भारताच्या सीमेवर चीनचे रोबो सैन्य आणि चीनकडील सैनिकांची कमतरता !

चीनचे रोबो सैन्य (डावीकडे)

१. भारत-चीन सीमेवर अतिशय थंडी असल्याने तेथे तैनातीसाठी चिनी सैन्याची सिद्धता नसणे

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

‘भारत-चीनमधील लडाखची सीमा ही १६ ते १८ सहस्र फूट उंचीवर आहे. सध्या तेथे उणे २० ते उणे ३५ डिग्री सेल्सियस तापमान असते. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात थंडी असते. ही थंडी चिनी सैनिकांना सोसवत नाही. त्यामुळे त्या सीमेवरील सैनिकांचा बंदोबस्त न्यून करण्यासाठी चीन विविध उपाय योजत आहे. चिनी सैनिक अतिशय नाजूक असतात. ते उच्च आणि मध्यम वर्गातून येतात. त्यांना अतिशय थंड हवामानात रहाण्याची सवय नसते. ६० टक्क्यांहून अधिक सैनिक केवळ ३ वर्षांसाठी सैन्यात भरती झालेले असतात. त्यातील १ वर्ष प्रशिक्षणामध्ये जाते आणि २ वर्षे त्यांना तैनात केले जाते. त्यामुळे चिनी सैनिकांचे लक्ष देशाला सुरक्षित करण्याऐवजी २ वर्षांनी सैन्यातून बाहेर पडल्यावर आपल्याला कोणती नोकरी किंवा व्यवसाय करता येईल, याकडे लागलेले असते. तसेच तेथे शहरातील कोणत्याही सोयी उपलब्ध नसतात. त्यामुळे तेथे चिनी सैनिक तैनात होण्यासाठी सिद्ध नसतात.

२. सैन्याला पर्याय म्हणून चीनने सीमेवर मनुष्यविरहित आणि स्वयंचलित वाहनांचा वापर करणे

चीनने भारत-चीन सीमेवर मनुष्यविरहित आणि स्वयंचलित वाहने वापरणे चालू केले आहे. ती चालकविरहित असतात आणि पाहिजे त्या ठिकाणी पोचतात. त्यांच्यावर मशिन गन्स लावलेल्या असतात. ही वाहने पाहिजे तेथे गस्त घालू शकतात; परंतु स्वयंचलित वाहने किंवा रोबोट यांना अनेक मर्यादा आहेत. ही वाहने सरळ ठिकाणी काम करू शकतात; पण खडतर रस्त्यावर किंवा अरूंद पाऊल वाटेने वर जायचे असेल, तर त्यांना अडचण येते.

तसेच चीनने त्यांच्या सैनिकांना थंडीचा त्रास होऊ नये; म्हणून ‘एक्सोस्केलटन सूट’ (या पोशाखामुळे सैनिकांच्या कंबर किंवा पायाला दुखापत होण्याची शक्यता न्यून असते.) दिलेले आहेत. हे सूट घातल्याने एक सैनिक त्याच्या पाठीवर अधिक प्रमाणात वजन वाहून नेऊ शकतो. सैनिकांना लागणारी सामुग्री किंवा धान्य अनेक ठिकाणी पाठीवर घेऊन जावे लागते; पण या भागात प्राणवायू अल्प असल्याने त्यांची क्षमता फारच अल्प होऊन जाते, म्हणजे ३० किलो सामुग्री वाहून नेणारा सैनिक केवळ १० किलोच वजन वाहून नेऊ शकतो. या सैनिकांनी ‘एक्सोस्केलटन सूट’ घातल्याने ते अधिक प्रमाणात साहित्य घेऊन जाऊ शकतील.

लडाखसारख्या अतिशय थंड वातावरणामध्ये तंत्रज्ञानालाही मर्यादा असते. त्यामुळे ‘एक्सोस्केलटन सूट’ असो किंवा स्वयंचलित वाहने असो या वातावरणामध्ये ते अधिक दिवस टिकणार नाहीत. त्यांचे मूल्य अधिक असते, तसेच त्यांची देखभाल करणेही कठीण असते. त्यामुळे अशी वाहने आणि सूट इत्यादी गोष्टी एका मर्यादेच्या पलीकडे सैनिकांना कधीही पर्याय ठरू करू शकत नाहीत. शेवटी सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना सैनिकांचीच आवश्यकता असते आणि त्याचीच चीनकडे कमतरता आहे.

३. हिवाळ्यात चिनी सैन्य लढू शकत नसल्याने त्यांच्यात पारंपरिक युद्ध (सीमेवर करण्यात येणारे) करण्याचे धाडस नसणे !

मध्यंतरी अशा बातम्या आल्या होत्या की, चीन तिबेटी आणि डोंगराळ भागात रहाणार्‍या जातीजमातींचे तरुण, तसेच नेपाळी गुरखा सैनिक यांनाही सैन्यामध्ये भरती करण्याचा प्रयत्न करत आहे. यावरून असे लक्षात येते की, जर युद्धजन्य स्थिती किंवा लढाई झाली, तर चीनकडे स्वत:हून लढणार्‍या सैनिकांची कमतरता आहे. त्यामुळे तो तंत्रज्ञान आणि यांत्रिक शक्ती यांचा वापर करतांना दिसत आहे, तसेच त्यांच्या साहाय्याने तेथे गस्त आणि अन्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हिवाळ्यात चीनची युद्ध करण्याची अजिबात क्षमता नाही आणि त्याचे भारताशी लढाई करण्याचेही धाडस नाही. भारतीय सैनिक हे चीनच्या सैनिकांपेक्षा अधिक वरचढ आहेत. त्यामुळे चीनमध्ये पारंपरिक युद्धाची (सीमेवर करण्यात येणारे) क्षमता फारच अल्प किंवा अजिबात नाही.

४. चीनने भारताशी ‘नॉन कॉन्टॅक्ट वॉरफेअर’ (अप्रत्यक्ष संपर्काद्वारे युद्ध) करणे आणि त्याविरोधात भारताने गतीने सिद्धता करणे आवश्यक !

चीनची समोरासमोर येऊन लढण्याची क्षमता अल्प आहे. त्यामुळेच तो ‘हायब्रिड वॉर’च्या (विरोधी देशांमध्ये सामाजिक द्वेष वाढवणे, आर्थिक विकासात अडथळा निर्माण करणे, विविध प्रणालींना धोका पोचवणे, राजकीय नेतृत्वाच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणे) साहाय्याने भारतावर सायबर आक्रमणे (संगणक आणि इंटरनेट यांच्या साहाय्याने करण्यात येणारे आक्रमण) करत राहील, भारताशी आर्थिक लढाई आणि मानसिक युद्ध करील, भारताच्या विरोधात खोट्या बातम्या पसरविल, नक्षलवाद्यांना साहाय्य करील आणि ईशान्य भारतात नागा बंडखोरी वाढवण्याचा प्रयत्न करील. याला आपण ‘नॉन कॉन्टॅक्ट वॉरफेअर’ (अप्रत्यक्ष संपर्काद्वारे युद्ध) असे म्हणू शकतो. ज्याप्रमाणे भारत चीनला पारंपरिक युद्धात हरवू शकतो, त्याप्रमाणे त्याला हायब्रिड वॉरमध्येही हरवण्याची सिद्धता आपण केली पाहिजे. हे प्रयत्न चालू असले, तरी त्याचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.