींच्या पूर्वी त्याच बांगड्या घातल्या, त्या वेळी त्या हातांना लागल्या नाहीत, तसेच हात जडही झाले नाहीत. ‘मला त्या बांगड्या घालायची आधीपासून सवय आहे’, असे वाटत होते. यातून लक्षात आले की, सराव करतांना विधींतील चैतन्य नव्हते. प्रत्यक्ष विधींच्या वेळी त्यांतील चैतन्य मिळाल्याने मला कोणताही त्रास झाला नाही.

२ ख २. अन्य वेळी गळ्यातील हार जड वाटणे; पण मंगळसूत्र हलके जाणवून त्यातून चैतन्य मिळणे : अन्य वेळी कार्यक्रमानिमित्त गळ्यामध्ये अलंकार परिधान केले की, ‘कधी एकदा ते काढीन’, असे वाटायचे; कारण मला गळ्यातील हार जड वाटायचे. ‘विवाहाच्या वेळी विधीपूर्वक मंगळसूत्र परिधान केल्यानंतर मला त्यातून चैतन्य मिळत आहे आणि ते हलके झाले आहे’, असे जाणवले.

२ ख ३. जोडवी आणि मासोळी यांमुळे पायांमध्ये तेज जाणवणे : विवाहाच्या दिवशी विधीपूर्वक जोडवी आणि मासोळी परिधान केली. त्या वेळी मला माझ्या पायांकडे पाहिल्यावर पुष्कळ आनंद झाला. पायांकडे पाहून तेज जाणवत होते. तसेच विवाहानंतर कधी काही कारणास्तव थोड्या वेळासाठी जरी ते काढले, तरी पायाकडे पाहून रूक्षपणा जाणवतो. पुन्हा ते परिधान केल्यावर चैतन्यदायी आणि चांगले वाटते. यातून ‘धर्मशास्त्रांत अलंकारांना का महत्त्व दिले आहे ?’, याची मला प्रचीती आली, तसेच विधीपूर्वक सर्व गोष्टी करण्याचे महत्त्वही लक्षात आले.

२ ख ४. साडी नेसल्यावर शालीनता, नम्रता आणि समंजसपणा अनुभवता येणे : विवाहाच्या सर्व विधींच्या वेळी, तसेच विवाहानंतर प्रथमच सासरी गेल्यावर गृहप्रवेशाच्या विधीच्या वेळी मला पदर घेतलेल्या स्थितीत स्वतःमध्ये पुष्कळ चांगल्या संवेदना जाणवत होत्या. या स्थितीत शालीनता, नम्रता आणि समंजसपणा यांची जाणीव होत होती. यापूर्वी अनेकदा मी साडी नेसली आहे; मात्र आतापर्यंत असे कधी अनुभवले नाही. ‘धर्माचरण केल्याने आपल्या अंगी ईश्वरी विचार किंवा ईश्वरी तत्त्व वृद्धींगत होते’, असे मला वाटले.

२ ग. विवाह काळात मनात आलेले विचार आणि अनुभवलेली मनाची स्थिती 

२ ग १. उद्या माझा विवाह आहे, तर ‘परात्पर गुरु डॉक्टर मला काय अनुभवायला देणार आहेत ?’, ‘काय शिकवणार आहेत ?’, याची भावमिश्रित उत्सुकता होती.

२ ग २. आत्मविश्वास नसल्याने कोणत्याही सोहळ्याला जाण्याची मनाची सिद्धता नसणे मात्र स्वतःच्या विवाहाच्या दिवशी मनाची निर्विचार स्थिती अनुभवता येणे : यापूर्वी कोणत्याही सोहळ्याला जातांना किंवा त्यासाठी सिद्ध होतांना माझ्या मनात धडधड, भीती, प्रतिमा जपणे, न्यूनगंड इत्यादी असायचे. मी सर्वांमध्ये वावरतांना आणि मिसळतांना आत्मविश्वास नसल्याने ‘सोहळ्याला जायला नको’, असे विचार यायचे. कधीकधी मी सोहळ्याला जाणे टाळायचे आणि गेले, तरी मागे रहायचे. त्यामुळे मी कोणत्याही सोहळ्यातील आनंद घेऊ शकत नव्हते; पण माझ्या विवाहाच्या दिवशी मनात नकारात्मक विचार न येता दिवसभर मनाची निर्विचार स्थिती होती.

२ ग ३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची यज्ञांच्या वेळी असणारी भावावस्था विवाह विधीत स्वतः अनुभवण्याचा प्रयत्न होणे : विवाहाच्या विधींच्या वेळी मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे स्मरण झाले. अनेकदा ‘त्या यज्ञांच्या ठिकाणी अखंड भावावस्थेत असतात’, हे मी पाहिले होते. त्यांच्याकडे पाहून ती भावावस्था सूक्ष्मातून अनुभवण्याचा प्रयत्न व्हायचा. इथे तर मला स्थुलातून तशी संधी होती. विधी चालू असतांना मला त्यांच्याप्रमाणे अखंड भावावस्थेत रहाता येण्यासाठी माझ्याकडून प्रार्थना झाली आणि त्याप्रमाणे मला त्या वेळी बराच काळ भावावस्था अनुभवताही आली.

२ घ. साधक पुरोहित आणि हिंदु धर्मातील विधी यांचे महत्त्व लक्षात येणे : विवाहाच्या विधींसाठी साधक पुरोहित होते. ते प्रत्येक विधी चालू करण्यापूर्वी ‘कोणता विधी आहे ? तो कशासाठी केला जातो ? त्याचा लाभ काय ?’ इत्यादी सांगत होते. त्यानुसार ते आमच्याकडून कृती करवून घेत होते. आमच्याकडून काही चुकल्यास ती कृती थांबवून योग्य पद्धतीनेच उच्चार आणि कृती करवून घेत होते. विधींमागील शास्त्र आणि त्यांचा अर्थ समजून कृती केल्याने त्यांचे महत्त्व मनावर बिंबत होते. त्याप्रमाणे भाव ठेवून कृती करता येत होत्या. त्यांतील चैतन्य ग्रहण करता येऊन आनंद घेता येत होता.

त्या वेळी मला काही अनुभूती आल्या, उदा. कन्यादान या विधीमध्ये वराच्या हातांवरून पाणी सोडून ते वधूच्या हातावर सोडतात. त्या वेळी जे पाणी हातावरून सोडले, ते पाणी आधी साधारण तापमानाचे होते; मात्र ज्या वेळी ते वराच्या हातावरून माझ्या हातावर आले, त्या वेळी त्यामध्ये थंडावा आल्याचे जाणवले. या संदर्भात पुरोहितांना विचारले असता, ‘या कृतीतून वधूच्या कुळामध्ये पालट होतो’, असे शास्त्र मला समजले. यातून ‘केवळ शास्त्र म्हणून नव्हे, तर कुळ पालटल्यानंतर स्थुलातूनही पाण्याच्या तापमानात पालट झाला’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा हिंदु धर्मात सांगितलेल्या सर्व विधींचे शास्त्र आणि महत्त्व प्रकर्षाने माझ्या लक्षात आले.’                      (क्रमशः)  

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक