|
कुंडरकी (उत्तरप्रदेश) – महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभांच्या निवडणुकांच्या निकालासमवेत २३ नोव्हेंबरला उत्तरप्रदेश विधानसभेतील ९ जागांच्या पोटनिवडणुकांचे निकालही लागले. यामध्ये मुरादाबादच्या कुंडरकी मतदारसंघातून भाजपचे ठाकूर रामवीर सिंह यांनी तब्बल १ लाख ४४ सहस्र ७९१ मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला. विशेष म्हणजे या मतदारसंघात तब्बल ६० टक्के मुसलमान मतदार आहेत. अशातच येथे ५७ टक्के मतदान झाले होते. यातून मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात सिंह यांना मत दिल्याचे स्पष्ट आहे. यामुळे तब्बल ३१ वर्षांनी समाजवादी पक्षाचा उमेदवार पराभूत झाला असून भाजपचे कमळ येथे पुन्हा फुलले.
सिंह यांच्या विजयासंदर्भात स्थानिक मुसलमानांना विचारले असता ते म्हणाले की, रामवीर सिंह आम्हाला सर्व कामात साहाय्य करतात. आम्हाला निश्चिती आहे की, ते आमच्या मतदारसंघाचा विकास घडवून आणतील. सिंह हे तळागाळातील नेते आहेत. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांचे उमेदवार आम्हाला केवळ आश्वासने देतात.
कुंडरकी मतदारसंघातील धार्मिक समीकरण !
कुंडरकी मतदारसंघात तब्बल ६० टक्के मतदार हे मुसलमान असल्याने येथील निवडणुकीत विजय किंवा पराभव यात हे मतदार महत्त्वाची भूमिका बजावतात. येथे हिंदु मते १ लाख ५६ सहस्र आहेत, तर मुसलमान मते २ लाख ३९ सहस्र ३७५ आहेत. निवडणुकीतील सिंह यांच्या विजयातून हे स्पष्ट आहे की, मुसलमानांनी त्यांना संपूर्ण पाठिंबा घोषित केला.