बांगलादेशात हिंदूंवरील जिहादी आक्रमणांच्या विरोधात बांगलादेश, तसेच भारतातील १५ राज्यांत आंदोलन !

  • हिंदु जनजागृती समितीसह ३७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सहभाग

  • १३७ ठिकाणी सरकारला निवेदने !

बांगलादेशामध्ये हिंदूंवरील जिहाद्यांच्या आक्रमणांच्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलने

मुंबई – बांगलादेशामध्ये हिंदूंवरील जिहाद्यांच्या आक्रमणांच्या विरोधात भारत आणि बांगलादेश येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रव्यापी आंदोलन केले. जिहादी आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करावे, या मागण्यांसाठी बांगलादेश, तसेच भारतातील नवी देहली, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक आदी १५ राज्यांतील हिंदूंनी याविषयीच्या आंदोलनात सहभाग घेतला. तसेच या आंदोलनाचा भाग म्हणून २५ ठिकाणी प्रत्यक्ष, तर ११२ ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस्.जयशंकर यांना निवेदने पाठवण्यात आली. या आंदोलनांमध्ये हिंदु जनजागृती समितीसह देशभरातील ३७ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच हिंदु धर्माभिमानी यांचा सहभाग होता.

‘ट्विटर’वरही हिंदूंवरील आक्रमणांना विरोध !

जिहाद्यांकडून बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या आक्रमणाला ‘ट्विटर’वरही मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याचे दिसून आले. यामध्ये भारत, बांगलादेश, तसेच अन्य देशांतील हिंदूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. #SaveBangladeshiHindus या ‘हॅशटॅग’द्वारे सहस्रो हिंदूंनी ट्वीट्स केल्याने हा विषय कोट्यवधी लोकांपर्यंत पोचला.