जकार्ता समुद्रात बुडण्याच्या शक्यतेने इंडोनेशिया नुसंताराला बनवणार राजधानी !

जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियाची राजधानी जकार्ता  पुढील काही वर्षांत समुद्रात पूर्णतः बुडण्याची शक्यता असल्याने इंडोनेशियाने राजधानी पालटण्याचा निर्णय घेत नुसंतारा हे शहर यापुढे राजधानी करण्याचा निर्णय घेतला आहे. नुुसंताराला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. इंडोनेशियाचे पंतप्रधान सुहार्सो मोनॉर्फा म्हणाले, ‘‘नुसंतारा ही इंडोनेशियाची खरी ओळख ठरेल, अशा दर्जाचे ते शहर बनवले जाईल. ते आर्थिक विकासाचे केंद्रही असेल.’’

‘नुसंतारा’ शहराचा इतिहास

१४  व्या शतकामध्ये येथील जावा बेटावर मजापहीत साम्राज्याचा हिंदु राजा हयम वुरुक याचे राज्य होते. त्याच्या पंतप्रधानाचे नाव गज: मद असे होते. वरुक याने प्रतिज्ञा केली होती की, जोपर्यंत नुसंतारावर विजय मिळवत नाही, तोपर्यंत मांसाहार करणार नाही. याचा अर्थ  होता की, जोपर्यंत सध्याचे सिंगापूर, मलेशिया, ब्रुनेई, दक्षिण थायलंड आणि फिलीपाईन्स ही शहरे जिंकत नाही, तोपर्यंत मांसाहार करणार नाही. वरुक यांनी नुसंतारावर अंततः विजय मिळवला होता.