अशा कामचुकार आणि भ्रष्टाचारी कर्मचार्यांना कायमस्वरूपी निलंबित केले पाहिजे. – संपादक
पुणे – स्मशानभूमीतील विजेची कामे पूर्ण केल्याचे भासवून आणि महानगरपालिकेतील अधिकार्यांच्या बनावट स्वाक्षर्या करून पालिका कर्मचार्याने ९९ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. योगेश मोरे असे या कर्मचार्याचे नाव असून त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी प्रल्हाद पवार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. हा प्रकार १० फेब्रुवारी ते २१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत घडला. बाणेर, नवी पेठ आणि कोथरूड येथील महापालिकेच्या स्मशानभूमीत विजेची कामे करण्यात येणार होती. मोरे यांनी ही कामे पूर्ण झाल्याचे भासवून बनावट देयके सिद्ध केली. त्यावर विभागातील अधिकार्यांच्या बनावट स्वाक्षर्या करून शिक्के मारले, तसेच कार्यालयीन जावक करून ती देयके संमत करण्यासाठी आरोग्य विभागाकडे पाठवली होती. मोरे यांनी बनावट देयके देऊन महापालिकेची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.