-
मोर्च्यामध्ये विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सहभाग
-
बांगलादेशमधील हिंदूंना न्याय आणि संरक्षण, तसेच जिहादींवर कारवाईसाठी बांगलादेश सरकारवर दबाव आणण्याची सरकारकडे मागणी
गोमंतकीय हिंदूंनो, बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणाविषयी लोकप्रतिनिधी गप्प आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ते मत मागायला येतील, तेव्हा ‘त्यांनी या प्रकरणी मौन का पत्करले ?’ ते विचारा !
पणजी, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – बांगलादेशात हिंदू आणि त्यांची मंदिरे यांवरील आक्रमणांचा निषेध करण्यासाठी ‘इस्कॉन’ यांच्या वतीने २३ ऑक्टोबर या दिवशी पणजी शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सहभाग घेऊन बांगलादेशमधील घटनांचा निषेध केला. त्याचप्रमाणे बांगलादेशमधील हिंदूंना न्याय आणि संरक्षण देण्यासाठी, तसेच तेथील जिहादींवर कारवाई करण्यासाठी बांगलादेश सरकारवर भारत सरकारने दबाव आणावा, अशी मागणी करणारे पत्र सर्व संघटनांनी केंद्र सरकारला पाठवण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
बांगलादेशातील नोआखालीत ‘इस्कॉन’च्या २ साधूंना धर्मांधांनी ठार केले होते. बांगलादेशमध्ये हिंदूंची घरे आणि व्यवसाय नष्ट करण्याचे काम चालू आहे. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. याला आळा घातला गेला पाहिजे. या मागणीवरून ‘इस्कॉन’च्या वतीने २३ ऑक्टोबर या दिवशी जगभरात विविध देशांमध्ये निदर्शने करण्यात आली. पणजी येथे झालेली निदर्शने हा जगभरातील १२५ देशांत झालेल्या निदर्शनाचाच एक भाग आहे.
पणजी येथील निषेध मोर्च्याला श्री महालक्ष्मी मंदिर येथून प्रारंभ झाला आणि मोर्च्याची आझाद मैदानात सांगता झाली. मोर्च्यामध्ये ‘बांगलादेशमधील हिंदूंचे रक्षण करा’, ‘हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण करा’, ‘मानवतेच्या अधिकाराचे रक्षण करा’, ‘हरे कृष्ण’, ‘हिंदूंची हत्या थांबवा’, ‘बांगलादेशमधील हिंदूंचा वंशविच्छेद थांबवा’, अशा आशयाचे फलक घेऊन हिंदू सहभागी झाले होते. आझाद मैदानात पोचल्यावर मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले. या वेळी प्रारंभी ‘इस्कॉन’चे श्याम रसिक दास यांनी निषेध मोर्च्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर ‘इस्कॉन’चे श्री. सूरज चोडणकर यांनी मार्गदर्शन केले. ‘राष्ट्रीय बजरंग दला’चे गोवा राज्याचे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई, ‘भारत माता की जय’ संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख सौ. शुभांगी गावडे, ‘भारत माता की जय’चे श्री. विनायक च्यारी; ‘स्वामी समर्थ, मडगाव’चे श्री. जयेश नाईक, शिवसेनेचे माजी गोवा राज्य प्रमुख श्री. रमेश नाईक, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर, ‘मंदिर महासंघा’चे श्री. जयेश थळी आदींनी उपस्थितांना संबोधित केले. सर्वांच्या मार्गदर्शनातून पुढील सूर उमटला.
‘‘हिंदूंनी आज संघटित होणे अत्यावश्यक आहे. हिंदू संघटित झाले, तरच ते सुरक्षित राहू शकतील. हिंदूंच्या देवतांच्या हातात अस्त्र आणि शस्त्र आहे, हे हिंदूंनी विसरू नये. वेळप्रसंगी स्वरक्षणासाठी सर्व प्रकारची सिद्धता हिंदूंनी करणे, ही काळाची आवश्यकता आहे. महिलांनीही स्वरक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे. बांगलादेशमधील जिहाद्यांवर तेथील सरकारने कारवाई करावी, यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केंद्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी करावी. बांगलादेश सरकारच्या आर्थिक नाड्या आवळणे अत्यावश्यक आहे.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘इस्कॉन’चे श्री. पवन नाईक यांनी केले.