सातारा जिल्हाधिकार्‍यांनी घेतले श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधीचे दर्शन

जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा, २ डिसेंबर (वार्ता.) – क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांच्या चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या श्रीक्षेत्र सज्जनगड येथे २७ नोव्हेंबर यादिवशी सकाळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सपत्नीक भेट दिली. या वेळी जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी समर्थ रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळ यांच्या पदाधिकार्‍यांकडून गडावर होत असलेल्या विकासकामांची महिती जाणून घेतली. जिल्हाधिकार्‍यांसमवेत त्यांचे कुटुंबिय आणि राजपुरोहित काका उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शिव-समर्थांच्या वास्तव्याने पुनीत झालेले शेजघर, समर्थांच्या दैनंदिन उपयोगातील वस्तू, श्रीधर कुटीतील श्रीधर स्वामींच्या पादुका यांचे दर्शन घेतले.

श्रीक्षेत्र सज्जनगड येथील पावित्र्याचे रक्षण झाले पाहिजे ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले श्रीक्षेत्र सज्जनगड सातारा नगरीच्या वैभवात भर घालणारा आहे. गडावर स्वच्छता राखली पाहिजे. बसस्थानक, पायरी मार्ग परिसर या ठिकाणी स्वच्छता होणे आवश्यक आहे. गडावर काही ठिकाणी कचराकुंड्या ओसंडून वहात आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि येणार्‍या पर्यटकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याकडे गडावरील पदाधिकार्‍यांनी लक्ष दिले पाहिजे आणि श्रीक्षेत्र सज्जनगडाचे पावित्र्यरक्षण आपणच केले पाहिजे.’’