‘जागतिक’ महासत्तेच्या दिशेने भारत !

‘स्वतंत्र विदेशी धोरण’ भारताला जागतिक महासत्तेच्या दिशेने अंगुलीनिर्देश करणारे !

समाजात लोक, संघटना, पंथ, राजकीय पक्ष आदींचे एकमेकांशी हेवेदावे असतात. स्पर्धा, ईर्ष्या यांसमवेतच राजकीय, आर्थिक, सामाजिक, वांशिक आदी प्रकारची कारणे या संघर्षांना उत्तेजित करत असतात. अशा वातावरणात जर एखाद्या व्यक्तीने अशा परस्परविरोधी विचारसरणीच्या व्यक्ती, संघटना, पंथ आदींशी सामोपचाराची अथवा सलोख्याचे संबंध राखणारी भूमिका वठवली, तर ती व्यक्ती सर्वांनाच हवीहवीशी वाटते. तिची ही मुत्सद्देगिरी तिला सामर्थ्यवान बनवत असते. अशी व्यक्ती ‘यू विन-आय विन ॲटिट्यूड’ अर्थात् ‘तुझे हित अन् माझेही हित’ या स्वभाववैशिष्ट्याची असते. हीच भूमिका जागतिक राजकारणासाठीही तेवढीच समर्पक आहे, किंबहुना एखाद्या राष्ट्राचे असे धोरण जागतिक मन:पटलावर त्याच प्रकारे प्रतिबिबत होत असते. वर्तमान आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या परिदृश्यामध्ये ‘भारत’ त्या स्थानाकडे आगेकूच करत आहे !

भारताची बलस्थाने !

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध चालू होऊन दीड मास होत आला. या कालावधीत आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून निघाले आहे. देशांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांमध्ये कमालीचे पालट होत असून जग दोन भागांत विभागले गेले आहे, असे काहीसे चित्र आहे. गेल्या शतकात ज्याप्रमाणे ‘शीत’युद्ध लढले गेले आणि तत्कालीन सोव्हिएत युनियन अन् अमेरिका यांच्यातील अनेक दशकांच्या या संघर्षात बहुतांश जग दोन भागांमध्ये विभाजित झाले होते, तसेच आजचे चित्र आहे. यात रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्षाच्या रूपात मात्र ‘प्रत्यक्ष’ युद्धाचा भडका उडाला आहे. त्यामुळे अनेक तज्ञ मंडळी ‘तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली आहे कि काय ?’, अशा प्रकारे चिंता व्यक्त करत आहेत. या सर्व परिस्थितीत जगाने मात्र भारताला एक विशेष स्थान देऊ केले आहे. २४ फेब्रुवारी या दिवशी जेव्हा रशियाने युक्रेनवर आक्रमण करून युद्ध पुकारले, त्याच दिवशी युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी धास्तावलेल्या स्थितीत भारताला मध्यस्थी करण्याची अक्षरश: विनवणी केली. गेल्या काही वर्षांपासून ‘भारत आता अमेरिकेच्या पंगतीत जाऊन बसला आहे’, अशी चर्चा होत असतांना युक्रेनसारख्या राष्ट्राला भारताच्या पंतप्रधानांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा करून युद्ध थांबवण्याची विनंती करावीशी वाटत आहे. अर्थात् पोलिखा यांनी भारताकडे मध्यस्थी करण्याची मागणी करणे, ही एक वेळ साधारण गोष्ट म्हणता येईल; परंतु युक्रेनचे पंतप्रधान व्लोदिमिर झेलेंस्की आणि त्यांचे विदेशमंत्री दिमित्रो कुलेबा यांनीही मोदी यांना पुतिन यांना समजावण्याचा वारंवार आग्रह धरणे, यास काय म्हणावे ? गेल्या मासाभरात पश्चिम युरोपीय महाशक्ती असलेल्या जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स यांनीसुद्धा भारताला रशियाविरोधी भूमिका घेण्याच्या वेळोवळी सूचना केल्या. भारत रशियाचा विरोध करण्यास धजत नसल्याचे पाहून जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने कधी भारताचे कौतुक करून त्याला स्वत:च्या तंबूत आणण्याचा प्रयत्न केला, तर कधी त्याला दरडावण्याचा प्रयत्न केला. एवढे सर्व होऊनही पश्चिमी शक्तींनी संयुक्त राष्ट्रांमध्ये रशियाला जगापासून एकटे पाडण्यासाठी जो ठराव मांडला, त्यामध्ये भारताने तटस्थ रहाण्यास पसंती दिली. यावर रशियाच्या सरकारचे मुखपत्र ‘रशिया टुडे’ने भारताचे तोंड भरून कौतुक करून त्याला रशियाशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे, त्याच्यासमवेत व्यवसाय वाढवून संबंधांमध्ये घनिष्ठता आणणे, यांसाठी लेखणी झिजवली. भारताच्या ‘ऑपरेशन गंगा’च्या (युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी राबवलेली मोहीम) यशस्वीतेचे तर जगभर कौतुक होत आहे !

शत्रूकडून प्रशंसा !

‘भारताने ‘स्वतंत्र विदेशी धोरण’ राबवल्यानेच आज तो ताठ मानेने जगासमोर उभा आहे !’

या सर्वांत भारताशेजारील देश पाकची स्थिती मात्र दयनीय झाली. ज्या दिवशी पुतिन यांनी युद्धगर्जना केली, त्या दिवशी पाकचे पंतप्रधान इम्रान खान रशियामध्ये पाकचा व्यवसाय वाढावा म्हणून गेले होते. पुतिन यांनी मात्र त्यांच्यासमवेत आटोपती बैठक घेतली. त्यांनी युद्धसज्जतेला प्राधान्य दिले. थोडक्यात सांगायचे, तर खान यांच्या तोंडाला पाने पुसली. आतातर खान यांना त्यांचे पद सोडून पायउतार व्हावे लागले आहे. ‘एखादे संकट आले की, मनुष्याच्या मनातील सत्य प्रामाणिकपणाच्या रूपाने तोंडाबाहेर पडते’, असा मानवी मनाचा नियम आहे. त्यास इम्रान खानही अपवाद नाहीत. त्यांनी जाता-जाता भारताचे कौतुक करत ‘भारताने ‘स्वतंत्र विदेशी धोरण’ राबवल्यानेच आज तो ताठ मानेने जगासमोर उभा आहे. जो आत्मविश्वासाने भारित असतो, त्याचा जग आदर करते’, असे म्हटले. एवढेच काय, तर काही आठवड्यांपूर्वी भारताच्या एका क्षेपणास्त्रातील तांत्रिक बिघाडामुळे त्याचे ‘चुकून’ प्रक्षेपण होऊन ते पाकच्या भूमीत जाऊन पडले. चूक भारताची होती; पण पाकने कोणतीच प्रतिक्रियात्मक सैनिकी कारवाई केली नाही. चीनही गप्प राहिला. हे सर्व प्रकार भारताच्या मुत्सद्दी, सामरिक नि भूराजकीय विशेषत्वाकडे अंगुलीनिर्देश करत नाहीत का ?

बरं, आतातर रशियाला वेगळे पाडण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, तसेच युरोपीय युनियन, ऑस्ट्रेलिया, जपान आदींनी कंबर कसलेली असतांना त्यांनाच ती भोवू लागली आहे. ‘रशियावर अवलंबून असलेली जर्मनीची अर्थव्यवस्था आर्थिक मंदीकडे गतीमानतेने वाटचाल करत आहे’, असे तेथील ‘डॉयचा बँके’ने घोषित केले. ब्रिटनलाही गेल्या ४० वर्षांतील सर्वाधिक महागाईस तोंड द्यावे लागू शकते. अमेरिकी डॉलरच्या ‘रिझर्व्ह करन्सी’चा (जागतिक व्यापारात वापरण्यात येणाऱ्या चलनाचा) लौकिक धुळीस मिळेल कि काय ? अशी स्थिती आहे. ‘जी गत गेल्या शतकाच्या मध्यात ब्रिटीश पाऊंडची (ब्रिटनचे चलन) झाली, ती डॉलरची होऊ शकते’, अशी शक्यता जागतिक बँक ‘गोल्डमन सॅक्स’ने वर्तवली आहे. जागतिक अस्थिरता माजलेली असतांना भारताचे रूप मात्र सोन्यासारखे उजळून निघत आहे. भारतातही पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर यांच्या दरवाढीमुळे महागाई वाढू शकते; परंतु एकूण स्थिती अन् रशियासमवेत अमेरिका, इराण आदी देशांशी असलेले ‘स्वतंत्र’ चांगले संबंध भारताला आगामी जागतिक महासत्तेकडे घेऊन जायला पुरेसे आहेत, असे केवळ विचार नव्हे, तर प्रत्यक्ष जागतिक घडामोडी जोरकसपणे सांगत आहेत !