अयोध्येतील श्रीराममंदिराच्या मार्गावरील चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देणार ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा

डावीकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भारतरत्न लता मंगेशकर

कासगंज (अयोध्या) – लता मंगेशकर या रामभक्त होत्या. त्यामुळे अयोध्येत भव्य श्रीराममंदिर उभे रहात असतांना लतादीदींचेही स्मरण व्हावे, असे आम्हाला वाटते. त्यासाठी श्रीराममंदिराकडे जाणारे जे मुख्य मार्ग असतील, त्यांवरील एका प्रमुख चौकाला भारतरत्न लता मंगेशकर यांचे नाव देण्यात येईल. हा आमच्या सरकारचा संकल्प आहे, अशी घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथील जाहीर सभेत केली. या वेळी उपस्थित पंतप्रधान मोदी यांनी या घोषणेचे स्वागत केले. ‘लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक अकादमी बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे’, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले की, रामभक्त लतादीदींनी प्रभु श्रीरामांवरील अनेक भक्तीगीते त्यांच्या दैवी सूरांनी अजरामर केली आहेत. त्यामुळे लतादीदींचे नाव श्रीराममंदिर मार्गावरील चौकाला दिल्यास तो अपूर्व योग ठरेल.