‘सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा रत्नागिरी जिल्ह्याच्या दौरा २ वर्षांनंतर आयोजित केला होता. ते रत्नागिरी सेवाकेंद्रात आल्यावर ‘त्यांचे अस्तित्व आणि सत्संग यांचा मला लाभ होऊ दे’, अशी माझी गुरुदेवांना (परात्पर गुरु जयंत बाळाजी आठवले यांना) प्रार्थना होत होती. देवाच्या कृपेने सद्गुरु दादांसह जिल्ह्याच्या दौऱ्याला जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर १०.१.२०२२ ते १८.१.२०२२ या कालावधीत सद्गुरु दादांसह सेवा करण्याचा आणि त्यांच्या सत्संगाचा लाभ घेता आला. या कालावधीत त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
१. जिल्हा दौऱ्याच्या कालावधीत येणारे सर्व अडथळे सद्गुरु सत्यवान कदम यांनी दूर केल्याचे अनुभवता येणे
अवेळी पाऊस पडून गेल्यानंतर जिल्ह्यात थंडीची लाट आली होती. रत्नागिरीत हिवाळ्यात विशेष थंडी पडत नसल्याने मला थंडीची सवय नाही. आम्ही रत्नागिरीहून देवरुख येथे निवासाला गेलो. तेव्हा तेथील साधकांनी सांगितले, ‘‘आज थंडी अल्प आहे.’’ दुसऱ्या दिवशी दापोली येथे निवासासाठी जायचे होते. तेथील तापमान ९ अंश सेल्सियस होते; पण आम्ही तेथे पोचताच साधकांनी सांगितले, ‘‘आज इथे थंडीच नाही.’’ आम्ही जसजसे एकेका केंद्रात जाऊ, तसतशी तेथील थंडी न्यून होत असे. त्यामुळे वातावरण आल्हाददायी असल्याचे आम्हाला अनुभवता आले.
२. सद्गुरु दादांच्या चरणी ‘दौऱ्यात थंडीचा त्रास होऊ नये’, यासाठी प्रार्थना केल्यावर त्यांच्या अस्तित्वाने तेथील वातावरण आल्हाददायक अन् चैतन्यमय होणे
थंडीमुळे माझी प्रकृती बिघडून माझ्या सेवेत अडथळा येईल; म्हणून ‘सेवेतील हा अडथळा दूर होऊ दे आणि पूर्ण दौऱ्यात स्वास्थ्य चांगले राहू दे’, अशी मी सद्गुरु दादांच्या चरणी प्रार्थना केली होती. त्यामुळे ‘सद्गुरु दादांनी सर्वत्रचे वातावरण आल्हाददायी आणि चैतन्यमय केले, असे जाणवले.’
३. सद्गुरु दादांना ‘डोके दुखत आहे’, असे सांगताच त्यांच्या संकल्पाने डोकेदुखी न्यून होणे
रात्री दापोली येथे गेल्यावर माझे डोके दुखू लागले. ‘आजारी पडलो, तर सेवेत अडथळा येईल’; म्हणून मला काळजी वाटत होती. मी सद्गुरु दादांना माझे डोके दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर लगेच माझी डोकेदुखी न्यून होऊ लागली आणि मला झोपही लागली. सकाळी मला आदल्या रात्रीच्या डोकेदुखीची जाणीवही नव्हती. सद्गुरु दादांच्या चैतन्यात पहाटेचा नामजप करता आला. ही केवळ त्यांचीच कृपा होय.
४. सद्गुरु दादांच्या समवेत असेपर्यंत प्रतिदिन लागणाऱ्या झोपेची आवश्यकता न भासणे
मला प्रतिदिन रात्री ६ ते ७ घंटे झोप लागते. झोप अपुरी झाली की, दुसऱ्या दिवशी मला निरुत्साह जाणवतो. सद्गुरु दादांसह असेपर्यंत पूर्ण दौऱ्यात रात्री स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी दैनंदिनी लिखाण इत्यादी व्यष्टी साधनेच्या कृती करून मला झोपायला रात्री ११.३० ते १२ वाजायचे, तरीही मी पहाटे ४ किंवा ५ वाजता उठायचो. पहाटे नामजपही भावपूर्ण होत होता. केवळ ४ ते ५ घंटे झोप होऊनही मला दिवसभर उत्साह जाणवायचा. झोप अपूर्ण झाल्याचे मला कधीही जाणवले नाही.
५. सद्गुरु दादा मार्गदर्शन करत असतांना ‘ते मार्गदर्शन साधकांच्या अंतर्मनापर्यंत जात आहे आणि चैतन्यामुळे साधकांना आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असे मला जाणवले.
६. सद्गुरु दादांच्या सहवासाने आळस आणि भीती हे तीव्र स्वभावदोष न्यून होणे
माझ्यात आळस आणि भीती हे स्वभावदोष तीव्र आहेत; परंतु सद्गुरु दादांच्या सहवासाने ते स्वभावदोष अल्प झाल्याचे मला जाणवले. आळस या स्वभावदोषामुळे मला सकाळी पटपट आवरता येत नसे, तसेच भीती या स्वभावदोषामुळे संतांचे वाहन चालवतांना मला दडपण यायचे. सद्गुरु दादांशी बोलतांनाही प्रथम मला भीती वाटायची; पण दादांचे प्रेमळ बोलणे आणि त्यांचा सत्संग यांमुळे मला दडपण किंवा भीती वाटली नाही.
७. सद्गुरु दादांना आत्मनिवेदन केल्यावर माझे मन मोकळे झाले. त्यांच्या समवेत बोलतांना आणि त्यांना काहीही विचारतांना मला आनंद मिळू लागला.
८. सद्गुरु दादांना सांगितल्यावर वास्तूमधील त्रास दूर होणे
एका साधकांच्या घरी आम्ही निवासाला होतो. तेथे रात्री झोपेत भयानक स्वप्न पडले आणि मला त्रास झाला. दुसऱ्या दिवशी मी ते विसरून गेलो. एका साधिकेने सद्गुरु दादांना त्या घरात तिला त्रास होत असल्याचे सांगितले. तेव्हा सद्गुरु दादांनी मला विचारले, ‘‘त्या घरात तुम्हाला त्रास जाणवला का ?’’ मी त्यांना मला रात्री पडलेल्या स्वप्नाविषयी आणि मला झालेल्या त्रासाविषयी सांगितले. त्यानंतर रात्री तेथे झोपल्यावर मला काहीच त्रास झाला नाही. सद्गुरु दादांच्या वास्तव्याने आणि संकल्पाने पूर्ण वास्तू शुद्ध झाल्याचे मला जाणवले.
९. नियमांचे पालन करणे
वाहनाने जवळचा प्रवास करायचा असला, तरी सद्गुरु दादा वाहनात बसल्यावर लगेच ‘सीट बेल्ट’ लावायचे.
‘सद्गुरु दादांच्या कृपेने त्यांचा अनमोल, चैतन्यदायी सत्संग आणि सहवास या गोष्टींचा मला लाभ घेता आला. मला सेवेची संधी दिली, याबद्दल सद्गुरु दादांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. गोविंद भारद्वाज, रत्नागिरी (१४.३.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |