संपादकीय
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदवलेल्या ध्वनीप्रदूषणाच्या पहाणीत राज्यातील महापालिका असलेल्या २७ शहरांमधील १०२ ठिकाणी प्रदूषणाची २४ घंटे निरीक्षणे नोंदवली होती. यात राज्यातील औद्योगिक, व्यावसायिक, रहिवासी आणि शांतता क्षेत्र अशा सर्वच भागांत ध्वनीप्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. या निरीक्षणात मुंबई, सोलापूर, नाशिक, अमरावती या चारही शहरांत केवळ दिवसाच नाही, तर रात्रीही ध्वनीप्रदूषण सर्वाधिक आढळून आले. भारतात ध्वनीप्रदूषणाला नागरिक गांभीर्याने घेत नाहीत. तीव्र ध्वनीप्रदूषणामुळे सूक्ष्म जीवाणू नष्ट होतात. परिसरात ध्वनीची पातळी वाढली की, माणसांमध्ये ताण वाढून त्यांच्या हृदयाची धडधड वाढून रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे विकार होतात. याचसमवेत विविध प्रकारचे मानसिक आजार, पचनसमस्या, इतकेच काय गर्भपात यांसारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. सततच्या ध्वनीप्रदूषणामुळे बहिरेपणाही येण्याची शक्यता असते. ध्वनीप्रदूषणाची पातळी अशीच वाढत राहिल्यास आरोग्याच्या यापेक्षाही भयानक समस्यांना सामोरे जावे लागेल.
गाड्यांचे ‘हॉर्न’ (भोंगे), गिरण्यांचे भोंगे, ध्वनीवर्धकांचे आवाज इतकेच काय तर रेडिओ आणि दूरचित्रवाहिनी यांच्या संचातून बाहेर पडणारे आवाजही ध्वनीप्रदूषण वाढवण्यास कारणीभूत ठरतात. अलीकडे केवळ इतरांचे लक्ष वेधण्यासाठी ट्रक, तसेच दुचाकीला प्रचंड जोरात आवाज करणारे ‘हॉर्न’ बसवले जातात, ज्यामुळे मानवी कानांवर विपरीत परिणाम होतो. अनेक पाश्चात्त्य राष्ट्रांमधे आवश्यक असेल तरच गाड्यांचे ‘हॉर्न’ वाजवण्यास अनुमती असते; याउलट आपल्याकडे संयमाअभावी नेहमी जोरात ‘हॉर्न’ वाजवण्यात येतो. ध्वनीप्रदूषण करणार्यांवर कडक कारवाई करण्यासमवेत ध्वनीप्रदूषण करणारे साहित्य जप्त करण्याचे अधिकार पोलिसांकडे आहेत; मात्र पोलीस पुष्कळ अल्प वेळा त्यांचा वापर करतात. भारतात १२५ डेसिबलपेक्षा मोठा आवाज करणार्या फटाक्यांवर बंदी आहे; मात्र या आवाजाच्या मर्यादेचे सर्रास उल्लंघन होते. वायूप्रदूषणामुळे देहलीची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. तशीच स्थिती ध्वनीप्रदूषणामुळेही ओढवू नये यासाठी नागरिक आणि शासन यांनी ध्वनीप्रदूषणाच्या समस्येला गांभीर्याने घेतले पाहिजे !