३१.३.२०२२ या दिवशीच्या अंकात आपण ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनाची निर्मळता, इतरांचा विचार करणे, साधकांना साधनेसाठी अधिकाधिक साहाय्य करणे’ या गुणांविषयी जाणून घेतले. आजच्या भागात ‘आपल्या केवळ एका दृष्टीक्षेपात साधकांचे दुःख दूर करून त्यांना आनंद आणि शांती प्रदान करणारे ईश्वरस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवरील अनन्य प्रीती !’, यांविषयी पाहूया.
या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/566293.html
१०. ‘सनातनचे साधक परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्थूलदेहात अडकू नयेत’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी घडवलेला एक प्रसंग !
१० अ. प.पू. रामानंद महाराज यांनी रामनाथीहून परत जातांना अकस्मात् परात्पर गुरु डॉक्टरांना ‘इंदूरला चला’, असे म्हणणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवलेही त्वरित गाडीत बसणे : एकदा प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज रामनाथी आश्रमातील भावभेट संपवून इंदूरला (मध्यप्रदेश) जायला निघाले होते. त्यांचा निरोप घेण्यासाठी आणि त्यांना पोचवायला परात्पर गुरु डॉक्टर अन् बरेचसे साधक जमले होते. प.पू. रामानंद महाराज चारचाकीत जाऊन बसले आणि आता गाडी निघणार, एवढ्यात अकस्मात् ते परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाले, ‘‘चला डॉक्टर, आपण इंदूरला जाऊया.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी तिथे जमलेल्या सर्व साधकांकडे एक प्रेमळ दृष्टीक्षेप टाकला आणि गोड हसून हात हलवून साधकांचा निरोप घेऊन ‘‘येतो’’, असे म्हणत गाडीत बसले अन् गाडी निघाली.
१० आ. परात्पर गुरु डॉक्टर प.पू. रामानंद महाराज यांच्या समवेत गाडीतून गेल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना सोडून कुठेही जाणार नाहीत’, याची साधकांना निश्चिती असणे : हे सर्व अगदी अकस्मात् आणि क्षणार्धात घडून गेले. त्यामुळे सारे साधक अवाक् होऊन पहातच राहिले. मी रामनाथी आश्रमात आल्यापासून अल्प प्राणशक्ती आणि प्रकृती अस्वास्थ यांमुळे परात्पर गुरु डॉक्टर एक दिवसही आश्रमाच्या बाहेर गेले नव्हते. त्यामुळे माझ्या मनात ‘आजच ते इंदूरला का गेले ?’, असा विचार येऊन मी यजमानांना (श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांना) विचारले, ‘‘अहो, परात्पर गुरु डॉक्टर कुठे गेले ?’’ यजमान मला म्हणाले, ‘‘ते कुठेही जाणार नाहीत !’’ मी त्यांना म्हणाले, ‘‘प.पू. रामानंद महाराज त्यांना इंदूरला घेऊन गेले तर..!’’ तेव्हा यजमान मला म्हणाले, ‘‘ते जाणार नाहीत.’’ मी मनात म्हणाले, ‘ते गेले, तर आपण काय करू शकतो ? देवाची इच्छा !’
१० इ. पंधरा मिनिटांनी प.पू. रामानंद महाराज यांची गाडी परत येणे आणि परात्पर गुरु डॉक्टर गाडीतून खाली उतरून आश्रमात येणे : अशीच १५ मिनिटे गेली आणि गाडी परत आली. परात्पर गुरु डॉक्टर गाडीतून खाली उतरले अन् आश्रमात आले. ते बाहेर पडू शकत नाहीत; म्हणून त्यांच्या गुरूंनी त्यांना थोडे फिरवून आणले होते. ते परत आलेले पाहून सर्व साधकांना पुष्कळ आनंद झाला. तो सर्व साधकांच्या तोंडवळ्यावरून ओसंडून वहात होता.
परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना कधी आपल्या स्थूलदेहात अडकू दिले नाही. त्यासाठी त्यांनी साधकांना श्रीकृष्णाची भक्ती करायला लावली.
११. कुटुंबियांचे मायेतील प्रेम आणि गुरुमाऊलीचे निरपेक्ष प्रेम यांत जाणवलेला भेद !
११ अ. शिष्याने आपल्यासाठी (गुरूंसाठी) काही द्यावे किंवा करावे’, असे श्री गुरूंना कधीही न वाटणे; मात्र ‘शिष्याने स्वतःच्या जिवाचे कल्याण करावे आणि त्याला आनंदप्राप्ती व्हावी’, असे श्री गुरूंना वाटणे : मायेतील (संसारातील) आणि कुटुंबियांचे प्रेम सापेक्ष असते. त्यामुळे प्रत्येक जण दुसर्याकडून काही ना काही अपेक्षा करतो, उदा. पत्नी पतीकडून सहवासाची, बहीण भावाकडून धनाची, आई-वडील ‘मुलाने म्हातारपणी प्रेमाने चार घास खाऊ घालावे आणि औषध-पाणी करावे’, इत्यादी अपेक्षा करतात; पण गुरुमाऊलीचे प्रेम निरपेक्ष असते. त्यांना ‘शिष्याने आपल्यासाठी (गुरूंसाठी) काही द्यावे किंवा करावे’, असे वाटत नाही; मात्र ‘शिष्याने त्याच्या जिवाचे कल्याण करावे आणि त्याला आनंदप्राप्ती व्हावी’, असे वाटते.
११ आ. मायेतील प्रेम हे अपेक्षांसहित असणे; मात्र श्री गुरूंचे जिवावरील प्रेम निरपेक्ष असणे, जिवाला ईश्वरप्राप्ती होईपर्यंत श्री गुरूंचे जिवावरील प्रेम तसूभरही न ढळणे : मायेतील प्रेम क्षणिक, म्हणजे नश्वर असते. ते या जन्मापुरतेच असते. देवाण-घेवाण हिशोब संपला की, कुटुंबीय आपल्याला सोडून जातात. मायेतील प्रेम आपल्याला संसार बंधनात अडकवते. ‘मी कुटुंबासाठी एवढे सर्व केले, आता त्यांनी माझ्यासाठी निदान एवढे तरी करायला हवे’, या अहंकारामुळे कुटुंबियांकडून अपेक्षा होते अन् आसक्तीमुळे देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतात. त्यामुळे जीव जन्म-मृत्यूच्या बंधनात अडकतो; मात्र श्री गुरूंचे शिष्यावरील प्रेम शाश्वत आणि सर्वांवर समान असते. आपल्या पहिल्या जन्मापासून ते आपल्या शेवटच्या जन्मापर्र्यंत श्री गुरुच आपल्याला सांभाळतात. आपल्याकडून साधना करवून घेऊन तेच आपल्याला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करतात. जिवाला ईश्वरप्राप्ती होईपर्यंत श्री गुरूंचे जिवावरील प्रेम तसूभरही ढळत नाही.
११ इ. मायेतील प्रेमात द्वैत (मी-तू पणाची जाणीव) असते, तर गुरुमाऊलीच्या प्रेमात अद्वैत (एकरूपता) असते.
१२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या साधकांवरील अलौकिक आणि आत्मवत् प्रीतीवर्षावामुळे साधक तृप्त होणे, त्याला मोक्षाचीही अपेक्षा न रहाणे
तो परमात्मा (सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले) प्रत्येक जिवात आत्मरूपाने विलसत आहे. त्याची प्रत्येक जिवावर आत्मवत् (स्वतःची स्वतःवर असते, तशी) प्रीती आहे. ‘प्रत्येक जिवाशी तो एकरूप होऊन जातो (आईला बाळाला ‘काय हवे-नको’, ते बाळाशी असलेल्या तिच्या एकरूपतेमुळे समजते, तद्वत श्री गुरु जिवाशी एकरूप होतात.) आणि ते त्यांच्या प्रीतीच्या वर्षावाने जिवाला चिंब भिजवून टाकतात. अशी ही ईश्वराची प्रीती साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून सगुणातून अनुभवत आहेत. ‘त्यापुढे मोक्षही फिका पडावा’, असे हे दिव्य निरपेक्ष प्रेम ! ते निरंतर असून साधकांना आनंद, चैतन्य आणि तृप्ती देते. त्यांच्या या आत्मवत् आपलेपणा आणि प्रीती यांनी सनातनचे सर्व आश्रम अन् सर्व साधक ओतप्रोत भरून गेले आहेत.
(क्रमश: सोमवारच्या अंकात)
– गुरुचरणी शरणागत,
सौ. शालिनी मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०२१)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/567703.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |