धर्मांतरबंदी पुरेशी का ?

 संपादकीय

‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’ हे लक्षात घेऊन धर्मरक्षणार्थ हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

धर्मांतर

‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’, हे समीकरण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी यापूर्वी सांगितले आहे. याला इतिहास साक्षी आहे. १४०० वर्षांपूर्वी जगात एकही इस्लामी देश नव्हता; परंतु पहाता पहाता आज ५६ हून अधिक मुसलमान देश उदयास आले. तलवारीच्या जोरावर म्हणजे बळजोरी करून काफिरांचे धर्मांतर करण्याचा इस्लामी इतिहास सर्वश्रुत आहे. ख्रिस्ती यास अपवाद नाहीत. त्यांनी घडवलेली रक्तरंजित क्रांती राष्ट्रांतरासाठीच करण्यात आली. त्यामुळे अनेक संस्कृती लयाला गेल्या आणि त्यांच्या बळावर आज १५० हून अधिक राष्ट्रे ख्रिस्ती झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इतिहासाचा घेतलेला हा वेध अचूक होता. हेच तत्त्व भविष्यात म्हणजे त्यांच्यानंतरही तंतोतंत लागू पडले. अनेक लोकशाही देशांतील मोठमोठे भूभाग त्या दिशेने मार्गक्रमण करत असून येणार्‍या काही शतकांत नव्हे, तर दशकांत त्यांना इस्लामी अथवा ख्रिस्ती राष्ट्रांचे मूर्त रूप येईल, अशी चिन्हे आहेत. सावरकर यांना ‘कोणत्याही राष्ट्राची संस्कृती आणि तेथील बहुसंख्यांक समाजाचा धर्म यांच्या आधारावरच त्या राष्ट्राचे भवितव्य अवलंबून असते’, हेच सुचवायचे होते. आजच्या लोकशाही युगामध्ये तथाकथित मुख्य प्रवाहातील विचारसरणीने कितीही नाकारले अथवा त्यास थोतांड म्हटले, तरी ‘धर्म हा राष्ट्राचा प्राण असतोच असतो !’, हे त्यामुळे जोरकसपणे सांगणे आवश्यक आहे. राष्ट्राची म्हणजे पर्यायाने समाज, कुटुंब अन् व्यक्ती यांची जडणघडण ही धर्माधारित होत असते. हा नियम सर्वत्र लागू आहे. आपण वैज्ञानिकता, पुरोगामित्व, साम्यवाद यांचा कितीही उदोउदो केला, तरी धर्म हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो. आंतरराष्ट्रीय राजकारणातील भू-राजकीय समीकरणे तर सोडा; पण जगाच्या नकाशावरील प्रत्येक राष्ट्रात ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंतच्या निवडणुका या धर्माच्या आधारावर लढवल्या जातात. जातीय आणि धार्मिक आधारावर मतदारांची विचारसरणी निश्चित केली जाऊन त्याद्वारे निवडणुकांची समीकरणे आखली जातात. लोकशाही युगामध्येही अशा प्रकारे निवडणुका लढवल्या जाणे, हे खरेतर लोकशाहीच्या पराभवाकडेच अंगुलीनिर्देश करत असतात. या सर्वांतून धर्माची अपरिहार्यता मात्र लपून रहात नाही, हे अधोरेखित करण्यासारखे सूत्र !

भारताची भयावह स्थिती !

धर्माच्या आधारावर फाळणी झालेल्या आजच्या भारताच्या संदर्भात याचा विचार करायचा झाल्यास आज ७४ वर्षांनी पुन्हा तशीच वेळ आली आहे. पूर्वाेत्तर भारतातील बहुतांश राज्ये आज ख्रिस्ती अथवा मुसलमान बहुल झाली आहेत. ख्रिस्ती पंथाने आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या राज्यांना विळखा घातला आहे. काश्मीरला वाचवण्यासाठी भारत जरी कितीही प्रयत्नशील असला, तरी तो ‘हिंदु’ भारताच्या हातात कितपत येईल, हे कळण्यासाठी सातत्यपूर्ण आणि योग्य दिशेने प्रयत्न होणे आवश्यक आहे. हे प्रयत्न जरी योग्य दिशेने झाले, तरी पुढील किमान ५ वर्षांनंतरच काश्मीरच्या स्थितीचा अंदाज बांधता येणार आहे.

अयोध्येतील राममंदिर आणि ‘काशी विश्वनाथ धाम’

या सर्वांतच सध्या ‘हिंदु’ भारताला सुगीचे दिवस आले असल्याचे म्हटले जात आहे. अयोध्येतील राममंदिराचा मार्ग सुकर होण्यापासून १३ डिसेंबरला वाराणसी येथे ‘काशी विश्वनाथ धाम’चे पंतप्रधानांच्या हस्ते झालेले उद्घाटन, हे त्याचे मूर्त रूप असल्याचे मानण्यात येत आहे. हे सत्य झाले, तर प्रत्येक हिंदूला त्याचा सार्थ अभिमान वाटेल; परंतु वास्तवाकडे पाठ फिरवून चालणार नाही. आज ज्या गतीने हिंदूंचे धर्मांतर चालू आहे, ती चिंतेची गोष्ट झाली आहे. प्रत्येक वर्षी ८ लाख हिंदू अन्य धर्मांत प्रवेश करत आहेत. ही आकडेवारी किमान १० वर्षांपूर्वीची आहे. यावर लगाम लावण्यासाठी काही भाजपशासित राज्ये हिंदुहिताचे कायदे करत आहेत. ‘लव्ह जिहाद’ हा धर्मांतराचाच एक प्रकार असून त्याच्या विरोधात उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि हरियाणा येथे कायदा करण्यात आला आहे, तसेच उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश अन् मध्यप्रदेश या राज्यांत ‘धर्मांतरबंदी कायदा’ करण्यात आला आहे. आता भाजपचे सरकार असलेल्या कर्नाटकातही या दोन्ही कायद्यांच्या अनुषंगाने वाटचाल चालू आहे. याविषयी राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी म्हटले आहे, ‘राज्यघटनेच्या कलम २५ नुसार कुणी एखाद्याचे बलपूर्वक धर्मांतर करत असेल, तर ते अयोग्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे; पण त्यासंदर्भात शिक्षेची तरतूद नाही. यासाठी प्रस्तावित धर्मांतरबंदी कायद्यात शिक्षेची तरतूदही करण्यात येणार आहे.’ कर्नाटक सरकारकडून या दृष्टीकोनातून केले जात असलेले प्रयत्न स्तुत्य आहेत; परंतु मुळात एकेका राज्याने असे कायदे करण्यापेक्षा केंद्र सरकारनेच राष्ट्रीय स्तरावर बलपूर्वक केल्या जाणार्‍या धर्मांतरावरील बंदीचा कायदा केल्यास ते खर्‍या अर्थाने लोकहितकारी ठरेल !

हिंदु राष्ट्रच हवे !

आगामी काळात यासाठी देशव्यापी कायदा झाल्यास भारताच्या संभाव्य विभाजनाला (राष्ट्रांतराला) काही प्रमाणात लगाम बसू शकेल. या जोडीला हिंदूंना धर्मशिक्षण देणे आणि त्यांच्याकडून साधना करवून घेणे अत्यावश्यक आहे. याचे कारण हिंदूंना आमिषे दाखवून अथवा ‘काळी जादू’ यांसारखे अघोरी प्रकार करून त्यांचे धर्मांतर केले जाते. धर्माप्रतीचा अभिमान आणि साधनेने निर्माण होणारे तेज, हेच अशा प्रकारांवर पायबंद घालू शकते. आजच्या निधर्मी भारतात हिंदूंना साधना आणि धर्म यांचे शिक्षण मिळणे दुरापास्त आहे. यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव पर्याय आपल्या सर्वांसमोर आहे. जर ५६ मुसलमान राष्ट्रे आणि १५० हून अधिक ख्रिस्ती राष्ट्रे या भूतलावर असू शकतात, तर हिंदूंचे एक राष्ट्र हवेच ! धर्म हाच राष्ट्राचा आधार असतो आणि तो सनातन धर्म असेल, तर त्याच्या अन् हिंदूंच्या रक्षणार्थ हिंदु राष्ट्र हाच एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे. त्यामुळे हिंदूंनी आता यासाठी ‘डंके की चोट पर’ यानुसार हिंदु राष्ट्राची मागणी लावून धरायला हवी ! त्यातच सर्व समस्यांचे निराकरण आहे, हे जाणा !