पुणे – येथील ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’ने कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याची नोंद घेत ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन’ यांच्याकडून प्रमाणपत्र प्रदान करत ‘ट्रस्ट’चा गौरव करण्यात आला. हे प्रमाणपत्र गणपति मंदिरात ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन’चे राष्ट्रीय सचिव डॉ. दीपक हरके यांनी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने आणि कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्याकडे सुपुर्द केले.
ट्रस्टच्या वतीने ससून रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक यांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. कोरोना संसर्गाच्या काळात रुग्ण आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना एकूण १४ लाख ४० सहस्र भोजनाच्या थाळ्या विनामूल्य पुरवण्यात आल्या. शहर, उपनगर, जिल्हा आणि गरजेनुसार महाराष्ट्रामध्ये प्रारंभी काळात ६ रुग्णवाहिकांची, तर त्यानंतर १० रुग्णवाहिकांची व्यवस्था ‘ट्रस्ट’ने केली होती.