लोकशाहीला डाग !

संपादकीय

सनातन हिंदु धर्मा ला विसरणे, हेच देशातील सर्व समस्यांमागील कारण !

‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणजे भारत’, असे आपण अभिमानाने सांगतो. १३६ कोटी लोकसंख्या असणे, अनेक धर्म आणि पंथ यांचे लोक देशामध्ये शतकानुशतके रहात असणे, विविधांगी विचारसरणींना राष्ट्रामध्ये केवळ थाराच नव्हे, तर त्यांच्या प्रचारार्थ मोकळीक असणे, हे विशालकाय भारताच्या ७४ वर्षे जुन्या लोकशाहीसमोर फार मोठे आव्हान आहे. सांप्रतकाळातील लोकशाहीमुळे भारत नांदत राहिला आहे, असे म्हणणे हे खोडसाळपणाचे आहे. भारताच्या हृदयात वसणारा ‘सनातन हिंदु धर्म’ हाच सर्वांना एका माळेत गुंफू शकणारी शक्ती प्रदान करत आला आहे. याउलट आज निधर्मी लोकशाहीत भारतावर अनेक प्रकारचे आघात होऊन ‘राष्ट्र’ म्हणून जी एक भावना, एक कल्पना, एक भविष्य, एक धर्म आणि त्या अनुषंगाने नीती आवश्यक आहे, ती आता मोडकळीस आली आहे.

कायदेमंडळ अर्थात् शासनव्यवस्था चालवण्यासाठी आवश्यक प्रणाली निर्माण करणारे मंडळ हा लोकशाहीतील चार स्तंभांपैकी प्रथम आणि महत्त्वपूर्ण स्तंभ ! भारतावर होत असलेले आघात पहाता या स्तंभाच्या स्थितीचा अभ्यास होणे आवश्यक आहे. या स्तंभाच्या अंतर्गत जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि भारताने स्वीकारलेली बहुपक्षीय प्रणाली महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सध्याची राजकीय पक्षांची स्थिती पाहिली, तरी त्यातून आपल्याला एकूण लोकशाहीच्या या स्तंभाचा अंदाज बांधता येऊ शकेल. सध्याचे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सध्या येऊ घातलेली गोवा राज्यातील निवडणूक आणि त्या अनुषंगाने चालू असणारी रणधुमाळी !

केंद्रस्थानी ‘सत्ताकारण’ !

बंगालमधील तृणमूल काँग्रेस गोव्यात तिचे पाय रोवण्यासाठी यंदा प्रयत्नशील असल्याचे दिसते. मुसलमानांचा अनुनय नि हिंदूंचा द्वेष करण्यात नेहमी धन्यता मानणारी तृणमूल आणि तिच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे गोव्यातील राजकीय रंग मात्र पालटलेले दिसतात. राज्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचा विचार करता येथे त्यांनी सर्व धर्मांना समान संधी देण्याची वचनबद्धता घोषित केली आहे. एवढेच नव्हे, तर अनेक वर्षे भाजपसमवेत युती करणार्‍या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी हातमिळवणी केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला एखाद्या राज्यात प्रस्थापित होण्यासाठी किमान ५-१० वर्षेतरी जनतेमध्ये राहून, त्यांच्या आवश्यकता आणि समस्या समजून त्यांचा अभ्यास करणे अन् त्यातून राजकारण करणे आवश्यक असते; परंतु तृणमूलने असे केलेले दिसत नाही. केवळ भाडोत्री कार्यकर्ते उभे करून आणि स्थानिक राजकीय नेत्यांना हाताशी धरून निवडणूक लढवणे अन् त्यातून काही आमदार निवडून आणणे, याला पुरुषार्थ म्हणावा का ? यासमवेत विरोधी विचारसरणीशी हातमिळवणी केल्याने स्वत:च्या विचारसरणीचा हा पराजय नव्हे का ? गेल्या ५-७ वर्षांतील अशी अनेक उदाहरणे समोर आहेत. वर्ष २०१५ मध्ये तत्कालीन जम्मू-काश्मीर राज्यामध्ये पीडीपी (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी) या मुसलमानधार्जिण्या पक्षासमवेत भाजपने काही वर्षे सत्ता हाकली. महाराष्ट्रात हिंदुत्वनिष्ठ शिवसेना आणि अल्पसंख्यांकधार्जिण्या दोन्ही काँग्रेस यांची युती पहायला मिळत आहे. त्यामुळे आज बहुधा सर्व राजकीय पक्षांना वैचारिक बांधिलकी राहिलेली नाही. येनकेन प्रकारेण सत्तेत येणे आणि या माध्यमातून सत्ताकारण नि ‘अर्थकारण’ करणे, हे आजच्या राजकारणाचे स्वरूप आहे. हा भारतीय लोकशाहीवर असलेला डाग आहे.

यथा राजा तथा प्रजा !

श्री. वरुण गांधी

‘यथा राजा तथा प्रजा’ यानुसार राजकीय पक्षांतील राजकारणी हेसुद्धा मूळ राजकीय पक्षातून दुसर्‍या राजकीय पक्षामध्ये उड्या मारतात. सध्या राहुल गांधी यांचे चुलत भाऊ आणि भाजपचे उत्तरप्रदेशातील खासदार वरुण गांधी यांचे नाव या दृष्टीकोनातून प्रामुख्याने घ्यायला हवे. एकेकाळी हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीला उचलून धरणारे आणि त्यासाठी ज्वलंत वक्तव्ये करणारे वरुण गांधी आज हिंदुविरोधी होत चालले आहेत, असे दिसून येत आहे. मध्यंतरी ते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का ? अशी चर्चा चालू होती. पंजाबच्या आगामी निवडणुका पहाता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अमरिंदर सिंह यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली अन् स्वत:चा नवा राजकीय पक्ष चालू केला आहे. अमरिंदर सिंह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदी भाजपच्या नेत्यांना देहलीत येऊन भेटून गेले आहेत. त्यातून त्यांचा पक्ष भाजपशी हातमिळवणी करील, हे जवळपास स्पष्ट आहे, असे म्हणायला हरकत नाही. यातून ज्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहून एखादी व्यक्ती संबंधित विचारसरणीला अनुकूल असलेल्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करते, ती एकतर पक्षांतर्गत राजकारण अथवा राजकीय पक्षांची पालटती ध्येय-धोरणे यांमुळे त्यांना सोडचिठ्ठी देते. यातून कुणाचीच निष्ठा कुणापाशी राहिलेली नसून सत्ता उपभोगण्यासाठी सावळागोंधळ चालू आहे, हे खेदाने म्हणावे लागते.

सकृतदर्शनी भारत विकासाच्या दिशेने जात आहे असे दिसले, तरी ते काही प्रमाणात खरे नाही. जोपर्यंत धर्माचा आधार घेतला जात नाही, तोपर्यंत राष्ट्राचा विकास होणे कदापि शक्य नाही. ना राजकीय पक्ष, ना राजकारणी अन् ना जनता धर्माचरण करते. त्यामुळे राष्ट्राप्रती कुणाचीच निष्ठा दिसत नाही. वरवर वाटणारा विकास हा केवळ एक भ्रम असून राष्ट्रोत्थान होण्यासाठी समष्टी साधना हा एकमेव पर्याय आहे. धर्माचा आधार घेतल्यास वैयक्तिक जीवनच नव्हे, तर सामाजिक नि राष्ट्रीय जीवन शंभर टक्के सुधारू शकते, ही अनुभूती घेण्यासारखी गोष्ट आहे. निधर्मी तत्त्व स्वीकारल्यानेच सहस्रावधी वर्षे संपन्नतेच्या शिखरावर असलेला भारत गेल्या ७ दशकांमध्ये मोडकळीस आला आहे, हे त्यामुळेच जोरकसपणे सांगावेसे वाटते. एकनिष्ठता आणि तीही धर्म अन् राष्ट्र यांपाशी असणारे सात्त्विक वृत्तीचे राजकारणी नि जनताच भारताला तारू शकतात. यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेखेरीज दुसरा पर्याय नाही, हे आतातरी लक्षात घ्या !