गोवंशियांच्या हत्यांच्या विरोधात उपोषणाला बसणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी कह्यात घेऊन ९ घंटे पोलीस ठाण्यात तिष्ठत बसवून ठेवले !

  • महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा असतांनाही गोवंशियांची हत्या होते. हे पोलिसांसाठी लज्जास्पद आहे. गोहत्या करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई केली असती, तर हिंदुत्वनिष्ठांवर उपोषण करण्याची वेळच आली नसती ! – संपादक
  • धर्मांधांशी असा व्यवहार करण्याचे पोलिसांचे धारिष्ट्य झाले असते का ? – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

विरार, २७ जानेवारी (वार्ता.) – वसई आणि विरार या शहरांमध्ये गोवंशियांच्या हत्या वाढत असून अनधिकृत पशूवधगृहेही बांधली जात आहेत. यांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयासमोर २६ जानेवारी या दिवशी उपोषणाला बसण्यासाठी आले होते. या वेळी विरार पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत सर्वश्री राजेश पाल आणि स्वप्नील शहा या हिंदुत्वनिष्ठांना कह्यात घेऊन त्यांना ९ घंटे पोलीस ठाण्यात तिष्ठत बसवून ठेवले.

१. तत्पूर्वी २४ जानेवारी या दिवशी राजेश पाल यांनी नियमाप्रमाणे उपोषण करणार असल्याची माहिती राज्यपाल, मुख्यमंत्री आणि सर्व संबंधित विभागांना ई-मेलद्वारे कळवली होती. त्यावर २५ जानेवारीला पोलिसांनी उपोषणकर्त्यांना उपोषण करण्यापासून परावृत्त करण्यासाठी नोटीस बजावून कारवाई करण्याची चेतावणी दिली होती.

२. पालघरचे अप्पर जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवून ‘राजेश पाल यांच्या तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करून त्यांना उपोषण करण्यापासून परावृत्त करण्यात यावे’, असा आदेश दिला होता; मात्र पाल यांच्या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही केली नाही.

३. उलट पोलिसांनी उपोषणाला बसणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे (जमावबंदीच्या आदेशाच्या उल्लंघनाच्या प्रकरणी कारवाई करण्याची) कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस बजावली होती.

४. २६ जानेवारीला सकाळी ८ वाजता उपोषणस्थळी आलेल्या राजेश पाल आणि स्वप्नील शहा या हिंदुत्वनिष्ठांना कह्यात घेऊन विरार पोलीस ठाण्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत तिष्ठत बसून ठेवले. ‘कोणत्या कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली’, याची माहितीही दखवण्याचे सौजन्य पोलिसांनी दाखवले नाही. इतकेच नव्हे, तर हिंदुत्वनिष्ठांच्या घरच्यांनाही कोणतीही माहिती दिली नाही.

५. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुरेश वर्‍हाडे यांना संपर्क केला असता ते म्हणाले, ‘‘झेंडावंदनाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी असे उपोषण करणे उचित नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून उपोषणकर्त्यांना केवळ कह्यात घेण्यात आले आहे. त्यांना अटक केलेली नाही. त्यांनी अर्जात नमूद केलेली उपोषणाची वेळ संपली की त्यांना सोडण्यात येणार आहे.’’