‘वक्फ’चा राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही, या पंतप्रधान मोदी यांच्या विधानावर उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना अर्शद मदनी यांची टीका
(जकात म्हणजे मुसलमानांनी त्यांच्या मिळकतीमधील ठराविक रक्कम धर्मासाठी दान करणे)
पाटलीपुत्र (बिहार) – आपल्या देशात हिंदु आणि मुसलमान या पलीकडे विचार करणारे अनेक लोक आहेत. वक्फ सुधारणा विधेयकाला आम्ही धार्मिक गोष्टींत हस्तक्षेप मानतो. वक्फ आमचा धार्मिक अधिकार आहे. मोदी म्हणतात, ‘राज्यघटनेत वक्फ नावाची कोणतीही गोष्ट नाही.’ मला अतिशय आश्चर्य वाटले. अल्लाने जे सांगितले ते बरोबर आहे, पैगंबरांनी जे सांगितले ती प्रथा आहे. मला आश्चर्य वाटते की, मोदीजी ते चुकीचे कसे ठरवत आहेत ? उद्या ते म्हणतील, ‘जकात आणि नमाज या प्रथेत नाहीत’, मग ते तेही बंद करतील, अशा शब्दांत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना अर्शद मदनी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विधानावर टीका केली. येथे या संघटनेची परिषद चालू असतांना मदनी यांनी हे विधान केले. पंतप्रधान मोदी यांनी २३ नोव्हेंबरला देहलीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना वक्फचा राज्यघटनेत उल्लेख नसल्याचे विधान केले होते.
मौलाना मदनी पुढे म्हणाले,
१. हा आमचा देश आहे, जो कोणत्याही धर्माचा असो. जसे ५ मुलगे असू शकतात; पण आई-वडील एकच असतात. मोदीजींनी अशा उद्धट गोष्टी बोलू नयेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत. अशामुळे देशात मुसलमानांविरुद्ध द्वेष निर्माण होतो. (‘देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे’ असे विधान पंतप्रधान असतांनाच डॉ. मनमोहन सिंह यांनी केले होते. ते मुसलमानांना कसे चालले ? याचे उत्तर मदनी यांनी दिले पाहिजे ! – संपादक)
२. जमियत उलामा-ए-हिंद प्रेम आणि पैगंबर यांच्यासाठी बलीदान देत आले आहे. आम्ही देशात शांतता राखण्यासाठी काम करत आहोत. (हा या देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा विनोदच म्हणावा लागले ! देशात सर्वाधिक हिंसाचार, आतंकवाद आणि अशांतता कोण करत आले आहेत आणि करत आहेत, हे जगाला ठाऊक आहे ! – संपादक)
३. देशाला स्वतंत्र करण्यासाठी आमच्या पूर्वजांनी बलीदान दिले आहे. आम्ही ती देशाची परंपरा बनवली आहे. (देशाला स्वतंत्र करण्यासाठी नाही, तर मुसलमानांचे राज्य पुन्हा स्थापन होण्यासाठी ते लढले, हाच इतिहास आहे आणि आजही ते याचसाठी जिहाद करत आहेत ! – संपादक)
४. देशाच्या चालीरीती हिंदूंनीच निर्माण केल्या आहेत, असे कुणाला वाटत असेल, तर त्याला जगाची काहीच माहिती नाही. या देशाशी असलेले आमचे संबंध १४५ वर्षे जुने आहेत. हे नाकारणारा कुणी असू शकत नाही.
५. हिमंत बिस्व सरमा यांच्यावर टीका करतांना मौलाना अर्शद मदनी म्हणाले की, आसामचे मुख्यमंत्री झारखंडमध्ये रात्रंदिवस ठाण मांडून बसले होते; पण तेथील लोकांनी त्यांचे तोंड काळे केले. (येथे विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला) झारखंडचे हिंदु आणि मुसलमान दोघेही नागरिक आहेत. ते द्वेषाच्या राजकारणावर थुंकले आहेत. (असे आहे, तर महाराष्ट्रात हिंदूंनी ‘व्होट जिहाद’चा पराभव केला, यावर मदनी का बोलत नाहीत ? – संपादक)
५. एखाद्या व्यक्तीने चुकीचे काम केले, तर त्याची शिक्षा संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागते. (एखाद्या व्यक्तीने चोरी केली, दरोडा घातला, घोटाळा केला, तर त्या पैशांचा लाभ त्याच्या घरातील लोक घेतात; मग त्यांनाही त्यांची शिक्षा होत असेल, तर चुकीचे काय ? – संपादक) अल्लाने आमचे सूत्र मान्य केले आहे. आता कुणी आमच्या घरांवर बुलडोझर चालवून दाखवावे. (सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाकडे दुर्लक्ष करून काश्मीरमध्ये हिंदूंची दुकाने पाडण्यात आली. त्यावर मदनी का बोलत नाहीत ? -संपादक) सर्वोच्च न्यायालयात निर्णय देणारे न्यायाधीश मुसलमान नसून हिंदु होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे काही लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. आम्ही वारंवार सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मिळवला आहे.
काँग्रेसचे उद्दिष्ट देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे नव्हते !मौलाना मदनी म्हणाले की, काँग्रेसचा जन्म होण्यापूर्वीच आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलो. काँग्रेसचे उद्दिष्ट देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे नव्हते. काँग्रेसची स्थापना ब्रिटीश सरकार आणि जनतेत समन्वय निर्माण व्हावा यासाठी करण्यात आला. काँग्रेसला मुसलमानांचा घरचा अहेर ! हे मुसलमानांचे लांगूलचालन करणार्या काँग्रेसला मान्य आहे का ? ती यावर तोंड उघडेल का ? |
संपादकीय भूमिका
|