भोंग्यांचा धर्म आणि ‘राज’ कारण !

  • मशिदींवरील अवैध भोंग्यांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य सरकारी यंत्रणा कधी दाखवणार ?
  • मशिदींवरील अवैध भोंग्यांवर नव्हे, तर हिंदूंवरच कारवाई करणारे उरफाटे प्रशासन !
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी ‘शिवाजी पार्क’वरील भाषणात मशिदींवरील भोंग्यांचा विषय उपस्थित केल्यामुळे हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाच्या विषयाला पुन्हा एकदा नव्याने वाचा फुटली. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर दुसऱ्या दिवशी महेंद्र भानुशाली या पदाधिकाऱ्यांनी घाटकोपर येथे मशिदीवरील त्रासदायक भोंग्यांचा प्रतिरोध म्हणून ध्वनीक्षेपकावर ‘हनुमान चालिसा’ लावली. यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. याचा अर्थ मूळ विषय ज्या अनधिकृत आणि अन्यायकारक गोष्टीवरून चालू झाला, तो बाजूलाच राहिला आणि नेहमीप्रमाणे हिंदूंना ‘शांतता भंग करणारे’ ठरवण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. काँग्रेसच्या ६ दशकांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे हिंदूंच्या देशात त्यांच्या देवाचे स्तोत्र लावल्यावर ५ सहस्र रुपये दंड होतो आणि ७ दशके जे भोंगे लावून बहुसंख्य हिंदु समाजावर शारीरिक अन् मानसिक अन्याय करत आहेत, ते मोकाटच रहातात.

अशांतता कुणामुळे ?

या घटनेच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले,‘‘ज्या देशात धर्माच्या नावावर राजकारण झाले, ते देश धुळीला मिळाले. सगळीकडे शांतता आहे. सगळे शांततेने रहात आहेत; पण तुम्हाला देशात अशांतता माजवायची असेल, एक पिढी उद्ध्वस्त करायची असेल तर करा.’’

“महाराष्ट्र पेटेल अशी वक्तव्य करू नका; श्रीराम जरूर म्हणा परंतु लोकांना ‘राम नाम सत्य है’ बोलायला लावू नका !

धर्मांधांच्या तुष्टीकरणामुळे हिंदूंच्या किती पिढ्या उद्ध्वस्त झाल्या, याचा पाढा वाचायला घेतला, तर कुणाचीही बोबडी वळेल. हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या; मंदिरावरील आक्रमणे; हिंदु मुली आणि महिला यांचे जीवन उद्ध्वस्त करून कुटुंबियांचीही न भरून निघणारी हानी करणे; ठिकठिकाणी दंगली करून घरे जाळणे; गोवंश, अमली पदार्थ, बनावट नोटा यांची तस्करी; बांगलादेशी, रोहिंग्या आदी घुसखोरांना नागरिकत्व देऊन येथील हिंदूंचे हक्क बळकावणे; हिंदूंना स्थानिक ठिकाणाहून पलायन करावे लागणे; आतंकवाद्यांना साहाय्य करणारे ‘स्लिपर सेल’ बनणे; हिंदूंना हलाल मांस खायला लावणे; येथील पैसा आतंकवाद्यांना पोचवणे, अशा एक ना अनेक गोष्टी आहेत. यांमुळे देश खरा ‘अशांत’ झाला आहे. याविषयी आव्हाड कधीच का बोलत नाहीत ? गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या वेळी प्रदूषणाविषयी गरळओक करणारे तथाकथित पर्यावरणप्रेमी प्रतिदिन अनधिकृत भोंग्यांतून निघणाऱ्या ७५ डेसिबलपेक्षा अधिक ध्वनीविषयी का बोलत नाहीत ? हिंदूंनी एका ठिकाणी प्रतिरोध म्हणून ध्वनीक्षेपक लावले म्हणून देशात अशांतता होणार नाही, तर ७ दशके हिंदूंवर जो घोर अन्याय झाला आहे, त्याची ही किंचितशी प्रतिक्रिया आहे, हे प्रसारमाध्यमे लक्षात का घेत नाहीत ? भले प्रतिरोध म्हणून ध्वनीक्षेपक लावण्यात एकवेळ राजकारण असूही शकेल; पण मशिदींवर लावलेल्या भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या सूत्राकडे प्रसारमाध्यमे दुर्लक्ष का करत आहेत ?

प्रदूषणकारी भोंग्यावर कारवाई नाहीच !

नवी मुंबईत यापूर्वी अनधिकृत भोंग्यांविरुद्ध दिला गेलेला मोठा लढा हिंदू विसरलेले नाहीत. वर्ष २०१४ मध्ये तेथील ‘४९ पैकी ४५ मशिदींनी भोंगे लावण्याची अनुमतीच घेतलेली नाही’, असे लक्षात आले. त्यानंतर संतोष पाचलग यांनी केलेल्या जनहित याचिकेनंतर न्यायालयाने आतापर्यंतच्या सर्व याचिका एकत्र करून १६ ऑगस्ट २०१५ या दिवशी कोणत्याही प्रार्थनास्थळावर रात्री १० ते सकाळी ६ (वर्षातील विहित १५ दिवस वगळता) ध्वनीक्षेपक लावणे कायद्याने अवैध ठरवले. या वेळी ‘प्रार्थनास्थळांवर ध्वनीक्षेपक लावणे हा मूलभूत अधिकार नाही’, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. ‘७५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज नको’, अशी अटही त्यात आहे. त्यासाठी १ लाख रुपयांपर्यंत दंड आणि ५ वर्षांचा कारावास अशी शिक्षाही आहे. वर्ष २०१८ मध्ये महाराष्ट्रात १ सहस्र ७६६ मशिदींवर अवैध भोंगे असल्याची माहिती माहितीच्या अधिकारात पुढे आली.

 

‘ऑगस्ट २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मशिदींवरील भोंगे ताबडतोब काढा’, असा आदेश परत एकदा काढला होता.  मुंबई उच्च न्यायालयाने २८ फेब्रुवारी २०२० या दिवशी शासनास अतिरिक्त प्रतिज्ञापत्रक प्रविष्ट करण्यास सांगितले असून शासनाने त्यासाठी थोडा कालावधी मागितला. त्यानंतर कोरोना संसर्ग आणि दळणवळण बंदी यांमुळे पुढील कार्यवाही झालेली नाही. मुंबईतील मानखुर्द येथे पी.एम्.जी. वसाहतीत रहाणाऱ्या करिष्मा भोसले या विद्यार्थिनीने मोठे धैर्य दाखवून त्या परिसरातील मशिदीतील मौलवींना जाब विचारला, तेव्हा तत्परतेने धर्मांध तरुण तिच्याभोवती गोळा झाले होते. गर्दी जमल्यावर मौलवी बाहेर आले. ‘कानात कापूस घाल’, असे उद्धट उत्तर तिला मिळाले. तिथे जाण्यापूर्वी तिने पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर उलट तिलाच पोलिसांची नोटीस मिळाली. पोलिसांना सांगूनही ना त्यांनी भोंग्याचे तोंड फिरवले ना आवाज न्यून केला; उलट तो वाढवला. सोनू निगम यांच्यासारख्या वलयांकित व्यक्तीही जेव्हा भोंग्यांच्या त्रासाविषयी बोलतात, तेव्हा त्यांना विरोध होतो. ‘धर्मांधांनी उद्दाम कारवाया करत रहायच्या आणि हिंदूंनी त्याविषयी काही बोलायचे नाही आणि आम्हीही त्याविषयी बोलणार नाही’, हीच तथाकथित सर्वधर्मसमभावी ढोंगी नेत्यांची शांतता किंवा सामाजिक सलोखा राखण्याची व्याख्या आहे; परंतु आता हिंदू जागृत होत असल्याने हे फार काळ चालणार नाही. हिंदूंवरील अन्याय बाहेर येण्याचे दिवस केव्हाच चालू झाले आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या भरघोस यशावरून हे चांगलेच सिद्ध झाले आहे. ३ राज्यांत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा होणे, कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायदा, तसेच मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होणे, काश्मिरींवरील अन्यायाला अमेरिकेतील मानवाधिकार संघटनेने वंशविच्छेद घोषित करणे, हलालविरोधात जागृती होणे आणि परत अवैध भोंग्यांचा विषय वर येणे, हे कालसुसंगत घडत आहे. हिंदूंनी मात्र आता धर्माच्या बाजूने रहायचे कि अधर्माच्या याचा निर्णय वेळोवेळी घ्यायचा आहे !