ज्ञानशक्ती प्रसार अभियानांतर्गत गोवा राज्य, तुळजापूर आणि कोल्हापूर (महाराष्ट्र) येथे अभियानाला समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी संकलित केलेले विविध विषयांवरील ग्रंथ हे पुढील अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त आहेत. ही अनमोल ग्रंथसंपदा समाजापर्यंत पोचवण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने हे राष्ट्रव्यापी ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ग्रंथांचा प्रसार होत असून समाजातून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कुमारी)) स्वाती खाडये या पश्चिम महाराष्ट्रात या अभियानाचा प्रसार कसा करावा ? या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. या वेळी सर्वच स्तरांतून त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. ग्रंथांचा प्रसार करतांना गोवा राज्य, तुळजापूर आणि कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील साधकांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव येथे दिले आहेत.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

१. गोवा

‘सनातनचे ग्रंथ समाजातील विविध घटकांना आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मार्गदर्शक आहेत’, असे भाजपचे गोवा राज्यसभा खासदार श्री. विनय तेंडुलकर यांनी सांगणे

श्री.विनय तेंडुलकर

भाजपचे राज्यसभा खासदार श्री. विनय तेंडुलकर यांची साधकांनी भेट घेतली. तेव्हा त्यांनी ग्रंथ पाहून समाधान व्यक्त केले आणि म्हणाले, ‘‘सनातनचे ग्रंथ समाजातील विविध घटकांना आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मार्गदर्शक आहेत. लहान मुलांवर संस्कार करणे, स्त्रियांनी स्वयंपाक कसा करावा ? योग्य औषधे आणि उपचारपद्धती’, असे सर्वच विषय महत्त्वाचे आहेत.’’

२. तुळजापूर (जिल्हा धाराशिव)

श्री तुळजाभवानी मंदिराचे पुजारी श्री. बूबासाहेब पाटील यांनी त्यांच्याकडे येणार्‍या भाविकांना भेट देण्यासाठी ‘देवीपूजनाचे शास्त्र’ या १०० लघुग्रंथांची खरेदी केली.

३. कोल्हापूर (महाराष्ट्र)

प्रसार करतांना आलेले अनुभव

अ. संकेर (जिल्हा कोल्हापूर) येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि दैनिक‘सनातन प्रभात’चे वाचक आधुनिक वैद्य नंदकुमार हावळ यांनी वाढदिवसानिमित्त संस्कारांविषयी असलेले ग्रंथ शाळांमध्ये भेट दिले.

आ. शाहूवाडी तालुक्यातील वाडीचरण येथील ज्ञानेश्वर वाचनालयात वाचकांना ग्रंथ उपलब्ध व्हावेत, यासाठी वाचनालय प्रमुख आणि शिक्षक श्री. बाबासाहेब चौगुले यांनी ग्रंथांची मागणी केली.

इ. शाहूवाडी तालुक्यातील सरुड येथील ज्ञानेश्वर वाचनालयाचे प्रमुख श्री. संभाजी पाटील यांनी ग्रंथांची मागणी केली.

ई. कोल्हापूर येथील श्री. प्रदीप वर्णेकर यांचे मित्र श्री. ऐनापुरे यांना ग्रंथांची सर्व माहिती सांगितली. त्यांना ग्रंथ पुष्कळ आवडले आणि त्यांनी त्वरित त्यांच्या गावातील ग्रंथालय अन् मंदिर यांमध्ये देण्यासाठी ग्रंथांचे संच विकत घेतले.

उ. गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘ऑनलाईन’ साधना सत्संगातील जिज्ञासू श्रीमती बीना देसाई यांनी पतीच्या श्राद्धाच्या निमित्ताने नातेवाइकांना भेट देण्यासाठी ग्रंथांचे संच विकत घेतले.

ऊ. पणुंद्रे येथील ‘जुगाईदेवी हायस्कूल’ येथील पालक मेळाव्यात ग्रंथ वितरित करणारे कोल्हापूर शहरातील ‘मारुति ग्लास’चे उद्योजक श्री. नारायण डोंबे ! : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील पणुंद्रे (भोसलेवाडी) येथील आणि कोल्हापूर शहरातील ‘मारुति ग्लास’चे उद्योजक श्री. नारायण डोंबे यांनी लघुग्रंथांचे संच घेतले. हे लघुग्रंथ त्यांनी पणुंद्रे येथील ‘जुगाईदेवी हायस्कूल’ येथील पालक मेळाव्यात वितरित केले. या हायस्कूलमध्ये आजूबाजूच्या १२ वाड्या अन् वस्त्या येथील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी हे ग्रंथ पोचण्यास साहाय्य झाले.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था. (२४.१०.२०२१)


सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये घेत असलेल्या भावजागृतीच्या प्रयोगात ‘शिवाच्या नेत्रातून दैवी कणांचा वर्षाव होत आहे’, असे सांगत असतांना साधकाला त्याच्या मांडीवर विविध रंगांचे दैवी कण आढळणे

श्री. संजय घाटगे

‘सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये ‘ज्ञानशक्ती प्रसार मोहिमे’साठी सांगली-सातारा येथील साधकांना साधनेच्या स्तरावर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करतात. मार्गदर्शनापूर्वी त्या भावजागृतीचा प्रयोग करवून घेतात. १८.१०.२०२१ या दिवशी भावजागृतीच्या प्रयोगाच्या वेळी त्यांनी साधकांना सूक्ष्मातून शिवलोकात नेले. त्या म्हणाल्या, ‘‘शिवाने त्याचे नेत्र उघडले आहेत. त्यातून पावसाच्या थेंबाप्रमाणे दैवी कणांचा वर्षाव होत आहे.’’ त्या वेळी त्यांनी सूक्ष्मातून केलेल्या भावार्चनेतील ‘दैवी कण माझ्या शरिरावर कुठे दिसत आहेत का ?’, हे मी पहात होतो; पण मला शरिरावर दैवी कण दिसत नसल्याने ‘सद्गुरु स्वातीताई घेत असलेल्या भावजागृतीच्या प्रयोगाशी मला एकरूप होता आले नाही’, असे वाटून मला विलक्षण खंत वाटली. थोड्या वेळाने पाहिले, तर मला माझ्या उजव्या मांडीवर एक मोरपिशी, लाल, निळा असे विविध रंगांचे दैवी कण आढळून आले. तेव्हा माझे डोळे कृतज्ञतेने भरून आले. ते कण एक घंट्यांहून अधिक काळ त्या ठिकाणी होते. सद्गुरु स्वातीताई सूक्ष्मातील भावार्चनेची घेत असलेल्या भावजागृतीच्या प्रयोगाची प्रचीती देवाने मला दिली. त्यासाठी कृतज्ञता !’

– श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. (१८.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक