वाहनचालकांकडून पैसे उकळणार्‍या पोलिसांचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून ‘स्टिंग ऑपरेशन’ !

पैसे घेणार्‍या २ पोलिसांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पकडले !

  • भ्रष्टाचाराने पोखरलेली पोलीस यंत्रणा ! – संपादक 
  • अनेक दिवसांपासून पोलिसांकडून अशी लूट चालू असतांना वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी पैसे घेणार्‍या दोषी पोलिसांना पकडून बडतर्फ का केले नाही ? लोकप्रतिनिधींना असे ‘स्टिंग ऑपरेशन’ करून घटना उघडकीस आणावी लागते, हे पोलिसांना लज्जास्पद आहे. अशा लुटारू पोलिसांना जनतेचे रक्षक म्हणता येईल का ? – संपादक 

चाळीसगाव – औट्रम घाटात ट्रक चालकांकडून पैसे उकळणार्‍या पोलिसांचे चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ केले. या वेळी आमदार चव्हाण यांनी स्वतः कार्यकर्त्यांच्या साहाय्याने पळून जाणार्‍या २ पोलिसांना रंगेहात पकडले, तर आणखी २ पोलीस पळून गेले. २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री चाळीसगाव ते कन्नड या औट्रम घाटात ही घटना घडली.

१. घाटात ‘ट्रकचालकांकडून पोलीस पैसे घेत आहेत’, अशी माहिती आमदार चव्हाण यांना समजल्यावर रात्री १२ नंतर त्यांनी ट्रकचालकाचा वेष घालून स्वतः ट्रक चालवला. एका पोलिसाने ट्रक अडवून आमदार चव्हाण यांना ट्रकचालक समजून त्यांच्याकडून ५०० रुपये घेतले. नंतर त्यांनाच शिवीगाळ केली. या वेळी तोंडवळ्याला गुंडाळलेला रूमाल काढल्यानंतर पोलिसांना ट्रकचालक म्हणजे आमदार मंगेश चव्हाण असल्याचे समजताच पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

२. चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या साहाय्याने २ पोलिसांना पकडले. या पोलिसांना आमदारांनी ओळख विचारल्यावर त्यातील दोघे चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी असल्याचे समजले.

३. या घटनांचे सिद्ध केलेले सर्व व्हिडिओ आमदार चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना दिले आहेत. या वेळी ‘चाळीसगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह रात्री कर्तव्यावर असलेल्या सर्व पोलीस कर्मचार्‍यांना त्वरित निलंबित करावे’, अशी मागणी त्यांनी केली. ‘या घटनेची तातडीने चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई केली जाईल’, असे आश्वासन मुंढे यांनी दिले.