काँग्रेसला घरचा अहेर !

संपादकीय

२६/११ च्या आक्रमणानंतर प्रत्युत्तर न देता काँग्रेसने राष्ट्राभिमान शून्यतेचे प्रदर्शन केले !

मनीष तिवारी आणि त्यांचे पुस्तक

काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांच्या ‘टेन फ्लॅश पॉईंट्स, थर्टी इअर्स’ या नवीन पुस्तकात त्यांनी ‘मुंबईवर २६/११ च्या झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर ‘तत्कालीन काँग्रेस सरकारने त्याचा सूड घ्यायला हवा होता’, अशा आशयाचे विधान केले आहे आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या गप्प बसण्यावर टीका केली आहे. तिवारी एवढेच बोलून थांबले नाहीत, तर ‘ही चुप्पी म्हणजे संयम नसून कमजोरी आहे’, अशी निर्भत्सनाही त्यांनी केली आहे. वर्ष २००८ च्या या आक्रमणानंतर १३ वर्षांनी का होईना कोणत्या तरी काँग्रेस नेत्याला काँग्रेसच्या नेभळट, तळवे चाटणार्‍या आणि देशद्रोही वर्तनाची जाणीव झाली आणि ती त्यांनी उघडपणे बोलून दाखवली, हे ठीकच झाले. पुरो(अधो)गाम्यांनी ‘हे आक्रमण पुण्याच्या ब्राह्मणांनी केले’ अशी हास्यास्पद गरळओक केल्यावरही हे निधर्मी गप्पच राहिले होते. सदैव मुक्याप्रमाणे रहाणारे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हातातील ‘बाहुले’ असल्याची टीका वारंवार होत असल्याने आता भाजपने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी मनमोहन सिंह यांच्याऐवजी थेट सोनिया गांधी यांनाच जाब विचारला आहे. या आक्रमणाच्या काळात राहुल गांधी नाच-गाण्यात दंग असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. असमंजस वर्तनासाठी प्रसिद्ध असणार्‍या राहुल गांधी यांच्याकडून कुणाला वेगळी अपेक्षा नाही; मात्र विदेशाशीच अधिक निष्ठा राखण्यासाठी प्रसिद्ध असणार्‍या काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी याविषयी पाकला तोंडदेखलेही काही म्हटल्याचे ऐकीवात नाही. मोदी सरकारच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’वर संशय व्यक्त करणारे काँग्रेसनिष्ठ विज्ञानवादी सॅम पित्रोडा यांनी मात्र त्या वेळी ‘पूर्ण पाकिस्तान काही आतंकवादी नाही’ असे विधान केले होते. काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांना या आक्रमणानंतर झालेल्या टीकेमुळे राजीनामाच द्यावा लागला होता. काँग्रेसचे एकेकाळचे महाराष्ट्राचे गृहमंत्री रा.रा. पाटील यांनीही आक्रमणाविषयी ‘अशा छोट्या-छोट्या घटना मोठ्या शहरात होतात’, असे म्हटले होते. या सर्व उदाहरणांवरून काँग्रेसी नेत्यांची राष्ट्राप्रतीची असंवेदशीलता जगजाहीर होते.

डोकलाम संघर्ष हाणून पाडला !

मनीष तिवारी यांनी त्यांच्या पुस्तकात पुढे म्हटले आहे, ‘वर्ष २०१८ मध्ये मोदी सरकारने आर्थिक अडचणींमुळे भारत-चीन ‘वास्तविक नियंत्रण रेषे’वर (एल्.ए.सी.) ‘तत्परतेने प्रत्युत्तर देणारे सैन्य पथक’ (माऊंटन स्ट्राईक क्रॉप्स) सिद्ध केले असते, तर डोकलाम संघर्षाची घटना टाळता आली असती.’ वास्तविक पहाता ‘माऊंटन स्ट्राईक क्रॉप्स’ या योजनेचा आरंभ १० वर्षांपूर्वीच झाला होता. पूर्व भागात म्हणजे आसाम येथे त्याची पहिली तुकडी वर्ष २००९ मध्ये सिद्ध होती. दुसरी तुकडी पठाणकोटसाठी सिद्ध करतांना वर्ष २०१८ मध्ये आर्थिक अडचणी आल्या होत्या; परंतु तरीही सध्याची स्थिती पहाता डोकलामच्या प्रकरणीही भारताची कूटनीती यशस्वी झाली, असेच आता म्हणावे लागते. भारताकडून चीनला अनपेक्षित विरोध झाला आणि अखेर चीनला माघार घ्यावी लागली. भारत या वेळी आग्रही आणि ठाम होता; पूर्वीप्रमाणे नव्हता. याउलट अन्य सर्वच देशांना चीनसमवेत सीमाप्रश्नी नमते घ्यावे लागत आहे. चीनने त्या वेळी कितीही घृणास्पद आणि आक्रमक भाषा वापरली, तरी भारत चीनवर अवलंबून नसल्यामुळे भारताने त्याचा स्वतंत्र आणि कठोर बाणा कायम ठेवला आहे. पूर्वानुभव पहाता काँग्रेस सरकार असते, तर त्याला ते जमले नसते. वर्ष २०१७ मध्ये भारताने तिबेटमधील डोकलाम पर्वतावर चीनने रस्तेबांधणी चालू केल्यावर त्याला थांबवले; कारण पुढे या पर्वताचा वापर करून चीन ‘सिलीगुडी कॉरिडॉर’ हा भाग कह्यात घेऊन भारताला त्याच्या पूर्वेकडील मोठ्या भूभागापासून तोडू शकतो. त्यानंतर वर्ष २०२०च्या मे मासात चीनने भारतात घुसखोरी केल्यानंतर भारत सरकारने ‘माऊंटन स्ट्राईक क्रॉप्स’ हे पथक आता इतके सुसज्ज आणि भक्कम केले की, त्याला तोड नाही. शत्रूच्या डोळ्यांत डोळे घालून पहाणारे सैन्य आज वास्तविक नियंत्रण रेषेवर सज्ज आहे. त्यामुळे चीनने जानेवारी २०२१ मध्ये १० सहस्रांहून अधिक सैन्य मागे घेतले. काँग्रेसप्रमाणे सैन्यासाठी आर्थिक पाठिंबा न देणारे केंद्रशासनाचे धोरण नसून राष्ट्रसुरक्षा आणि सर्व सैन्याशी निगडित सर्व सुरक्षा धोरणांसाठी शासन योग्य तो व्यय करत आहे. पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेण्याचे ध्येय आता केंद्रशासनाने ठेवले आहे.

जनता काय करणार ?

इंग्लंडमधील भारतीय पाकिस्तानी रेस्टॉरंटमध्ये जाण्यावर बहिष्कार घालून सैन्याला साहाय्य करू शकतात, तर भारतात ही एकजूट अजून का निर्माण होत नाही ? भारतात चिनी आणि पाकिस्तानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याएवढा राष्ट्राभिमान हिंदूंमध्ये निर्माण का होत नाही ? या देशांच्या वस्तू न वापरणे म्हणजे एक प्रकारे सीमेवर लढणार्‍या सैनिकांच्या लढाईत त्यांना हातभार लावून त्यांचे मनोबल उंचावणे आहे. आर्थिक अडचणीमुळे या देशांचे नाक दाबले गेले की, त्यांच्या भारतविरोधी कारवाया आपोआप बंद होणार आहेत, हे साधे सोपे गणित आहे; परंतु त्यासाठी देशातील राष्ट्राभिमानी नागरिकांनी या देशाच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी आता संघटित होण्याची नितांत आवश्यकता आहे. नेहरूंपासून काँग्रेस सरकारने पाक, चीन, बांगलादेश आदी देशांच्या परराष्ट्रीय धोरणांत अनेक घोडचुका केल्या आणि त्याचे अत्यंत क्लेशकारक दुष्परिणाम भारतीय जनतेने भोगले अन् भोगत आहे. काँग्रेसच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न सरकार काही प्रमाणात करत आहे. आता राष्ट्राभिमानी जनतेने एकत्र येऊन या दोन्ही देशांच्या आर्थिक नाड्या आवळून त्यांना कोंडीत पकडले पाहिजे.

विश्वगुरु आणि महासत्ता बनण्याची क्षमता असणार्‍या भारताची काँग्रेसने जी दुरवस्था केली, त्यात पालट होण्याचा आरंभ चालू झाला आहे. काँग्रेसने केलेल्या अशाच शेकडो महाचुकांचे प्रायश्चित्त म्हणून आता उरल्यासुरल्या काँग्रेसलाही राजकारणातून विश्राम घेण्यास जनतेने भाग पाडले पाहिजे !