योगी आदित्यनाथ यांनी मोडले ३ मोठे विक्रम !

योगी आदित्यनाथ

नवी देहली – उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सलग दुसर्‍यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनणार आहेत. यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या नावे तीन मोठ्या विक्रमांची नोंद झाली आहे.

१. योगी आदित्यनाथ सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत. एकूणच उत्तरप्रदेश राज्याच्या इतिहासात सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनणारे योगी आदित्यनाथ पाचवे मुख्यमंत्री असणार आहेत. याआधी अशी कामगिरी काँग्रेसच्या नारायण दत्त तिवारी यांनी तब्बल ३७ वर्षांपूर्वी वर्ष १९८५ मध्ये केली होती.

२. उत्तरप्रदेशच्या जनतेने आतापर्यंत भाजपचे एकूण चार मुख्यमंत्री पाहिले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्याआधी कल्याण सिंह, रामप्रकाश गुप्ता आणि विद्यमान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे उत्तरप्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री राहिले आहेत; परंतु यांपैकी कुणीही सलग दुसर्‍यांदा सत्ता राखू शकलेला नाही.

३. योगी आदित्यनाथ हे १५ वर्षांनंतर विधानसभेतून निवडून आलेले पहिलेच मुख्यमंत्री असणार आहेत. याआधी माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती या वर्ष २००७ ते २०१२ या कालावधीत, माजी मुख्यमंत्री अन् समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे वर्ष २०१२ ते २०१७ या कालावधीत, तर योगी आदित्यनाथ हे वर्ष २०१७ ते २०२२ या पहिल्या कार्यकाळात विधानपरिषदेतून निवडून आले होते.

भाजपकडून उत्तरप्रदेशात एकाही मुसलमानाला उमेदवारी नाही !

भाजपच्या या यशाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे राज्यात तब्बल २० टक्क्यांहून अधिक मुसलमान लोकसंख्या असूनही त्यांचे लांगूलचालन न करता भाजपने एकाही मुसलमानाला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली नव्हती.