कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्ज !

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात आलेले भाविक

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी (१५ नोव्हेंबर) या दिवशी कार्तिकी यात्रा होणार असून कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्य सुरक्षितता आणि स्वच्छता यांच्या दृष्टीने आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली. शहरातील जीर्ण आणि धोकादायक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असून, शहरातील अन् वाळवंटातील अतीक्रमणे काढण्याचे काम चालू आहे. वाहनतळावर दिशादर्शक फलक लावण्यात आले असून आवश्यक ठिकाणी बॅरिकेटींग लावण्यात आले.

कार्तिकी यात्रा कालावधीत शहरासह नदीपात्र वाळवंट, ६५ एकर परिसर, पत्रा शेड आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी १ सहस्र ३४० स्वच्छता कर्मचार्‍यांची नियुक्ती केली असून यामध्ये ३४० कायम, तर १ सहस्र हंगामी कर्मचारी स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत. पत्राशेड, वाळवंट, ६५ एकर परिसर, रेल्वे मैदान आदी ठिकाणी तात्पुरती शौचालये उभारण्यात आली आहेत. वारकरी भाविकांनी उघड्यावर शौच करू नये, यासाठी प्रतिबंधक पथकांची नेमणूकही करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी श्री. माळी यांनी दिली.


कार्तिक एकादशीच्या पार्श्वभूमीवर आजपासून यशवंतपूर-पंढरपूर एक्सप्रेस चालू !

मिरज, ११ नोव्हेंबर – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूर-सोलापूर या मार्गावर बर्‍याचशा रेल्वे गाड्या बंद होत्या. अखेर कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबरपासून यशवंतपूर-पंढरपूर ही साप्ताहिक एक्सप्रेस चालू होत आहे. ही गाडी प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी सकाळी ९ वाजता मिरज येथून सुटेल आणि पंढरपूर येथे सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी येथे पोचेल. या गाडीला सांगोला थांबा देण्यात आला आहे.

याशिवाय पूर्वीपासून कोल्हापूर-नागपूर ही गाडी आठवड्यातून दोन दिवस म्हणजे सोमवारी आणि शुक्रवारी उपलब्ध आहे, तसेच कोल्हापूर-धनबाद ही गाडी प्रत्येक शुक्रवारी उपलब्ध असून वारकर्‍यांना पंढरपूर येथे जाण्यासाठी आता किमान ४ गाड्या उपलब्ध होत आहेत. याशिवाय ‘म्हैसूर-निजामुद्दिन’ ही गाडीही १३ नोव्हेंबरपासून चालू होत आहे. ही गाडी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी मिरज येथून पुढे रवाना होईल, यानंतर ती सांगली, कराड, पुणे करत तिसर्‍या दिवशी निजामुद्दिन रेल्वे स्थानकावर पोचेल.