‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याच्या प्रस्तावास मान्यता न दिल्याने विरोधकांचा विधानसभेत गदारोळ !

विरोधकांकडून सभागृहात जोरदार घोषणा !

मुंबई, ११ मार्च (वार्ता.) – ११ मार्च हा छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘बलीदान दिवस’ आहे. या निमित्ताने ‘संभाजीनगर’ नामकरणाच्या प्रस्तावास लागणारी सर्व पूर्तता ४ मार्च २०२० या दिवशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आजच्या दिवशी ‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याच्या प्रस्तावास मान्यता द्यावी, अशी मागणी विधानसभेत औचित्याच्या सूत्राद्वारे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी ११ मार्च या दिवशी केली; मात्र या मागणीला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि मंत्री यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने भाजपच्या आमदारांनी विधानसभेत गदारोळ घातला. या वेळी भाजपच्या आमदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जाऊन ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडले. या वेळी सत्ताधारी शिवसेनेच्या काही आमदारांनी अशाच घोषणा दिल्या.

 

प्रस्ताव सादर करतांना सुधीर मुनगंटीवर पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी महाराज यांचे ३० दिवस औरंगजेबाच्या सैनिकांनी प्रचंड हाल केले. त्यांना अनेक यातना देण्यात आल्या. इतके झाल्यावरही त्यांनी ‘मी धर्मांतर करणार नाही’, अशी ठाम भूमिका घेतली. आजपर्यंत आपण अनेक शहरे आणि रस्ते यांची नावे पालटली आहेत. ‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’ करणे याची मूळ कल्पना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्यामुळे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे किंवा संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सरकारच्या वतीने ही घोषणा आज करावी.’’

काँग्रसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘हे नाव पालटल्याने काय होते ?’ असा प्रश्न उपस्थित केला, तेव्हा याला उत्तर देतांना मुनगंटीवार म्हणाले की, प्रत्यक्षात थोरात यांचे नाव ‘विजय’ असतांना त्यांनी नाव पालटून ‘बाळासाहेब’ का केले ? याचे उत्तर द्यावे. संभाजीनगर नाव देण्याविषयी केंद्र शासनाकडून काही साहाय्य असल्यास ते मी करेन.