काश्‍मीरमधील हिंदूंच्‍या निर्घृण हत्‍येच्‍या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषद यांच्‍या वतीने मुंबईमध्‍ये १६ ठिकाणी आंदोलने !

दादर (पश्‍चिम) येथे आंदोलन करतांना विहिंप आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते

मुंबई – मागील काही दिवसांत काश्‍मीर खोर्‍यात आतंकवाद्यांनी ७ हिंदूंच्‍या हत्‍या केल्‍या. आतंकवाद्यांकडून काश्‍मीरमध्‍ये हिंदूंच्‍या चालू असलेल्‍या निर्घृण हत्‍यांच्‍या निषेधार्थ ९ ऑक्‍टोबर या दिवशी मुंबई येथे बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषद यांच्‍या वतीने घाटकोपर, दादर आदी विविध १६ ठिकाणी आंदोलन करून याचा निषेध करण्‍यात आला.

या वेळी आंदोलकांनी आतकंवाद्यांना पोसणार्‍या पाकिस्‍तानचा निषेध करत केंद्र सरकारने आतंकवाद्यांना ठोस प्रत्‍युत्तर देण्‍याची मागणी केली. ‘काश्‍मीरमधील निर्वासित हिंदूंचे पुनर्वसन करून त्‍यांना तिथे मोकळा श्‍वास घेता येईल’, अशी योग्‍य सुरक्षा यंत्रणा उभारावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

निष्‍पाप हिंदूंना निवडून मारले जाते, तेव्‍हा धर्मनिरपेक्षता कुठे जाते ? – मिलिंद परांड, केंद्रीय महामंत्री, विश्‍व हिंदू परिषद

काश्‍मीर खोर्‍यात निष्‍पाप हिंदूंच्‍या हत्‍या होतात. त्‍या वेळी भारतातील धर्मनिरपेक्षता कुठे जाते ? भारताच्‍या पवित्र भूमीला तोडण्‍याचा प्रयत्न कधीही यशस्‍वी होणार नाही. देशाची एकता आणि अखंडता यासाठी सर्व देशवासी बांधील आहेत. आतंकवादाचे समर्थन करणार्‍यांनी हे समजून घ्‍यावे की, हे विषारी साप तुम्‍हालाच दंश करतील. या विषारी सापांचे फण कसे चिरडायचे, हे आम्‍हाला चांगलेच माहीत आहे. भारताच्‍या हातूनच या इस्‍लामिक आतकंवादाची कबर खोदली जाईल.