छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात बसवण्यासाठी विरोध होणे दुर्दैवी ! – संपादक
मिरज (जिल्हा सांगली), २ फेब्रुवारी (वार्ता.) – जत येथे वर्ष १९६७ मध्ये तत्कालीन कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. वर्ष २००६ मध्ये एका वाहनाच्या धडकेत पुतळ्याची हानी झाली. यानंतर गेल्या १६ वर्षांत हा पुतळा लावण्यात आलेला नाही. पुतळा उभा करण्यासाठी वर्ष २०१५ मध्ये चबुतराही बांधण्यात आला आहे. आता त्यासाठी लागणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा सिद्ध असून तो बसवण्यास प्रशासनाने विरोध दर्शवला आहे; मात्र कोणत्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यातच येईल, अशी माहिती भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिली. विलासराव जगताप यांनी मिरज येथे या पुतळ्याची पहाणी केली आणि त्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहात एका बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
विलासराव जगताप पुढे म्हणाले, ‘‘प्रथम हा पुतळा नियोजित जागेत बसवून त्याचे अनावरण करण्यात येईल. सध्या प्रशासन जिल्हाधिकार्यांची अनुमती घेऊनच पुतळा बसवावा, असे सांगत आहे. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराज ज्या राज्यात जन्मले त्यांच्या नावाने हे शासन राज्य कारभार पहात आहे आणि तेच पुतळा बसवण्यासाठी आडमुठी भूमिका घेत आहे, हे बरोबर नाही. पुतळा बसवण्यास विरोध केला, तर जी परिस्थिती निर्माण होईल, त्यास शासनच उत्तरदायी असेल.’’