घटस्थापनेच्यावेळी डी.जे. वर लावलेल्या रिमिक्स गाण्यांवर गरबा नृत्य करताना केलेले सूक्ष्म परीक्षण !

नृत्याच्या मध्यभागी घटस्थापना केलेली असतांना आणि नसतांना, तसेच डी.जे. वर लावलेल्या रिमिक्स गाण्यांवर (टीप) सौ. नीता सोलंकी यांनी गरबा नृत्य केल्यावर ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी घटस्थापना म्हणजेच नवरात्रारंभ होत आहे. त्या निमित्ताने…

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

‘देवाच्या कृपेने २६.९.२०२० या दिवशी सौ. नीता सोलंकी यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमात येऊन पारंपरिक ‘गरबा’ नृत्याच्या अंतर्गत येणारे विविध नृत्यप्रकार सादर केले. १८.१०.२०२० या दिवशी सौ. नीता सोलंकी यांनी सध्या समाजात प्रचलित असणार्‍या गरब्याच्या नृत्याचे प्रकार सादर केले. या नृत्यांचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतली. आधुनिक पद्धतीच्या गरबा नृत्याच्या विविध प्रकारांचे सूक्ष्म परीक्षण करतांना पुढील महत्त्वाची सूत्रे जाणवली.

सौ. नीता सोलंकी
घटस्थापना करून घटाभोवती गरबा नृत्य करतांना सौ. नीता सोलंकी
कु. मधुरा भोसले

१. नृत्याच्या स्थळी मध्यभागी घटस्थापना केलेली असतांना आणि नसतांना पारंपरिक गाण्यांवर गरबा नृत्य करण्याचे तौलनिक महत्त्व

नृत्याच्या मध्यभागी घटस्थापना केल्यामुळे मध्यभागी देवीचे तत्त्व कार्यरत होते. त्यामुळे घटाभोवती नृत्य करतांना नृत्य करणार्‍यांना आणि पहाणार्‍यांना देवीच्या घटातून दैवी शक्ती अन् चैतन्य मिळते, तसेच हे नृत्य पहातांना गाण्यांतील शब्दांचे अर्थ आणि नृत्य करण्यामागील भाव यांकडे प्रेक्षकांचे लक्ष जाते.

जेव्हा नृत्याच्या ठिकाणी घट नसतो, तेव्हा ‘ते नृत्य देवीसाठी करत आहे’, हा भाव मनामध्ये जागृत होत नाही. त्यामुळे हे नृत्य करतांना मनाची वृत्ती बहिर्मुख होण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे पारंपरिक गाण्याच्या अर्थाकडे लक्ष न जाता केवळ शब्दांकडे आणि नृत्याच्या हालचाली यांच्याकडे लक्ष जाते.

२. डी.जे. वरील रिमिक्स गाण्यावर गरबा नृत्य करणे

डी.जे. वर लावलेली रिमिक्स गाणी तामसिक असतात. त्यामुळे या गाण्यांवर नृत्य केल्यामुळे मनाची वृत्ती अत्यंत बहिर्मुख होते आणि देवीविषयीचा भाव जागृत होत नाही. उलट मनामध्ये तामसिक विचारांचे प्राबल्य वाढल्यामुळे वासना, अहं आणि स्पर्धा करण्याची वृत्ती वाढू लागते. त्यामुळे डी.जे. वर लावलेल्या रिमिक्स गाण्यांवर गरबा नृत्य केल्याने आध्यात्मिक स्तरावर कोणताही लाभ होत नाही.

३. मध्यभागी घटस्थापना करून घटाभोवती पारंपरिक गाण्यांवर, मध्यभागी घट स्थापन न करता पारंपरिक गाण्यांवर आणि डी.जे. वर लावलेल्या रिमिक्स गाण्यांवर गरबा नृत्य करणे

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.११.२०२०)

टीप – रिमिक्स गाणी : मूळ गाण्यात पाश्चात्त्य पद्धतीची उपकरणे आणि संगणकीय प्रक्रिया वापरून त्यात पालट केलेली आधुनिक गीते.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक