रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील स्वागतकक्षामध्ये लावलेल्या कोटा लादीवर पडलेले प्रतिबिंब अधिक सुंदर दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र !

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या येथील आश्रमाकडे पुष्कळ प्रमाणात दैवी चैतन्य आकृष्ट झाल्यामुळे आश्रमाची शुद्धी होऊन आश्रमातील लाद्या आणि काचा यांच्यामध्ये आप अन् तेज तत्त्वात्मक चैतन्यलहरी पुष्कळ प्रमाणात वाढलेल्या आहेत.

१. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या सांगण्यावरून आश्रम परिसरात अभिमंत्रित वस्तू पुरल्यामुळे भूमी अन् वातावरण यांची शुद्धी झालेली असणे

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या सांगण्यावरून आश्रमाच्या रक्षणासाठी आश्रम परिसरात दैवी शक्तीने भारित झालेल्या अनेक अभिमंत्रित वस्तू पुरल्या आहेत. या वस्तूंमध्ये कार्यरत असणार्‍या दैवी शक्तीमुळे आश्रम आणि भूमी यांच्यामध्ये पृथ्वी अन् आप या तत्त्वांच्या स्तरावर सूक्ष्मातून दैवी शक्तीचे संरक्षककवचरूपी आच्छादन निर्माण झाले आहे. त्यामुळे पाताळातील वाईट शक्तींना आश्रमात प्रवेश करता येत नाही. त्याचप्रमाणे या अभिमंत्रित वस्तूंतून प्रक्षेपित झालेल्या तेज तत्त्वाच्या स्तरावरील चैतन्यलहरींमुळे आश्रमाच्या बाहेरील वातावरणाची शुद्धी झाली. त्यामुळे आश्रमातील भूमी, वास्तू आणि वातावरण यांच्याकडे उच्च लोकांतील निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्य पुष्कळ प्रमाणात आकृष्ट होत आहे. त्यामुळे आश्रमातील लाद्या आणि काचा यांच्यामध्ये आप अन् तेज या तत्त्वांच्या स्तरावरील चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक प्रमाणात निर्माण झाली आहे.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यामुळे आपतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या आपतत्त्वमय चैतन्यामुळे आश्रमातील लाद्या आणि खिडक्यांची तावदाने यांतील आपतत्त्वाचे प्रमाण वाढले आहे. सामान्य ठिकाणी ‘आपतत्त्वाचा गुणधर्म त्यावर पडलेल्या बिंबाचे परावर्तन करणे’, हा असतो. आश्रमातील लाद्या आणि त्यांवर पडणारे बिंब या दोन्ही घटकांमध्ये आप आणि तेज या दोन्ही घटकांचे प्रमाण अन्य ठिकाणी असणार्‍या लाद्यांच्या तुलनेत अधिक आहे. ‘आश्रमातील लाद्यांमधील चैतन्यदायी आपतत्त्व अधिक असल्यामुळे त्यावर पडलेले बिंब परावर्तित करण्याची क्षमता अधिक असते. त्याचप्रमाणे आश्रमातील लाद्यांमध्ये चैतन्यदायी तेजतत्त्व अधिक प्रमाणात असल्यामुळे लाद्यांवर पडलेले बिंब अधिक सुस्पष्ट आणि छान दिसते.

३. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यदायी लहरींमुळे लाद्यांवर पडलेले बिंब सुंदररित्या स्थुलातून प्रतिबिंबित होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यदायी लहरींमुळे आश्रमातील प्रत्येक घटकाची शुद्धी होते. त्यामुळे आश्रमातील लाद्या, भिंती आणि काचा यांच्यामध्ये दैवी चैतन्य ग्रहण अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. त्यांच्या चरणांतून प्रक्षेपित झालेल्या तेजतत्त्वाच्या स्तरावरील चैतन्यदायी लहरींमुळे आश्रमातील लाद्यांची शुद्धी झाली आहे. त्यामुळे लाद्यांवर पडलेले चैतन्यदायी बिंब चैतन्याच्या स्तरावर प्रतिबिंबित होते. या लाद्यांमध्ये तेजतत्त्व कार्यरत असल्यामुळे त्यांवर पडलेल्या बिंबामध्ये तेजोमय चैतन्याच्या सूक्ष्मतम लहरी अधिक प्रमाणात कार्यरत झाल्यामुळे या लाद्यांवर पडलेले बिंब सुंदररित्या स्थुलातून प्रतिबिंबित होतांना दिसते.

आश्रमातील चैतन्यामुळे तळमजल्यावरील लाद्या पारदर्शक झाल्यामुळे त्यांच्यावर सुंदररित्या दिसत असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आणि अन्य वस्तूंचे प्रतिबिंब

४. आश्रमातील लाद्यांवर प्रतिबिंब अधिक सुंदर आणि सुस्पष्ट दिसल्यामुळे सूक्ष्म स्तरावर होणारे परिणाम

लाद्यांतील आपतत्त्वामुळे त्यांवर पडलेले प्रतिबिंब चांगल्या प्रकारे परावर्तित होते आणि त्यातील तेजतत्त्वामुळे ते प्रतिबिंब स्थुलातून अधिक सुस्पष्ट अन् सुंदर दिसते. त्यामुळे आश्रमातील लाद्यांतून पुष्कळ प्रमाणात आप आणि तेज या तत्त्वांच्या स्तरावरील चैतन्यदायी लहरींचे प्रक्षेपण होऊन आश्रमातील वातावरण सतत शुद्ध रहाते. त्यामुळे आश्रमात रहाणार्‍या साधकांना चैतन्यदायी वातावरणात राहून साधना अधिक एकाग्रतेने, मनापासून आणि भावपूर्णरित्या करता येते.

५. कृतज्ञता

चैतन्याचा आश्रमातील लाद्यांवर आप आणि तेज या तत्त्वांच्या स्तरावर कसा परिणाम होतो, हे वरील उदाहरणातून अनुभवण्यास मिळाले, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.२.२०२२ सायं ४.३२)

आश्रमातील तळमाळ्यावरील लाद्यांवर पडलेले प्रतिबिंब अधिक प्रमाणात छान दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र आणि त्याचे सूक्ष्म स्तरीय परिणाम

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (६.२.२०२२ सायं ४.३२)