आज हात, भविष्यात लाथ !

 

एम्.आय्.एम्.’ या कट्टर पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेससमवेत आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. याच ‘एम्.आय्.एम्.’ पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी ‘१५ मिनिटांसाठी पोलीस बाजूला करा. देशातील २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना १५ मिनिटांत ठार करतील’, असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. काही मासांपूर्वी या पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही ‘योगी मठात जातील, मोदी हिमालयात जातील, तेव्हा तुम्हाला वाचवायला कोण येईल ?’, अशी हिंदूंना संपवण्याची धमकी दिली होती. एवढ्या पराकोटीचा हिंदुद्वेष असलेल्या अशा धर्मांध मंडळींना लोकशाहीत निवडणूक लढवून सत्तेत येण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे; मात्र भविष्यात ही मंडळी सत्तेत आल्यास राज्यघटनेला मानतील का ? हा खरा प्रश्न आहे. आज अल्पसंख्यांक असूनही जे हिंदूंना संपवण्याची भाषा करत आहेत, त्यांनी सत्तेत येण्यासाठी काफिरांकडे हात मागणे, ही त्यांची अगतिकता आहे. आज सत्तेत येण्यासाठी हात पुढे करणारे, भविष्यात हिंदूंना लाथ मारतील, हे सांगण्यासाठी कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील पालटणार्‍या या राजकीय समीकरणांचा हिंदूंनी वेळीच विचार करायला हवा.

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राज्यात काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर जरी काँग्रेसमध्ये फूट पडली, तरी राज्याची सत्ता या दोन्ही काँग्रेसमध्येच राहिली. वर्ष १९९५ आणि २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युतीचा जेमतेम १० वर्र्षांच्या काळ वगळता महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस बहुमतात सत्तेत राहिले आहेत. वर्ष १९६२ मध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या विधीमंडळाच्या निवडणुकीत २६४ जागांपैकी २१५ जागा मिळवणार्‍या काँग्रेसला वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६४ जागाही मिळवता आल्या नाहीत. महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा असलेला हा पक्ष सध्या चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. ‘राज्याचे नेतृत्व करील’, असा सक्षम नेताही या पक्षाकडे राहिलेला नाही. दुसरीकडे वार्धक्यातही महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या शरद पवार यांनी स्वत:च्या खिशात ठेवल्या आहेत; मात्र ‘स्वत: नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कुणाकडे ?’, हे अद्यापही त्यांनी घोषित केलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व घोषित केल्यावर होणार्‍या पक्षफुटीची भीती कदाचित् पवार यांना असावी. एकंदरीत सद्यःस्थिती पहाता भविष्यात या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली, तरी ते सत्ता स्थापन करतील, अशी स्थिती नाही. हे दोन्ही काँग्रेस पक्ष अस्तित्वहीन होणे, यातच ‘एम्.आय्.एम्.’चा राजकीय लाभ आहे; मात्र सध्या तरी कोणत्या तरी राजकीय पक्षासमवेत हातमिळवणी करणे, ही ‘एम्.आय्.एम्.’ची राजकीय आवश्यकता आहे.

राजकीय वर्चस्व प्रस्थापित होण्यापुरतीच राष्ट्रवादी काँग्रेस !

आतापर्यंत राज्यात अल्पसंख्यांकांचे स्वतंत्र नेतृत्व नसल्यामुळे त्यांची एकगठ्ठा मते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पारड्यात पडत होती. आता मात्र ‘एम्.आय्.एम्.’च्या रूपात महाराष्ट्रात अल्पसंख्यांकांचे स्वतंत्र राजकीय नेतृत्व प्रस्थापित होऊ पहात आहे. भविष्यात अल्पसंख्यांकांची एकगठ्ठा मते ‘एम्.आय्.एम्.’कडे जाण्याचीच शक्यता आहे. ‘एम्.आय्.एम्.’च्या नेत्यांची मागील वर्षभरापासूनची भाषणे पाहिल्यास त्यांनी भाजपला नव्हे किंवा शिवसेना यांना नव्हे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना लक्ष्य केले आहे; कारण ‘हिंदूंची मते आपणाला मिळणार नाहीत’, हे ‘एम्.आय्.एम्.’वाले जाणतात. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे जाणारी अल्पसंख्यांकांची मते स्वत:कडे ओढणे, हेच ‘एम्.आय्.एम्.’चे प्राधान्य आहे. त्यामुळे सध्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच ‘एम्.आय्.एम्.’चे राजकीय शत्रू आहेत. केवळ अल्पसंख्यांकांच्या मतांवर सत्तेत येणे शक्य नाही, यामुळे सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओंजळीने पाणी पिण्यावाचून ‘एम्.आय्.एम्.’ला पर्याय नाही.

मुसलमानांचे संख्याबळ वाढवण्याची नीती !

स्वत:चे राजकीय अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आघाडीसाठी हात पुढे करणे, ही ‘एम्.आय्.एम्.’ची आजची अगतिकता आहे. प्रस्थापित होईपर्यंत याला पर्याय नाही, हे ‘एम्.आय्.एम्.’वाले जाणून आहेत. जेव्हा कोणत्याही राजकीय पक्षाची स्थापना ही सत्तेत येण्यासाठीच होत असते आणि ‘एम्.आय्.एम्.’ सारखा राजकीय पक्ष हा काही भारतातील लोकशाही बळकट करण्यासाठी किंवा येथील बहुसंख्य समाजाचे हित साधण्यासाठी स्थापन झालेला नाही. भारतातील अल्पसंख्यांकांना सत्तेत प्रस्थापित करण्यासाठीच ‘एम्.आय्.एम्.’ची स्थापना झाली आहे. महाराष्ट्रात मुसलमानांची संख्या १८-२० टक्के आहे. एवढ्या संख्यबळात आणि अहिंदूंच्या मतांविना एखाद-दुसरा उमेदवार निवडून येईल. त्यामुळे ‘सत्तेत यायचे असेल, तर मुसलमानांचे संख्याबळ वाढवल्याविना पर्याय नाही’, हे ‘एम्.आय्.एम्.’ वाले समजून आहेत. त्यामुळे एकीकडे राजकीय प्रयत्न चालू असतांना दुसर्‍या बाजूला स्वत:चे संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न करणे, हाही ‘एम्.आय्.एम्.’चा राजकीय अजेंडा राहील, हे निश्चित !

प्रश्न हा आहे की, हिंदूंना संपवण्याची भाषा करणारे भविष्यात ५० टक्के होऊन सत्तेत आल्यास ते धमक्या देत बसणार नाहीत, हेही तितकेच निश्चित. ते थेट कृती करतील. हिंदूंना संपवतांना तो काँग्रेसवाला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसवाला, शिवसेना कि भाजपवाला, हे कुणी पहाणार नाही, तर ज्यांना संपवायचे आहेत, तो ‘काफिर’ आहे का ? एवढेच पाहिले जाईल, हे राजकीय नेत्यांच्या लक्षात येईल तो सुदिन !