उत्तरप्रदेश सरकारचा अभिनंदनीय निर्णय !
|
वाराणसी (उत्तरप्रदेश) – क्रूरकर्मा औरंगजेबाने येथील काशी विश्वनाथ मंदिर पाडून त्याच्या परिसरात ज्ञानवापी मशीद बांधली. ही भूमी हिंदूंना परत मिळावी, यासाठी न्यायालयात खटला चालू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर या कथित मशिदीच्या पश्चिमीकडे असलेल्या देवी श्रृंगार गौरी मातेच्या मूर्तीची पूजा वर्षातून केवळ एकदाच करण्याची हिंदूंना अनुमती मिळत होती. याविषयी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी वाराणसी न्यायालयात याचिका प्रविष्ट करून वर्षभर पूजा करण्याची अनुमती मिळण्याची मागणी केली. यावर न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला नोटीस बजावली; मात्र त्यापूर्वीच उत्तरप्रदेश सरकारने वर्षभर देवीची पूजा आणि दर्शन घेण्याची अनुमती दिली आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी ज्ञानवापी मशिदीच्या बाजूला काशी विश्वनाथ मंदिर बांधले होते.
गेली अनेक वर्षे यासाठी लढा देणार्या हिंदूंचा विजय ! – अधिवक्ता विष्णुशंकर जैन
याविषयी अधिवक्ता विष्णुशंकर जैन म्हणाले की, वर्ष १९९० नंतर ही पूजा तत्कालीन सरकारकडून बंद करण्यात आली होती. त्या वेळी केवळ चैत्र नवरात्रीतील शुक्ल चतुर्थीच्या दिवशीच पूजा करण्याची अनुमती देण्यात आली होती. आम्ही वाराणसी दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट करून देवीची पूजा करण्याचा हिंदूंचा मूलभूत अधिकार असल्याचे सांगत वर्षभर अनुमती देण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने सरकारला नोटीस बजावली. त्यानंतर सरकारनेही वर्षभर पूजा आणि दर्शन घेण्याची अनुमती दिली आहे. गेले अनेक वर्षे यासाठी लढा देणार्या हिंदूंचा हा विजय आहे.
ज्ञानवापी मशीद इस्लामच्या मान्यतेनुसार नाही !
अधिवक्ता जैन पुढे म्हणाले की, ही मशीद इस्लामच्या मान्यतेनुसार नाही; कारण भारतात असे कुठेही नाही की, एका मशिदीच्या पश्चिम दिशेच्या बाजूने हिंदूंच्या देवतेची मूर्ती आहे. इस्लाममध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. औरंगजेब याने येथील काशी विश्वनाथ मंदिर पाडून तेथे ही मशीद बांधली, हेच यातून स्पष्ट होते.