वायूप्रदूषणामुळे देहलीची ‘गॅस चेंबर’सारखी निर्माण झालेली स्थिती !

प्रातिनिधिक छायाचित्र

सध्या देहलीची स्थिती ‘गॅस चेंबर’सारखी झाली आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालाप्रमाणे देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एन्.सी.आर.मधील) हवा अतिशय धोकादायक होती. मनुष्याला श्वसनासाठी ती योग्य नव्हती. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील प्रदूषणाची समस्या अनेक वर्षांपासून चालू आहे. यामागे ३ कारणे आहेत.

१. पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये शेतीचे पीक निघाल्यानंतर उरलेला कचरा (झाडांची मुळे) जाळण्यात येतो. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. दोन्ही राज्यांचे ८४ टक्के क्षेत्र शेतीखाली आहे. त्यामुळे जेव्हा शेतातील अनावश्यक कचरा जाळण्यात येतो, तेव्हा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. एका वैद्यकीय अहवालाप्रमाणे देहलीमध्ये केवळ वायूप्रदूषणामुळे प्रतिवर्षी १५ लाख लोकांचा मृत्यू होतो. देहली किंवा राजधानीच्या क्षेत्रात रहाणार्‍या लोकांचे वयोमान अनुमाने ९ – १० वर्षांनी घटते. पूर्वी आपल्या देशाची प्राथमिक आवश्यकता अन्न, वस्त्र आणि निवारा ही असायची; पण आता ‘प्रत्येक नागरिकाला शुद्ध हवेचे श्वसन करण्याचा अधिकार आहे’, ही प्राथमिकता असायला पाहिजे.

२. देहली क्षेत्रामध्ये प्रत्येकाजवळ वैयक्तिक वाहन आहे. ‘कुणालाही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा’, असे वाटत नाही. त्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.

३. कोळशावर चालणारे उद्योग किंवा बांधकामे यांमुळेही अधिक प्रदूषण होते. त्यांची आकडेवारी वेगवेगळी आहे.

या तिन्ही गोष्टी मिळून देहलीचा ‘गॅस चेंबर’ झाला आहे आणि त्यातूनच लोक मरत आहेत.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

देहलीचे प्रदूषण थांबवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि सामान्य नागरिक यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक !

याविषयी अनेक वर्षे प्रयत्न करूनही पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांना पंजाब आणि देहली सरकारने अनुदान देण्याचा प्रयत्न केला. शेतीतील कचरा न जाळता दुसरे पर्याय सुचवण्यात आले; पण त्यात यश आले नाही. इतरांचा विचार करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ‘मला जे योग्य वाटेल, ते मी करीन. देहली किंवा त्या क्षेत्रात लोक मरत असतील, तर त्याची मला चिंता नाही’, हा दृष्टीकोन अतिशय चुकीचा आहे; पण मतपेटीच्या राजकारणामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला ‘हे सर्व कायद्याने थांबवण्यासाठी लोकांवर सक्ती करावी’, असे वाटत नाही. त्यामुळे अनेक वर्षे होऊनही देहलीच्या या समस्येवर उपाय निघत नाही. केंद्र आणि राज्य सरकारे, तसेच प्रदूषण करणारे सामान्य नागरिक यांनी एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करून योग्य उपाययोजना काढली, तरच देहली आणि राजधानी क्षेत्रातील हवा श्वसनयोग्य होऊ शकते.

१-२ वर्षांपूर्वी चीनची राजधानी बिजिंग येथे प्रदूषण वाढले होते. तेव्हा संपूर्ण शहरच बंद करण्यात आले होते. लोक असेही सुचवतात की, शाळा आणि महाविद्यालये यांना उन्हाळ्यामध्ये ज्या सुट्या दिल्या जातात, त्याच सुट्या प्रदूषणाच्या काळात दिल्या जाव्यात. तसे झाल्यास देहलीचे बहुतांश लोक सुट्यांमध्ये बाहेरगावी जातील आणि ते प्रदूषणाचे बळी ठरणार नाहीत.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे