मिझोराम आणि म्यानमार यांच्यामधील अमली पदार्थ व्यवसायामुळे मिझोराम राज्यात एड्स रुग्णांमध्ये वाढ ! – श्रीधरन् पिल्लई, राज्यपाल, गोवा

पणजी, १ डिसेंबर (वार्ता.) – मिझोराम आणि म्यानमार यांच्यामधील अमली पदार्थ व्यवसायामुळे मिझोराम राज्यात एड्स रुग्णांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी दिली. ‘गोवा एड्स कन्ट्रोल सोसायटी’ आणि ‘विद्या प्रबोधिनी महाविद्यालय यांनी राजभवन येथे ‘जागतिक एड्स दिना’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘मी मिझोरामचा राज्यपाल असतांना केवळ लैंगिक संबंधामुळेच नव्हे, तर अमली पदार्थाच्या सेवनामुळे एड्सची लागण होत असल्याचे माझ्या लक्षात आले. मिझोराम हे राज्य ‘म्यानमार’ देशाला लागून आहे. या ठिकाणी पारपत्राविना दोन्हीकडील नागरिक कुठेही ये-जा करू शकतात. त्यामुळे या ठिकाणी अमली पदार्थ व्यवहारामध्ये वाढ झालेली आहे. मिझोराम भागात ‘एड्स’बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.’’ अमली पदार्थांमुळे अनेक स्तरांवर हानी होत असूनही प्रशासनाने त्या प्रश्‍नाला केवळ प्रतिष्ठेचा विषय केले आहे ! मध्यंतरी चित्रपट अभिनेत्याच्या मुलावर होत असलेल्या कारवाईचा मोठा गाजावाजा झाला; पण प्रत्यक्षात अमली पदार्थ व्यवसाय रोखण्यासाठी काय पावले उचलली गेली ? कारवाई केल्यासारखे दाखवायचे आणि प्रत्यक्षात काहीच करायचे नाही, या घातकी धोरणामुळेच देशाची हानी झाली आहे !